Tata Motors Jaguar Land Rover Cyber Attack Loss: टाटा मोटर्सची ब्रिटनस्थित उपकंपनी जग्वार लँड रोव्हरला सायबर हल्ल्यामुळे २ अब्ज पौंडचा (सुमारे २४० अब्ज रुपये) आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षातील त्यांच्या संपूर्ण नफ्यापेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजार उघडताच टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली, तसेच शेअरने दिवसातील ६५५.३० रुपयांची नीचांकी पातळीही गाठली आहे.

नुकसान भरपाईसाठी विमा नाही

फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार, जग्वार लँड रोव्हरला सायबर हल्ल्यामुळे प्रमुख कारखान्यांमधील उत्पादन थांबवावे लागले आहे. विशेष म्हणजे, जग्वार लँड रोव्हरने अशा घटनेपासून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी कोणताही विमा उतरवला नव्हता, त्यामुळे कंपनीवरील आर्थिक ताण वाढला आहे. कंपनीने आधी २४ सप्टेंबरपर्यंत उत्पादन थांबवले होते. त्यानंतर त्यात १ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी दर आठवड्याला अंदाजे ५० दशलक्ष पौंड (सुमारे ६ अब्ज रुपये) तोटा सहन करत आहे. कंपनीने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. त्यांच्या ३३,००० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना समस्या सुटेपर्यंत घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सच्या महसुलात जग्वार लँड रोव्हरचा ७० टक्के वाटा

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टाटा मोटर्सच्या एकूण महसुलात जग्वार लँड रोव्हरचा वाटा सुमारे ७० टक्के आहे. तांत्रिक विश्लेषणावरून असे दिसून येते की टाटा मोटर्सचा शेअर त्याच्या १० आणि २० दिवसांच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा कमी पातळीवर व्यवहार करत आहे. आज मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्सचा शेअर ६७३ रुपयांवर उघडला असून त्याने ६५५.३० रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर शेअर ६५० रुपयांच्या खाली गेला तर तो ६०८ रुपयांपर्यंत घसरू शकतो.

या परिस्थितीमुळे ब्रिटनचे वाणिज्य मंत्री पीटर काइल आणि उद्योग मंत्री ख्रिस मॅकडोनाल्ड यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला जग्वार लँड रोव्हरच्या कार्यालयाला भेट देत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सायबर हल्ल्याच्या परिणामांबद्दल चर्चा केली आहे.

जीएसटी दर कपातीनंतर भारतात टाटा मोटर्सच्या वाहनांच्या मागणीत वाढ होत असतानाच या सायबर हल्ल्यामुळे व्यत्यय आला आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी टाटा मोटर्सने १० हजार चारचाकी वाहनांची विक्री केली होती.