तुम्हाला जर कोणी सांगितले की, सर्व सणवार जोरात साजरे करायचे. तुमच्या सोसायटीतल्या गणेशोत्सव, दुर्गा पूजा, गरबा यामध्ये समरसून सहभाग घ्यायचा. तुमच्या शाळेचा दहावीचा वर्ग एकत्र करून ‘गेट-टुगेदर’, सहली इत्यादी गोष्टी करायच्या. लायन्स, रोटरी आणि यांसारख्या इतर ठिकाणी हजेरी लावायची. दरवर्षी वेगळ्या वेगळ्या सहल कंपन्यांबरोबर सहलीला जायचे आणि हे सर्व करण्याकरता आयुर्विमा कंपनी तुम्हाला दरमहा २ लाख रुपये देईल. विश्वास बसेल? ‘रिलेशनशिप मार्केटिंग’ म्हणजे दुसर असं काय असते? हे सर्व निरनिराळे उपक्रम हा त्याचाच भाग आहे. मग यातून होणाऱ्या विमा व्यवसायाचा एक ‘करिअर’ म्हणून विचार आपण करू शकतो का? हा आजच्या लेखाचा विषय आहे.

आयुर्विमा हे क्षेत्र आज २५ वर्षाच्या खासगीकरणानंतर सुद्धा ‘सन शाईन इंडस्ट्री’ हे बिरुद टिकवून आहे. म्हणजेच या क्षेत्रात विकासाला अजून खूप वाव आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. विम्याचा प्रसार आणि विमा हप्ता मोजण्यासाठी आयुर्विमाची घनता किंवा ‘life insurance density’ ही संकल्पना आहे. आयुर्विमा घनता म्हणजे देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात दरडोई विमा हप्ता. भारतात वर्ष २०२२-२३ मध्ये आयुर्विम्याची दरडोई घनता ७० डॉलर आहे. म्हणजेच त्यावर्षी आयुर्विमा क्षेत्रातील एकूण विमा हप्त्याच्या रकमेस लोकसंख्येने भागल्यास दरडोई ७० डॉलर (आजच्या विनिमय दरानुसार साधारण ६२०० रुपये) आहे. तर विकसित देशांमध्ये ती डॉलरमध्ये चार आकडी (उदा. अमेरिकेत ३,३४९ , इंग्लंडमध्ये ३,३५९, सिंगापूर ६,९३२, जपान २,१२७) आहे. त्यायादीत भारत आजही खूपच खाली आहे. किंबहुना युरोप, अमेरिका, सिंगापूर, तैवान, चीन, जपान इत्यादी देशांचा विचार केला तर आपला हा विमा हप्ता त्यांच्या एक दशांश ही नाही.

भारत जगातील तिसरी महासत्ता बनणार यात काही प्रत्यवाय नाही आणि या वाटचालीमध्ये विमा प्रसार आणि विम्याच्या हप्त्यात होणारी वाढ यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे तर विमा एजन्सीचा करिअर म्हणून विचार करणे फक्त वैयक्तिकच नाही तर देशहिताचेही ठरू शकते. या व्यवसायाची एक अत्यंत महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे या क्षेत्रातील करिअर सर्व प्रकारच्या इच्छुक लोकांचे स्वागत करते मग तुम्ही कोणत्याही वयाचे असा, स्त्री किंवा पुरुष असा अथवा भारताच्या कोणत्याही भागातून आलेले असा.

तरुणासाठी व्यवसाय म्हणून आयुर्विमा क्षेत्र:

भारताच्या लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग असलेला तरुण वर्ग हा आयुर्विम्याचा ग्राहक तर आहेच पण तो आयुर्विमा सल्लागार बनून याकडे संधी म्हणून बघू शकतो. आजचा तरुण ग्राहकवर्ग ज्याला ‘जेन झी, जेनेक्स, जेनवाय (मिलेनिअल्स)’ म्हणतो, तो आज आयुर्विमा गुंतवणुकीपासून दूर गेला आहे. त्याची भाषा, त्याचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एकंदरीत आयुष्याकडे बघण्याची, गतिमान आयुष्याकडे असलेली मानसिकता समजून घेऊन त्याला त्याच्या भाषेत आयुर्विमा महत्त्व पटवून देणे हे त्याच्याच पिढीतला तरुण करू शकेल. हा संवाद साधणे, आयुर्विमा व्यवसायातील तरुण पिढीला सहज शक्य आहे.

