भारतीय सण आणि उत्सव हे केवळ विधी नसून आपला स्वभाव, जीवनशैली किंवा आवडीनिवडींचे अंतर्मुखपणे पुनर्मूल्यांकन करण्याची संधी असतात, असे म्हटले तर वावगे ठरू नये. नरक चतुर्दशीच्या पहाटे उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, कारीट फोडणे आणि तिळाचे तेल घालून पणत्यांचे प्रज्वलन, या सर्व कृतींच्या मागे चार शाश्वत संदेश आहेत: नकारात्मकतेचा नाश, आत्मशुद्धी, अहंकाराचा त्याग आणि ज्ञान-समृद्धीचा दीप प्रज्वलित करणे. या चारही कृती गुंतवणुकीच्या जगात तेवढ्याच अर्थपूर्ण आहेत.
गुंतवणुकीतील असुरांचा पराभव
गुंतवणूकीतील यश अर्थशास्त्रापेक्षा मानसशास्त्राशी अधिक निगडित आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला काही मानसिक असुर ग्रासण्याचा प्रयत्न करतात. जे त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करून योग्य निर्णय घेण्यात अडथळा निर्माण करतात. त्यातील काही प्रमुख असुर म्हणजे:
- बाजार घसरणीदरम्यान घाबरून घाईघाईने विक्री करणे: बाजारातील तीव्र घसरण ही गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची सर्वात चुकीची वेळी असते. या वर्तनामुळे तोटा कायमचा पक्का होतो आणि बाजार पुन्हा वधारल्यास नफा कमावता येत नाही.
- लोभ आणि अति-व्यापार: तेजीच्या काळात अतिलोभामुळे ‘मोमेंटम स्टॉक‘, ‘हॉट टिप्स’, ‘पेनी स्टॉक्स’ किंवा अधिक जोखमीच्या वायदे व्यवहारांकडे ओढा निर्माण होतो. पटकन श्रीमंत होण्याची स्वप्ने अनेकदा संपत्तीच्या ऱ्हासाकडे नेतात.
- अतिआत्मविश्वास: अनेक गुंतवणूकदारांना असे वाटते की, ते बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवू शकतात. तेजीच्या आधी खरेदी आणि घसरणीआधी विक्री बेरकीपणे करू शकतात किंवा विजेत्या कंपन्या अचूक निवडू शकतात. या अतिआत्मविश्वासामुळे अनेकदा गुंतवणुकीचे निर्णय चुकून मोठा तोटा होतो. कारण वैविध्य हे धोका कमी करण्याचे साधन आहे, हेच मूळ विसरले जाते.
- कळपाची मानसिकता: सगळेजण एखाद्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ), स्मॉल-कॅप किंवा ‘एफअँडओ’पाठी धावत असतील तर त्यांचे अनुसरण करणे लोकांना अधिक सुरक्षित वाटते. पण इतिहास असे दाखवतो की, समूहाची मानसिकता ही अनेकदा संपत्ती ऱ्हासास कारण ठरते आणि गुंतवणूकदार मोठ्या घसरणीला सामोरे जातात.
- तोटा टाळणे: नुकसान स्वीकारणे कठीण वाटल्याने अनेक जण तोट्यात असलेले शेअर तसेच बाळगून ठेवतात. किमान या किमतीला घेतले त्या किमतीला आल्यावर तरी विकू या आशेने ते निर्णय घेत नाहीत. या वर्तनामुळे बऱ्याचदा तोटा अधिक वाढतो, कारण भांडवलाला वृद्धीची संधीच मिळत नाही.
-अलीकडील घटनांचा प्रभाव: बाजारातील अलीकडच्या चढ-उतारांचा प्रभाव मोठा ठरतो आणि दीर्घकालीन मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष होते. यामुळे इतिहासातील नफा मिळवून दिलेल्या कंपन्यांचेच समभाग पुन्हा खरेदी केले जातात किंवा कालच्या घसरणीची पुनरावृत्ती होण्याची भीती वाटते.
हे असुर जर नियंत्रणात नसतील तर नरकासुराने दंतकथेतील लोकांना गुलाम बनवले होते, तितक्याच प्रभावीपणे संपत्तीला गुलाम बनवतात. खरे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे या असुरांना ओळखून त्यांच्यावर विजय मिळवणे आहे.
गुंतवणूक-पोर्टफोलिओची सफाई
जसे नरक चतुर्दशीच्या दिवशी शरीर आणि गृहशुद्धी केली जाते, तसेच गुंतवणुकीतही वेळोवेळी पोर्टफोलिओची स्वच्छता आवश्यक असते. जेणेकरून गुंतवणूक मजबूत आणि आर्थिक ध्येयांशी सुसंगत राहील.
