Journey Of Sun Pharma’s MD Kirti Ganorkar: देशातील औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने जूनमध्ये कीर्ती गणोरकर यांच्या नावाची कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून घोषणा केली होती. त्यानंतर १ सप्टेंबर २०२५ पासून कीर्ती गणोरकर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानंतर गणोरकर यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कंपनीतील कामाला कशी सुरुवात केली आणि या पदापर्यंत ते कसे पोहोचले याचे वर्णन केले आहे.

कीर्ती गणोरकर लिंक्डइनवर लिहिलेल्या आपल्या पोस्टला सुरुवात करताना म्हणाले की, “मी इथे माझी पहिली पोस्ट लिहित आहे. आता माझा सन फार्मासोबतचा प्रवास कसा सुरू झाला याकडे वळूया. ती ९० च्या दशकाची सुरुवात होती आणि मला टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिलीप संघवी यांच्या कार्यकारी सहाय्यक पदासाठी आलेली जाहिरात वाचायला मिळाली. मी तरुण आणि उत्साहित होतो. त्यामुळे विचार केला, यासाठी का प्रयत्न करू नये? म्हणून, मी सन फार्माच्या बडोद्यातील सिनर्जी हाऊस येथील कार्यालयात मुलाखतीसाठी दाखल झालो.”

पहिल्या पगाराच्या वाटाघाटी

गणोरकर यांनी पुढे पोस्टमध्ये म्हटले की, “तो दिवस थोडासा धावपळीचा होता. काही अपरिहार्य कारणांमुळे सकाळी नियोजित करण्यात आलेली माझी मुलाखत रात्री ९ वाजता सुरू झाली. मुलाखत रात्री १०:३० वाजता संपली आणि मला रात्री ११ वाजता मुंबईला जाणारी रेल्वे पकडायची होती. त्यावेळी एचआर विभागाचे प्रमुख भागवत याज्ञिक यांनी मला त्यांच्या मारुती ८०० मध्ये बसवले आणि आम्ही बडोद्याच्या रस्त्यांवरून स्टेशनवर पोहोचलो. सन फार्माचे कार्यालय ते स्टेशनदरम्यान भागवत याज्ञिक ट्रॅफिकमधून गाडी चालवत माझ्याशी पगाराच्या वाटाघाटी करत होते. त्यांनी हे सर्व इतक्या उबदार आणि सहजपणे कसे हाताळले हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि हा मला सन फार्मात शिकायला मिळालेला पहिला धडा होता.”

नवी भूमिका

सन फार्मातील सध्याच्या भूमिकेबाबत गणोरकर यांनी लिहिले की, “त्या प्रवासाने मला स्टेशनसह सन फार्मामध्येही पोहोचवले. आता अनेक दशकांनंतर, मी सनच्या जागतिक विस्ताराला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामध्ये अमेरिकेत आमच्या स्थलांतरासाठी पायाभूत सुविधा तयार करणे, जपानमध्ये आमचे पहिले पाऊल टाकणे, जगभरातील युनिट्सचे नेतृत्व करणे आणि मोठ्या आव्हानांना तोंड देणे यांचा समावेश आहे.”

नेतृत्व करणे म्हणजे…

“परंतु मी शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेतृत्व करणे म्हणजे तुमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असणे नाही. नेतृत्त्व म्हणजे लोक जोडणे, योग्य प्रश्न विचारणे, सर्वांचे म्हणणे ऐकूण घेणे आणि सनमध्ये मी पहिल्यांदा अनुभवला तो मानवी स्पर्श जपणे आहे”, असे गणोरकर नेतृत्त्वाबाबत बोलताना म्हणाले.