आपण सातत्याने विविध प्रकारे गुंतवणूक करत असतो. यासाठी प्रत्येक वेळेला मोठीच रक्कम आपल्याकडे असली पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळेला अगदी छोटी म्हणजे दोनशे-पाचशे रुपयांची रक्कम सुद्धा मासिक गुंतवणूक म्हणून आपण चालू केली तरीसुद्धा आपण एक चांगली रक्कम काही वर्षांनंतर मिळवू शकतो. हे करत असताना आपल्याला गुंतवणुकीचे विविध प्रकार माहिती झालेले आहेत. ही गुंतवणूक SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या पद्धतीने आपण करत असतो आणि बऱ्याच वेळेला ही रक्कम छोट्या पिग्मी एजंट किंवा म्युच्युअल फंडामध्ये आपण करत असतो. परंतु आज आपण डिजिटल सोन्यामध्ये SIP करू शकतो का? आणि ती कशी करता येईल? किंवा तिचे फायदे तोटे काय आहेत याचा विचार करूया.

आणखी वाचा: Money Mantra: समभागाच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्याची करआकारणी

आज सोने खरेदी करायचं म्हटलं तर जवळपास ६० हजार रुपये खिशात असायला हवेत दहा ग्रॅम साठी. आणि ही रक्कम तसं पाहायला गेलं तर अति सामान्यांसाठी किंवा सामान्यांसाठी सुद्धा ताबडतोब उपलब्ध होणे शक्य होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला विविध ज्वेलर्स, त्यांच्या विविध योजना समोर येतात ज्याला भिशी योजना म्हटलं जातं. या योजनेमध्ये ग्राहक मासिक रु. १००० पासून पुढे कितीही रक्कम ११ महिन्यांसाठी भरतो आणि तेवढीच रक्कम म्हणजे मासिक भरण्याची रक्कम तो सोनार बाराव्या महिन्यामध्ये स्वतः टाकतो आणि तेराव्या महिन्यांमध्ये आपल्याला सोने खरेदी करता येतं. आता या योजनेचा आपण व्यवस्थित विश्लेषण करूयात.

आणखी वाचा: Money Mantra: मोबाईल बँकिंग आणि UPIचे फायदे

दर महिन्याला समजा अमित साहेब १०,००० रुपये भरत आहेत आणि ही सुरुवात त्यांनी एक जानेवारी २०२३ रोजी केलेली आहे. त्यावेळी सोन्याचा भाव आपल्या सोयीसाठी ५५ हजार रुपये प्रति तोळा होता असं गृहीत धरू. अमित साहेबांनी जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत प्रति महिना १०,००० रुपये भरले आणि त्यांच्या संबंधित सोनाराने बाराव्या महिन्यांमध्ये १०,०००ची रक्कम त्यांच्या खात्यावर स्वतः टाकली. आता तेराव्या महिन्यांत म्हणजे एक जानेवारी २०२४ ला अमितजींना एक लाख २०,०००चं सोनं खरेदी करता येणार आहे. आता या व्यवहारांमध्ये अमितजींनी जेव्हा सुरुवात केलेली होती तेव्हाचा भाव 55 हजार रुपये प्रति तोळा होता. तर आताचा भाव ६०,००० रुपये प्रति तोळा झालेला आहे असं गृहीत धरूया. तर अमितजींना जेव्हा सोन्याची खरेदी करायची आहे त्या दिवशीचा भाव हिशोबासाठी लावला जाणार, म्हणजेच या ठिकाणी अमितजींना ६०,००० रुपये प्रति तोळ्याप्रमाणे भाव पूर्ण केला जाईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर अमितजींना या एक लाख वीस हजार रुपयांचे दागिनेच घ्यावे लागतील, त्यांना वेढणी किंवा बिस्किट दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. मग या व्यवहारांमध्ये त्या दागिन्यांसाठी किमान आठ टक्के ते पुढे कितीही घडणावळ लावली जाईल. या घडणावळीवर सराफ ५० टक्क्यांपर्यंत सूट नक्की देतील परंतु तरीसुद्धा दागिन्यांच्या घडणावळीवर एक मोठी रक्कम त्यांना द्यावी लागेल किंवा हिशोबामध्ये ऍडजेस्ट करावी लागेल. हा झाला एक प्रकार जो प्रत्यक्ष सोन्यामध्ये SIP च्या पद्धतीने गुंतवणूक करता येतो.

