Investment In Real Estate रिअल इस्टेट किंवा स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक हा आपले पैसे वृद्धिंगत करण्याचा, त्याचबरोबर ते सुरक्षित ठेवण्याचा, पारंपरिक मार्ग आहे. काळाच्या ओघात शहर आणि गावातल्या जमिनींची संरचना आणि गुणधर्म बदलले , त्यांचे उपयोग बदलले , त्यावर उभ्या रहाणाऱ्या इमारतींचे प्रकार बदलत गेले . त्या अनुषंगाने जमिनीत गुंतवणूक करण्याच्या अनेक नव्या पद्धती आणि पर्यायसुद्धा उपलब्ध होत गेले . आज जमीनआणि स्थावर मालमत्तेमध्ये उत्तम नफा आणि स्थैर्य देणारी गुंतवणूक करण्यासाठी पारंपरिक लोकप्रिय पर्यायांबरोबरच अनेक आधुनिकपर्याय सुद्धा उपलब्ध होत आहेत . 

स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे मोठी पुंजी असावी लागते असा आपला समज असतो, पण तो खरा नाही. आपल्याकडील भांडवल मर्यादित असेल तरीसुद्धा आज आपण स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करून त्यातून उत्तम नफा कमवू शकतो .  

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यामागे प्रामुख्याने दोन प्रमुख उद्दिष्टे असतात : 

  • १. मालमत्ता भाडेतत्वाने देऊन त्यातून नियमित उत्पन्न मिळवत रहाणे 
  • २. काही काळानंतर मालमत्तेचं मूल्य वाढल्यावर ती मालमत्ता विकून त्यातून अपेक्षित नफा मिळवणे. 
  • आपलं उद्दिष्ट स्पष्ट ठेवून त्यानुसार नियोजन करणे हे मालमत्तेतील गुंतवणुकीतून नफा मिळवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे .
  • स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व पर्यायांचे स्वत: चे विशेष फायदे आहेत, त्याचबरोबर त्यांची स्वतः ची जोखीम सुद्धा आहे. आपल्या जवळील उपलब्ध भांडवल आणि परताव्या बाबतचं आपलं उद्दिष्ट यांचा सर्वांगीण विचार करून त्या अनुषंगाने आपल्यासाठी सुयोग्य पर्याय निवडावा.
स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीचे फायदे अनेक

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचे प्रमुख पर्याय पुढील प्रमाणे: 

१.निवासी स्थावर मालमत्ता गुंतवणूक:

निवासी स्थावर मालमत्ता म्हणजे दैनंदिन राहण्यासाठी किंवा निवासासाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करणे. निवासी स्थावर मालमत्तेमध्ये बंगले, फ्लॅट्स, विविध प्रकारची घरे किंवा खोल्या यांचा समावेश होतो. आपल्या स्वतःच्या निवासासाठी एक राहतं घर उपलब्ध असेल तर केवळ उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या निवासी घरामध्ये गुंतवणूक करता येते. हे दुसरे घर भाडे तत्वावर देऊन त्यामधून नियमित परतावा मिळवता येतो. सामान्यत: शहर, गाव किंवा खेड्यांमध्येसुद्धा सर्वत्रच घरांच्या किमती सातत्याने वाढतच असतात. त्यामुळे कालांतराने ते घर खरेदीच्या किमतीपेक्षा अधिक किमतीत विकून त्यातून उत्तम नफा कमावता येतो. 

घरांना सर्वत्र आणि कायमच मागणी असते. आज छोटया गावापासून ते अगदी पुण्या- मुंबई पर्यंत सगळीकडची तरुण पिढी आपल गाव आणि घर सोडून दुसऱ्या मोठ्या शहरात किंवा परदेशात, अधिक चांगल्या करिअरच्या शोधात जाऊ लागली आहे. अशावेळी ते घर घेण्यासाठी मुलांच्या आई -वडिलांनी पूर्वी कधी तरी केलेली गुंतवणूक त्यांना उतारवयात निवारा देते . त्याच बरोबर त्या घरातील काही भाग किंवा एखादी खोली भडेतत्वावर देऊन स्वतःचं नियमित उत्पन्न मिळवण्याचं साधन सुद्धा उपलब्ध करून देते.