\व्यवसायात तुम्ही तुमच्या विमा विक्रीच्या कसबावर, तुमच्या कष्टांवर कितीही पैसे मिळवू शकता ‘You can write your own cheque’. ऑनलाइन उपस्थिती आणि डिजिटल व्यवहार यातील सोय सुलभता आजच्या पिढीला जमते. बिनभांडवली विमा व्यवसाय तुम्ही तुमचा वेळ आणि बुद्धी वापरून करता. हा आता पहिल्यासारखा अर्धवेळ पार्ट-टाइम करण्याचा राहिला नसून पूर्ण वेळ संपूर्ण झोकून देऊन अत्यंत व्यावसायिकतेने केल्यास तरुण विमा विक्रेता मोठा व्यावसायिक बनू शकतो. कॉर्पोरेट ऑफिस थाटून, यासाठी २५-३० लोकांना रोजगार देणाऱ्या आयुर्विमा एजंट्सची अशी अनेक उदाहरणे आयुर्विमा क्षेत्रात आहेत.

वीस वर्षाचा तरुण जेव्हा विमा विक्री सुरू करतो, तेव्हा दोन शक्यता उद्भवतात. एक म्हणजे या क्षेत्रात गोडी लागून तो यशस्वी होईल. साधारणपणे कोणत्याही \व्यवसायात स्थिर व्हायला तीन वर्षे लागतात. असा यशस्वी तरुण मग मागे वळून पाहत नाही आणि त्याचबरोबर आयुर्विमा विक्रीबरोबरच आपल्या सेवांचा आवाका वाढवून आरोग्य विमा, गृहकर्ज, म्युच्युअल फंड, कंपनी मुदत ठेवी इत्यादी वेगवेगळ्या पर्यायाद्वारे संपूर्ण आर्थिक गुंतवणुकीची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देतो. परंतु हा झाला यशस्वी तरुणाचा विषय. सगळ्यांनाच हे यश मिळेल असे नाही मग त्यांच्याकरता काय? यातील यशासाठी सर्वात महत्त्वाचा भाग हा तुम्ही पटकन यशस्वी होता की नाही, हा नसून तुम्ही यशापयशातून टिकून राहून स्वतः कसे शिकत जाता हा आहे. इतर क्षेत्रातही आपल्यासमोर अशी उदाहरणे आहेत. अभिषेक बच्चन तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला महानायकाचा मुलगा. पण यश मिळायला मात्र त्याला बरीच वाट पाहावी लागली. व्यक्तिमत्त्व विकास हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आयुर्विमा विक्रीमध्ये कित्येकदा अपयशाशी सामना करावा लागतो आणि त्यातूनच आपले व्यक्तिमत्त्व तयार होत असते. तेव्हा विशेषत: तरुणांनी त्यानिमित्त जी मेहनत आणि विक्रीच्या निमित्ताने लोकांना भेटून विविध अनुभव घेतले. त्यातून त्याची भविष्यात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याची क्षमता नक्कीच वाढते.

चंदेरी अर्थव्यवस्थेत आयुर्विमा:

दुसरा वर्ग म्हणजे आजचा निवृत्त व्यक्ती. आज भारतात तरुणांबरोबरच साठीच्या वरील व्यक्तींची संख्याही वाढते आहे. आज समाजात अनेकजण ऐच्छिक सेवानिवृत्ती (व्हीआरएस) किंवा वयाची ६० वर्षे पूर्ण झाले म्हणून निवृत्त होतात त्यांची कार्यक्षमता चांगली असते आणि निवृत्तीनंतर वेळ घालवण्याकरता ते अनेक क्रियाशील उद्योग, सामाजिक उपक्रम करताना दिसतात. आयुर्विमा विक्रीचा देखील त्यांनी एक समाजसेवा म्हणून विचार करायला हवा. घराघरांत आयुर्विमा हे भारत सरकारचे ब्रीद २०४७ या आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत पूर्ण व्हायचे असेल तर या घटकांनी आपला वाटा उचलायला हवा. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा पुढील पिढीला करून द्यायला हवा. नवीन पिढीशी संपर्क राहून ते स्वतः ताजेतवाने राहतीलच. पण महत्त्वाचे म्हणजे त्यांची आयुर्विमा विक्री हा केवळ गरजेपोटी नसल्याने त्याचा सल्ला हा जास्त विचारपूर्वक जाणीवपूर्वक असेल आणि ज्या योगे समाजातील विमाविषयक गैरसमज दूर होऊन प्रसार होईल. ‘मिससेलिंग’ किंवा काही वेळा विमा विक्रीत जी फसवणूक होते त्याला या घटकांमुळे चांगलाच आळा बसू शकेल. तेव्हा आजच्या ५५-६० वर्षाच्या निवृत्त माणसाने विमा विक्रीचा जरूर विचार करावा.