आज आपण अजूनही काही कंपन्यांचे जे डिजिटल काम करतात त्यांच्याशी या योजनेला तुलनात्मक अभ्यासामध्ये पाहूयात.

काही कंपन्या ग्राहकांना केवळ एक हजार रुपये प्रति तोळा बुकिंगची रक्कम भरून सोनं बुक करण्याची सुविधा देतात, योजनेला आपण वरील योजनेच्या कालावधी बरोबर तुलनात्मकतेसाठी वापरून पाहूयात…

समजा अमितजींनी एक जानेवारी २०२३ ला तेवढीच रक्कम या डिजिटल गोल्डमध्ये काम करणाऱ्या कंपनीबरोबर गुंतवण्यास सुरुवात केली, म्हणजे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ही डिसेंबरची रक्कम सुद्धा अमितजींनीच भरली तर या कालावधीमध्ये त्यांनी एक लाख वीस हजार रुपये संबंधित कंपनीला दिले परंतु या व्यवहारांमध्ये खालील प्रमाणे फायदे अमितजींना मिळतील.

पहिला फायदा म्हणजे एक जानेवारी २०२३ चा सोन्याचा भाव पहिल्याच दिवशी निश्चित झाला, त्यामुळे अमितजींना पूर्ण बारा महिने पैसे भरावे लागले नाहीत ५५ हजार रुपये गुणिले दोन तोळे म्हणजे एक लाख दहा हजार रुपये अमितजींनी भरले आणि त्यांना एक जानेवारी २०२४ ला दोन तोळे सोनं मिळालं या योजनेमध्ये दहा हजार रुपयांचा प्रत्यक्ष फायदा झाला कारण सोन्याचा भाव ५५ हजार रुपये वरून साठ हजार रुपये झालेला होता परंतु ही भाव वाढ त्यांना द्यावी लागली नाही कारण अमितजींनी सोन्याचा भाव पहिल्याच दिवशी फिक्स केलेला होता आणि या कामी त्यांना केवळ बाराशे पन्नास रुपये प्रति तोळा बुकिंग ची रक्कम द्यावी लागली, ज्यामुळे अमितजींना या संपूर्ण व्यवहारांमध्ये केवळ २५०० रुपये जास्त द्यावे लागले.

प्रत्यक्ष सोन्यासाठी सराफा बरोबर काम करताना सोन्याचा भाव मॅच्युरिटीच्या वेळेस जो होता तो घ्यावा लागल्यामुळे तसं पाहायला गेलं तर त्यांना दहा हजार रुपयांचं नुकसान झालं.

तर डिजिटल गोल्ड मध्ये बुक केलेले सोनं घेताना २४ कॅरेट सोनं मिळालं त्यामुळे त्यांना त्यावर कुठलीही घडणावळ द्यावी लागली नाही. त्यांची ही रक्कम तर वाचलीच, पण सोबत २४ कॅरेट सोनं मिळाल्यामुळे विक्री करताना कुठल्याही प्रकारची झळ कापली जाणार नाही. प्रत्यक्ष सोनं घेताना दागिने दिल्यामुळे अमितजींना तेथे घडणावळ द्यावी लागली जी ते सोनं विकताना परत मिळणार नाही शिवाय २४ कॅरेट मध्ये दागिने बनत असल्यामुळे परत विक्री करताना त्यांना भाव २२ कॅरेट चा मिळणार आहे.

तर या उदाहरणातून आपल्याला काय लक्षात आलं की जर तुम्ही सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून पाहत आहात तर अशावेळी तुम्हाला डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होईल. ही गुंतवणूक करताना तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळेल आणि आपला गुंतवणुकीचा उद्देश पूर्ण होईल. परंतु तुमचा उद्देश जर दागिने घेणे हाच असेल तरीसुद्धा आधी डिजिटली माध्यमातन सोनं बुक करून मग मॅच्युरिटीच्या वेळेस दागिने घेणे तुम्हाला अधिक फायद्याचं ठरू शकतं.