आज कुणाचं वास्तव्य नसल्याने ओस झालेली अनेक घर सर्वत्र दिसतात. अशा ओस झालेल्या, शहरातल्या आणि गावातल्यासुद्धा, घरांना स्थानिक बिल्डर्स किंवा अन्य व्यावसायिकांकडून मागणी असते. त्या घराची विक्री करून त्या घराचे वारस आणि हक्कदार गरजेच्या वेळी आणि चांगलं उत्पन्न मिळवू शकतात . निवासी घरामध्ये केलेल्या गुंतवणुकीची उत्तम परतावा देण्याची चिरस्थायी क्षमता यातून स्पष्ट होते . यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा निवासी स्थावर मालमत्तेत केलेली गुंतवणूक ही तुलनेने स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणूक मनाली जाते. 

निवासी स्थावर मालमत्तेत केलेल्या गुंतवणुकीचे फायदे आणि त्यातील जोखीम पुढीलप्रमाणे आहेत :

फायदे :

अ. नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. मालमत्ता भाड्याने देऊन मासिक स्थिर उत्पन्न मिळू शकते.

ब. भांडवल मूल्यवृद्धी होते . काळानुसार घरांच्या किमती वाढतात, त्यामुळे दीर्घकालीन नफा मिळतो.

क. निवासी स्थावर मालमत्तेला म्हणजे राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घरांना कायमच मागणी सतत असते, त्यामुळे गुंतवणुकीला स्थैर्य आणि परताव्याची शाश्वती असते . 

ड.  गृहकर्ज सहजतेने मिळतं, त्यामुळे गुंतवणुकीसाठी भांडवल उभं करणं त्या मानाने सोपं असतं. 

भारतासारख्या लोकसंख्या वेगाने वाढत असलेल्या देशातील, निवासी घरांच्या किमती ,सातत्याने वाढतच असतात. काही विशिष्ट कारणामुळे एखाद्यावेळी एखाद्या प्रभागातील घरांचे भाव घसरले तरीही ती घसरण बहुतेक वेळेस तात्पुरती असते. कालांतराने त्या घरांचे भाव पुन्हा वाढू लागतात. त्यामुळे निवासी स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक सर्वसाधारणपणे कमी जोखमीची गुंतवणूक मानली जाते.

फ. भारतासारख्या वेगाने विकास होत असलेल्या देशामध्ये अनेक ठिकाणी सतत विमानतळ किंवा नवे हमरस्ते या सारख्या पायाभूत सुविधा निर्माण होत असतात. तसेच अनेक ठिकाणी नवे -नवे उद्योग उभे रहात असतात . जेव्हा एखाद्या भागात नवी पायाभूत सुविधा किंवा नवीन उद्योग उभा राहतो तेव्हा त्या भागातील निवासी घरांची मागणी झपाट्याने वाढते . त्यामुळे त्या घरांसाठी मिळणाऱ्या भाड्यामध्ये लक्षणीय वाढ होते . तसेच त्या घराची विक्री करायची झाल्यास, त्या घराला खरेदीच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक मूल्य मिळू शकतं. 

जोखीम :

  • १.घर खरेदी करण्यासाठी बहुतेक वेळेस मोठ्या भांडवलाची गरज असते. 
  • २.ठरावीक कालावधी नंतर घराची डागडुजी, दुरुस्ती, रंगकाम यावर खर्च करावा लागतो . तसेच लाइटबिल, पाणीबिल , या सारखी शुल्क नियमितपणे द्यावीच लागतात . काही काळासाठी घर भाड्याने गेलं नसेल तर हे खर्च अंगावर पडतात. 
  • ३.काही वेळा किमती स्थिर राहतात किंवा दीर्घकाळासाठी खाली उतरतात . त्यावेळी घर विकण्याची निकड पडल्यास आपल्या खरेदीपेक्षा सुद्धा कमी किंमत मिळण्याचा धोका असतो. 
  • ४.काहीवेळेस आपल्याला पैशांची तातडीची गरज असते. एखाद्या मोठ्या आजारपणाचा खर्च , कुटुंबातील लग्न किंवा मुलांचा कॉलेजप्रवेश यासाठी मोठी रक्कम ठरलेल्या मुदतीतच उभी करावी लागते. घर विकलं तर ती गरज एकरकमी पूर्ण होऊ शकते. परंतु ठरलेल्या मुदतीत घराला गिऱ्हाईक मिळालं नाही तर ते पैसे वेळेत उभे करणे जिकीरीच ठरतं.
  • ५. आपल्या घरात ज्याला भाड्याने राहायला देता येईल असा योग्य भाडेकरू मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर त्या भाडेकरू कडून वेळच्यावेळी भाडे घेणे व त्याने वीज व पाणी यांच्या सारखी बिले वेळच्या वेळी भरावी या साठी त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक असते. तसेच तो घराची योग्य देखभाल करतो आहे यावर लक्ष ठेवावे लागते. थोडक्यात भाडेकरूचे असे व्यवस्थापन करणे वेळखाऊ ठरते.