आयुर्विमाविक्रीतील स्त्री- शक्ती:

भारतातील आयुर्विमा घराघरांत पोहोचवणारा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे महिला विमासल्लागार. गेली कित्येक वर्षे अनेक महिला या क्षेत्रात यशस्वीपणे विमा व्यवसाय करीत आहेत. आज निरनिराळ्या विमा कंपन्या या गटाला आकृष्ट करण्याकरता विमा-सखीसारख्या योजना आणत आहेत. त्याचा लाभ घेऊन कुटुंबाचे आर्थिक नियोजन आणि येणाऱ्या अडचणी याची जाण अनुभव असणारी अशी गृहिणी नक्कीच योग्य प्रकारे विमा विक्रीचे काम करू शकेल. आज सर्वच कंपन्या अतिशय चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण, ‘ट्रेनिंग सपोर्ट’ देत आहे. इतकेच नव्हे तर विमा नियामक महामंडळ देखील ‘बीमा सुगम’ सारख्या ऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून सुसूत्रता आणत आहे. आयुर्विमा विक्री व्यवसाय महिलावर्गासाठी विशेषत: सोयीस्कर आहे. कारण यात देण्यात येणारा वेळ हा बांधील नसून त्यांच्या कौटुंबिक सोयीनुसार देता येतो. मुले मोठी होऊन संसारात स्थिर-स्थावर झाल्यावर हाताशी असलेला मोकळा वेळ हा कारणी लावून स्वतंत्र उत्पन्नाचे साधन म्हणून अनेक महिलांनी धडाडीने या क्षेत्रात यश मिळवले आहे.

याशिवाय इतर अनेक वर्ग अत्यंत यशस्वी विमा विक्री करू शकतात. उदाहरणार्थ आपला प्रांत सोडून अनेक लोक इतर राजांमध्ये स्थलांतरित झालेले असतात. बरेच आयुर्विमा सल्लागार आज आपल्या मूळ राज्यातून आलेल्या लोकांना विमा विक्रीची सेवा देतात. तसेच दुबई, सिंगापूर इत्यादी ठिकाणी परदेशी स्थायिक झालेल्या समभाषिक, समप्रांतीय लोकांकरता तेथे कार्यशाळा आयोजित करून आज अनेक यशस्वी विमा एजंट मोठ्या प्रमाणावर विमा विक्री करताना दिसतात. आपला दक्षिण भारतीय आयुर्विमा विक्रेता यात आघाडीवर आहे.

आजच्या काळात वरकरणी पाहता विमाविक्रीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. परंतु ऑनलाइन, डायरेक्ट मार्केटिंग, कॉर्पोरेट ब्रोकर, बँक ॲश्युरन्स, इन्शुरन्स मार्केटिंग फर्म अशी कितीही प्रकारे विमा विक्री होत असली तरी वैयक्तिक विमा एजंट हाच जगभर या व्यवसायाचा कणा आहे. ‘मिलियन डॉलर राऊंड टेबल’ (एमडीआरटी) ही संस्था याचे एक मोठे उदाहरण आहे. समाजाचाही विमा ‘एजंट’ कडे बघण्याचा जुना दृष्टिकोन बदलला असून आज अनेक सन्माननीय विमा विक्रेते समाजात आपले स्थान चांगल्या प्रकारे टिकवून आहेत. त्यांना मिळणारा सामाजिक मान-सन्मान याचेच द्योतक आहे.