Market Week Ahead: सोसाट्याचा वारा आणि मान्सूनपूर्व तुफान सरींनी सुरू झालेल्या आठवड्यात, शेअर बाजारात निफ्टी निर्देशांकाने अपेक्षित २५ हजारांची पातळी गाठून आनंद तरंग निर्माण केले. तथापि बरसलेला पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा की वळवाचा यावरून जसा गोंधळ पुढे सुरू झाला, अगदी त्याप्रमाणेच शेअर बाजाराची दिशा पुढे दिवसागणिक भरकटत गेल्याचे दिसून आले. आठवड्याच्या पाच सत्रांमध्ये, शेअर बाजार एका आखूड पट्ट्यात हालता राहिला. पाच दिवसांत निफ्टी निर्देशांकांचे अवघ्या ४०१.९० अंशांमध्ये, म्हणजे वरच्या टोकाला २५,१०० ते खाली २४,५०० असे हिंदोळे सुरू राहिले. अनेक देशी-आंतरराष्ट्रीय घडामोडींनी गजबजलेल्या आठवड्यात दोन्ही निर्देशांक अखेर किरकोळ घसरणीसह बंद झाले.

साप्ताहिक कामगिरीवर दृष्टिक्षेपः

० सेन्सेक्स – ८१,४५१.०१   -२७०.०७ (-०.२१%)

० निफ्टी   – २४,७५०.७०   -१०२.४५  (-०.४१%)  

० रुपया  – ८५.५७ / डॉलर      (-१२ पैसे)

० सोने – ९४,९७५ रु./ १० ग्रॅम     (-३,७७५ रु.)

० खनिज तेल – ६४.४३ डॉलर/ पिंप  (+०.१२%)

अमेरिकी न्यायालचाच्या हस्तक्षेपाने ट्रम्पप्रणीत ‘टॅरिफ’ना उलटसुलट केले जाईल काय आणि व्यापार युद्धाबाबत अनिश्चिततेबाबत जगभराच्या शेअर बाजारांना सरलेल्या काही दिवसांनी वर-खाली नाचविले. पण आसमंतात काळे मळभ दाटले असतानाच, जगातील सर्वात वेगवान मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान कायम राखणारी जीडीपीची आकडेवारी शुक्रवारी आली. काजळी दाटलेल्या पटलावरील हे चमकदार ठिपके भोवताल उजळवून टाकण्यासह, येत्या आठवड्यात बाजाराला नवचैतन्य देणारे ठरतील काय, याचा मागोवा घेऊ.

आगामी २ जून ते ६ जून आठवड्यातील लक्षणीय घडामोडीः

० मान्सूनचे आगमन
होय, मान्सून लवकर दाखल झाला आहे. गत १६ वर्षांत सर्वात लवकर पावसाच्या सरी आपण अनुभवणार आणि हा पाऊसही सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक असणार आहे. शेअर बाजारासाठीही हा आनंदाचा क्षण निश्चितच आहे. ग्रामीण भारत, बाजारपेठा, आणि उपभोगाधारीत क्षेत्रांसाठी ही आनंदवार्ताच ठरेल. अर्थात महाराष्ट्रात वळवाच्या पावसाने जो धुमाकूळ उडवून दिला, तो पाहता प्रत्यक्ष मान्सून विलंबाने येण्याच्या शक्यताही बोलल्या जात आहेत. त्याबाबत येत्या आठवड्यात नक्की काय ते स्पष्ट होईल. शिवाय संपूर्ण हंगामात पावसाचे सारखे वितरण देखील महत्त्वाचे आहे. मान्सूनच्या प्रवासाचा मागोवा येत्या आठवड्यात शेअर बाजाराकडूनही त्यामुळे अतीव जिव्हाळ्याने घेतला जाईल.  

० आयपीओ बाजारातील चित्र
खरे तर, जून हा प्रारंभिक सार्वजनिक विक्री अर्थात आयपीओसाठी एक अवघड महिना असतो. तरीही जूनमध्ये अर्धा डझनहून अधिक आयपीओ खुले होण्याची अपेक्षा आहे. या नवागत कंपन्यांकडून होणारी निधी उभारणी जवळपास ८,००० कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. अधिक तपशील हे येत्या आठवड्यापासून पुढे येऊ लागतील.

० पुन्हा करोनाची भीती
नवीनतम जेएन.१ चे उत्परिवर्तन नव्याने करोना वाढीस कारणीभूत ठरले आहे. जरी ताजी प्रकरणे ही सौम्य स्वरूपाची असली तरी, रुग्ण संख्या विशेषतः महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून वाढत जाणे ही चिंतेची बाब आहे. त्यात आणखी वाढ दिसल्यास काळजीच्या उपाययोजना आणि परिणाम हे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या चिंतेतही भर घालतील.

० सेवा आणि उत्पादन क्षेत्राची कामगिरी
देशाच्या कारखानदारी क्षेत्राची सक्रियता दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय’ सोमवारी (२ जून) जाहीर होईल. हा निर्देशांक एप्रिलमधील ५८.२ पर्यंत असा किंचित वाढला. मजबूत क्रियाकलापांची परिस्थिती पाहता त्याने जून २०२४ नंतरचा सर्वात जलद विस्तार दर्शविला. १४ महिन्यांतील सर्वात मजबूत वेगाने उत्पादन वाढले आणि आता नवीन कार्यादेशांच्या आघाडीवर चांगल्या कामगिरीने मे महिन्याचा अंतिम आकडा काय असेल, याबद्दल उत्सुकता आहे. पीएमआय मोजपट्टीवर, ५० पेक्षा जास्त गुणांक विस्तार दर्शवितात तर त्याखालील आकड्याची नोंद आकुंचन दर्शविणारी असते. उत्पादन क्षेत्रापाठोपाठ सेवा क्षेत्राच्या कामगिरीचा माग घेणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’चा बुधवारी (४ जून) जाहीर होणाऱ्या आकड्याकडे बाजाराचे लक्ष असेल. एप्रिलमध्ये तो ५८.७ गुणांवर म्हणजेच बाजाराच्या अपेक्षांपेक्षा जास्त होता. सेवा क्रियाकलापांमध्ये वाढीचा हा सलग ४६ वा महिना आणि मार्च २०२४ नंतरचा सर्वात जलद महिना ठरला.

० सलग तिसरी व्याजदर कपात?
येणाऱ्या आठवड्याचा शेवटही बाजारासाठी उत्साहदायी राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या बैठकीचे निर्णय शुक्रवारी (६ जून) सकाळी गव्हर्नर संजय मल्होत्रा हे जाहीर करतील. पतधोरण समितीची बैठक ४ जूनला सुरू होऊन, ती ६ जूनपर्यंत चालेल. सध्या, रेपो दर ६ टक्के आहे आणि आधीच्या सलग दोन बैठकांमध्ये त्यात प्रत्येकी पाव टक्क्यांची कपात केली गेली आहे. आता ही कपातीची तिसरी खेप ठरेल, असा बहुतांश विश्लेषकांचा कयास आहे. मात्र तिचे प्रमाण काय असणार, या संबंधाने आशा-अटकळीतून बाजारात वर-खाली हालचाली संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील.