Mehli Mistry out From Tata Trusts : भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहापैंकी एक असलेल्या टाटा समूहात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर एका वर्षांतच टाटा समूहात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. रतन टाटा यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे मेहली मिस्त्री हे टाटा ट्रस्टमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

मेहली मिस्त्री यांचा टाटा धर्मादाय संस्थांमधील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. मात्र, मेहली मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीसाठी ट्रस्टमधील बहुतेक विश्वस्तांनी विरोध केला आहे. खरं तर टाटा ट्रस्टच्या विश्वस्तपदाचा मेहली मिस्त्री यांचा कार्यकाळ २८ ऑक्टोबरपर्यंतच आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ द्यायची की नाही? यावरून दोन गट पडले असून बहुतेक विश्वस्तांनी मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे.

गेल्या आठवड्यात एका परिपत्रक ठरावाच्या माध्यमातून सहा विश्वस्तांपैकी तीन विश्वस्तांनी मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केल्यामुळे मिस्त्री टाटा ट्रस्टच्या गव्हर्निंग बोर्डमधून पायउतार होणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध करणाऱ्या तीन विश्वस्तांमध्ये टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, टीव्हीएस ग्रुपचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, सर दोराबजी टाटा ट्रस्टमध्ये दारायस खंबाटा आणि प्रमित झवेरी यांनी मिस्त्री यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला पाठिंबा दिला आहे, तर सर रतन टाटा ट्रस्टमध्ये खंबाटा आणि एचसी जहांगीर यांनी त्यांच्या बाजूने मतदान केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी पाहता टाटा समूहात मागील काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद सुरू असल्याचं दिसून येत आहे.

मेहली मिस्त्री यांना पहिल्यांदा २०२२ मध्ये विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा कार्यकाळ आज (२८ ऑक्टोबर) रोजी संपत आहे. पण मेहली मिस्त्री यांचा कार्यकाळ संपत असताना तिन्ही विश्वस्तांनी त्यांच्या पुनर्नियुक्तीला मान्यता दिली नसल्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.