मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बाजाराची वाटचाल वरच्या दिशेनेच होताना दिसते आहे . सलग चौथ्या दिवशी बाजाराने पॉझिटिव्ह आकडे दिले आहेत. मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स १२२.७५ अंकांनी वधारून ६२,९६९ वर बंद झाला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी ५०.३५ अंकांनी वाढून १८,६३३ वर बंद झाला. निफ्टीच्या ५० शेअर्स पैकी २७ शेअर्सचे भाव कमी झालेले तर २३ शेअर्सचे भाव वाढलेले दिसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Money mantra: रिव्हर्स मॉर्गेज पद्धती आहे तरी कशी?

गेल्या दोन वर्षात भारतीय बाजाराची कामगिरी सरसकट चांगली राहिलेली नाही. एखाद्या क्षेत्रामध्ये वाढ तर एखादं क्षेत्र पूर्ण आडवं झाल्यासारखं तर एखाद्या क्षेत्रामध्ये संपूर्ण निराशा असंच वातावरण होतं. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय बाजारांनी आशादायक कामगिरी करायला सुरुवात केली आहे. तीन महिन्यातला निफ्टीचा परतावा ८ टक्क्यांच्या आसपास आहे. वर्षभराचा निफ्टीचा परतावा ११% आहे. बाजाराच्या कामगिरीत बँकिंग आणि फिनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील कंपन्यांनी चांगली वाढ दर्शवली. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लाइफ, एचसीएल टेक्नॉलॉजी हे शेअर्स वर गेले तर हिंडाल्को, अदानी एंटरप्राइज, टेक महिंद्रा, टाटा स्टील, सन फार्मा हे पाच सर्वाधिक भाव कमी झालेले शेअर्स होते. सर्वाधिक आणि सर्वात कमी अशी आकडेवारी पाहिल्यास बजाज फिनसर्व्ह सर्वात मोठा निफ्टीतील वाढलेला शेअर तर हिंडाल्को सर्वात मोठा पडलेला शेअर होता.

आणखी वाचा : Money Mantra : विमा म्हणजे काय रे भाऊ?

बँक निफ्टी मध्ये एप्रिल महिन्यापासून आलेली तेजी कायम राहिलेली दिसली. निफ्टीचा तांत्रिक अंगाने विचार करायचा झाल्यास १८,८०० किंवा १८,९०० या पातळीपर्यंत निफ्टीला जाण्यास वाव दिसतो. देशी किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणती नकारात्मक घटना घडलेली नाही तर निफ्टीने आगामी काळात म्हणजेच येत्या दोन महिन्यांत १९ हजारांची पातळी सुद्धा पार केली तर आश्चर्य वाटायला नको. मान्सूनची आगामी काळातील वाटचाल कशी आहे, हा भारतीय बाजारांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असणार आहे. भारतात कृषी क्षेत्र हे सर्वाधिक हातांना काम देणारे तर आहेच पण देशांतर्गत बाजाराची मोठी उलाढालदेखील मान्सून आणि पर्यायाने शेतीवर अवलंबून असते. गुंतवणूकदारांसाठी पाळायचा नियम आहे तोच असणार! जर अल्प आणि मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल, तर एखादी मोठी पडझड झाल्यावर हाताशी पैसे उपलब्ध असल्यास चांगले शेअर्स विकत घेऊन आपले ठरवलेले टार्गेट पूर्ण झाले की त्यातून बाहेर पडायला हवे!

आणखी वाचा : Money Mantra : गुंतवणुकीचा अमृतकाळच, पण परताव्यासाठी संयम, सबुरी हवीच!

MSCI (Morgan Stanley Capital International) यांनी केलेल्या घोषणेनुसार अदाणी ट्रान्समिशन आणि अदाणी टोटल गॅस या दोन अदाणी उद्योग समूहाशी संबंधित कंपन्या ग्लोबल स्टॅंडर्ड इंडेक्स मधून आज ३१ मे पासून बाहेर पडतील. मॅक्स हेल्थकेअर, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, सोना प्रिसिजन फोर्जिंग या कंपन्या मॉर्गन स्टॅन्ली इंडेक्स मध्ये दाखल होतील. हा निर्देशांक महत्त्वाचा का ? MSCI इंडिया इंडेक्स हा भारतातील मोठ्या आणि मध्यम आकारातील कंपन्यांचा निर्देशांक म्हणून महत्त्वाचा समजला जातो. एकूण ११४ कंपन्यांचा समावेश या निर्देशांकात केलेला आहे. भारतातील इंडेक्स फंड नेमके कसे परतावे देत आहेत, याची तुलना करण्यासाठी याच निर्देशांकाचा वापर बहुतांश वेळा केला जातो हे याचे महत्त्व आहे.

या इंडिया इंडेक्स मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी, हिंदुस्तान युनिलिव्हर, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो हे आघाडीचे दहा शेअर्स आहेत व या निर्देशांकापैकी ४५% मूल्य या दहा शेअर्सचे आहे. भारतीय बाजारांसाठी अभिमान ठरावा अशी एक गोष्ट घडली आहे ती म्हणजे, जागतिक वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपन्यांच्या यादीत भारतीय कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचा समावेश झाला आहे. महिंद्रा कंपनीचा नफ्याचा आकडा दहा हजार कोटींवर गेल्याने जगातील आघाडीच्या २५ वाहन निर्मिती कंपन्यांमध्ये तिचा समावेश होईल. यापूर्वी टाटा उद्योगसमूहातील टाटा मोटर्स या भारतीय कंपनीने हे यश मिळवले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारांचा त्यातही आशियाई बाजारपेठांचा विचार करता टोकियो, शांघाय, आणि हाँगकाँग येथील बाजार कालच्या पेक्षा कमी पातळीवर बंद झाले तर दक्षिण कोरियाचा निर्देशांक कालच्या पेक्षा थोडा का होईना वर जाताना दिसला.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra which shares are high up and which are down bse sensex nse nifty mmdc vp