RRP Semiconductor clarifies on Sachin Tendulkar : आरआरपी सेमीकंडक्टर कंपनीच्या शेअर्सचे भाव १८ महिन्यात ५७००० टक्क्यांनी वाढल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आरआरपी सेमीकंडक्टरने १४ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले की, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्यांच्या कंपनीचे कोणतेही शेअर्स खरेदी केलेले नाहीत आणि तो त्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर देखील नाही.

कंपनीच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाल्यामुळे हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, या कंपनीचे शेअर्स एप्रिल २०२४ पासून तब्बल ५७००० टक्क्यांनी वाढले आहेत. याबरोबरच कंपनीने त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून १०० एकर जमीन विकत घेतलेली नाही असेही स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे.

कंपनीने काय म्हटलं आहे?

“सोशल मीडियावर काही बेजबाबदार व्यक्तींकडून सरवल्या जात असलेल्या अफवांच्या संदर्भात, आम्ही खालीलप्रमाणे स्पष्टीकरण देऊ इच्छितो :

१. महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी कंपनीचे कोणतेही शेअर्स कधीही खरेदी केले नाहीत. ते कंपनीत शेअर होल्डर नाहीत.

२. महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर कंपनीच्या संचालक मंडळाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कसलाही संबंध नाही आणि ते मंडळाचा भागही नाहीत किंवा ते कंपनीचे एखादे सल्लागार म्हणूनही काम करत नाहीत.

३. महान किकेटक सचिन तेंडुलकर हे कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर नाहीत

४. कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून कुठलीही १०० एकर जमीन मिळालेली नाही; आणि

५. कंपनीने बीएसई (BSE) साइटवर बोर्ड माहितीचा भाग म्हणून जी समभाग किंमत १० रुपयांवरून ९,००० रुपयांपर्यंत वाढल्याचे दाखवण्यात आले आहे, ते कंपनीच्या आर्थिक स्थितीशी जुळणारे नाहीत,” असे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला केलेल्या फाइलिंगमध्ये सांगितले.

“पुढे कंपनी असेही स्पष्ट करते की फक्त जवळपास ४००० शेअर्स हे डिमॅट मोडमध्ये आहेत ज्यांचे बाजारात पब्लिक शेअरहोल्डर्स आणि विशिष्ट व्यक्तींकडून अनैतिक मार्गाने ट्रेडिंग केले जात आहेत. यामुळे हे कंपनीच्या आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ज्यांचा कंपनीशी कोणताही संबंध नाही, त्यांच्या प्रतिष्ठेला हानिकारक ठरत आहे,” असे आरआरपी सेमीकंडक्टरने पुढे स्पष्ट केले.

गेल्या एका वर्षात शेअर्सची किंमत १३००० टक्क्यांनी वाढल्यामुळे आणि एप्रिल २०२४ मध्ये लिस्टेड झाल्यापासून ५७००० टक्क्यांनी वाढल्याने कंपनीला हे स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. १४ ऑक्टोबर दुपारी २ वाजता आरआरपी सेमिकंडक्टरचे शेअर्स बीएसईवर २ टक्के अप्पर सर्किटमध्ये ८५८४ प्रति शेअर ट्रेडिंग करत होते.