अनावश्यक गुंतवणुकींची विक्री: ज्या कंपन्यांचा किंवा फंडांचा मूलभूत पाया कमकुवत झाला आहे किंवा जे तुमच्या उद्दिष्टांशी जुळत नाहीत, त्यातून बाहेर पडा. तोट्यात असलेल्या गुंतवणुका धरून ठेवणे हे तोटा-टाळण्याच्या असुराच्या प्रभावाचे लक्षण आहे.
संतुलनासाठी पुनर्संतुलन: कालांतराने समभाग कर्जरोखे किंवा मौल्यवान धातू त्यांच्या इच्छित वाटपापासून दूर जाऊ शकतात. पुनर्संतुलन शिस्त पोर्टफोलिओ पुनर्संचयित करते, हे दिवाळीत घरस्वच्छतेसारखेच आहे.
गुंतागुंत टाळा: खूप फंड किंवा शेअरमध्ये गुंतवणूक असल्यास गोंधळ निर्माण होतो. एकाच प्रकारचे म्युच्युअल फंड असलेल्या फंडांमुळे प्रत्यक्षात वैविध्य साधले जात नाही आणि देखरेखीची शिस्त कमकुवत होते. सरलीकरण स्पष्टता आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता सुनिश्चित करते. साधेपणा म्हणजे स्पष्टता.
खर्च आणि करकार्यक्षमता तपासा: ‘एक्स्पेन्स रेशो’, ‘एक्झिट लोड’, कर परिणाम तपासणे म्हणजे लपलेली धूळ शोधणे. अशा छोट्या त्रुटी दीर्घकाळात मोठा परिणाम करू शकतात.
लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की, ही पोर्टफोलिओची साफसफाई वर्षातून एकदा केली जाणारी क्रिया नाही. ती नियमित असावी. मात्र नरक चतुर्दशीचा संस्कार आपल्याला थांबून विचार करण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची आठवण करून देतो.
विनम्रता विरुद्ध बाजाराविषयी अहंकार
नरकासुराच्या अहंकारामुळे त्याचे पतन झाले. गुंतवणुकीत, अहंकार म्हणजे जोखीम दुर्लक्षित करणे किंवा आपली भाकिते नक्की खरी ठरतील, असा समज ठेवणे. पण बाजार भल्याभल्यांनाही नेहमीच नम्रतेचा धडा शिकवतो.
विनम्रता म्हणजे आपल्या नियंत्रणात काय आहे हे ओळखणे. मालमत्ता वाटप, विविधीकरण, शिस्तबद्ध बचत आणि काय आपल्या नियंत्रणाबाहेर आहे ते मान्य करणे.
अहंकार धोक्याच्या मागे धावायला लावतो तर विनम्रता दीर्घकालीन संपत्ती टिकवते.
ज्ञानाच्या दिव्याचे प्रज्वलन
- गुंतवणूकदारांसाठी दिवा म्हणजे ज्ञान. इथे शिक्षण कधीही पूर्ण होत नाही आणि आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे म्हणजेच आर्थिक अंधाराचा नाश करत राहणे आवश्यक आहे.
- संशोधनपर लेख आणि संशोधन अहवाल वाचा; समाजमाध्यमांवर विसंबून राहू नका किंवा ते बघून निर्णय अजिबात घेऊ नका.
- दीर्घकालीन दृष्टिकोन देणारे पॉडकास्ट, मुलाखती ऐका.
- अनुभवी गुंतवणूक सल्लागार आणि विचारवंतांचे निरीक्षण करा. जे विदा (डेटा) आणि अनुभवाने त्यांचे विचार समर्थित करतात.
- स्वतःच्या गुंतवणूक निर्णयांचे पुनरावलोकन करा. यश आणि अपयशाचा आढावा आपल्याला सदैव शिकवण देत असतात.
आर्थिक साक्षरता, कठोर संशोधन आणि खरा सल्ला हेच संपत्ती निर्मितीचे दीप आहेत. हे दीप अंधाराला स्पष्टतेत, भीतीला आत्मविश्वासात आणि तर्कहीन अटकळींना ज्ञानाधारित निर्णयांमध्ये रूपांतरित करतात.
या नरक चतुर्दशीला तुमच्या घरातले दिवे केवळ समृद्धीचे नव्हे, तर गुंतवणुकीतील प्रज्ञेचे प्रतीक बनावेत आणि तुमची संपत्ती पिढ्यान्पिढ्या टिकावी, अशी प्रार्थना करून आपणा सर्वांना दिवाळसणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.