२. व्यावसायिक स्थावर मालमत्ता ( कमर्शियल रिअल इस्टेट ) गुंतवणूक:

व्यावसायिक स्थावर मालमत्ता म्हणजे कमर्शिअल बिल्डिंगसमध्ये शासकीय किंवा खाजगी कंपन्यांची कार्यालये, लहान मोठी दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स , रेस्टोरेंट्स किंवा लहान मोठे गाळे असतात अशा इमारतीमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. निवासी मालमत्तेच्या तुलनेत व्यावसायिक मालमत्तेतून गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळतो भाडेकरार सुद्धा दीर्घ काळासाठी होतात. यामुळे गुंतवणुकीमधून स्थिर उत्पन्न मिळत राहते.

व्यावसायिक स्थावर मालमत्ता म्हणजे कमर्शिअल इमारतीमध्ये गुंतवणूक करताना त्या इमारतीची जागा हा सर्वात महत्वाचा निकष ठेवावा. इमारतीची जागा जर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असेल तर तिथे लोकांची वर्दळ असते . त्या इमारतीमधल्या दुकानं किंवा रेस्टोरेंट्समध्ये सतत ग्राहक येत असतात. त्यामुळे त्या इमारतीमधील फ्लॅटस किंवा गाळे यांना उद्योजकांची भरपूर मागणी असते . त्यामुळे ते गाळे फारसे कधी रिकामे राहत नाहीत आणि त्याना भाडेसुद्धा उत्तम मिळते.

फायदे :

  • अ. निवासी मालमत्तेच्या तुलनेत व्यावसायिक गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळतो.
  • ब. व्यवसायिक भाडेकरू सहसा दीर्घ कालावधीसाठी करार करतात, त्यामुळे स्थिर उत्पन्न मिळत राहते.
  • क. दुकाने, कार्यालये आणि रेस्टॉरंट्स स्वतः व्यवसायिक तत्वावर चालत असल्याने ते जागेचे भाडे नियमितपणे देत राहतात. त्या साठी पाठपुरावा करावा लागत नाही . भाडे वेळच्या वेळी मिळाल्याने उत्पन्न नियमितपणे सुरू रहाते.
  • ड. इमारत चांगल्या ठिकाणी असेल तर आपल्या मालमत्तेचे मूल्य वाढत रहाते . त्यामुळे त्याची विक्री करताना चांगला नफा मिळतो. 

जोखीम : 

  • अ. निवासी मालमत्तेपेक्षा व्यावसायिक मालमत्ता खरेदीसाठी जास्त भांडवल लागते.
  • ब. अर्थव्यवस्थेत मंदी आली की, व्यावसायिक जागांची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
  • क. व्यावसायिक इमारतींचे देखभाल खर्च जास्त असतात. तसेच भाडेकरू आपल्या मालमत्तेला हानी पोहोचवेल असे रचनात्मक बदल किंवा अन्य काही बाबी करत नाही या कडे लक्ष ठेवावे लागते .
  • ड. व्यावसायिक मालमत्ता विकायची असेल तर तिला ग्राहक मिळायला वेळ लागतो . त्यामुळे तातडीची गरज असेल तर ती मालमत्ता विकून लगेच पैसे उभे करणे कठीण ठरते.
  • इ. आपल्या जागेतील भाडेकरुचा व्यवसाय बंद झाला व त्याने ती जागा सोडली तर दुसरा त्या प्रकारचा व्यवसाय करणारा भाडेकरू मिळण्यासाठी वेळ लागतो . जागा रिकामी राहू शकते व त्यामुळे आपले उत्पन्न दीर्घकाळ खंडित होऊ शकते. 

मालमत्तेतील गुंतवणूक उत्तम परतावा मिळवण्याचा सुरक्षित मार्ग आहे . ‘श्रीमंत लोक स्थावर मालमत्तेत पैसे गुंतवतात असं नाही तर जे मालमत्तेत विचारपूर्वक पैसे गुंतवतात ते श्रीमंत होतात ‘ हे काळाच्या ओघात स्पष्ट झालं आहे !

(स्थावर मालमतेत गुंतवणूक करायचे अधिक तपशील आपण पुढील भागात पाहू .)