Neal Mohan on Nikhil Kamath Podcast: एखादा चांगला कर्मचारी किंवा पदाधिकारी कंपनी सोडून जात असेल, तर त्याला कंपनीतच थांबवण्यासाठी व्यवस्थापन अधिक पगार किंवा पदाची ऑफर देण्याची शक्यता असते. पण एका पदाधिकाऱ्याला कंपनीतच थांबवण्यासाठी गुगलनं तब्बल ८५५ कोटी रुपये देऊ केल्याची बाब आता समोर आली आहे. खुद्द यूट्यूब सीईओ नील मोहन यांनीच एका पॉडकास्टवर या दाव्याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे २०११ साली म्हणजे जवळपास १५ वर्षांपूर्वी हे ८५५ कोटी नील मोहन यांना देण्यात आले होते! फायनान्शियल एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी People by WTF या पॉडकास्टवर नील मोहन यांची नुकतीच मुलाखत घेतली. या मुलाखतीत नील मोहन यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात सोशल मीडियाचा प्रभाव राजकीय क्षेत्रावरील प्रभावापासून यूट्यूबच्या धोरणांपर्यंत अनेक बाबींचा समावेश होता. त्यातच २०११ साली नील मोहन यांना गुगलनं ट्विटरमध्ये जॉईन होण्यापासून रोखण्यासाठी व कंपनीतच राहण्यासाठी तब्बल ८५५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

काय घडलं २०११ मध्ये?

तत्कालीन ट्विटरमध्ये (सध्याचे एक्स) व्यवस्थापन त्यांच्या प्रोडक्ट शाखेसाठी अनुभवी नेतृत्वाच्या शोधात होतं. चीफ प्रोडक्ट ऑफिसर पदासाठी त्यांना नील मोहन अतिशय योग्य व्यक्ती वाटले. त्यासाठी ट्विटरनं त्यांना या पदावर येण्याबाबत विचारणा केली होती. नील मोहन यांचे पूर्वीचे वरीष्ठ डेविड रोसेनब्लाट हे तत्कालीन ट्विटर बोर्ड सदस्य होते. नील मोहन यांनी ट्विटरमध्ये चीफ प्रोडक्ट ऑफिसर म्हणून रुजू व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी नील मोहन यांनी गुगलमधून बाहेर पडण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आली होती.

टेकक्रंचच्या हवाल्याने फायनान्शिय एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, गुगलनं नील मोहन यांना दिलेली ऑफर ही शेअर्सच्या स्वरुपातली होती. नंतरच्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने हे शेअर्स त्यांच्या नावावर वळते केले जाणार होते.

काय म्हणाले निखिल कामत?

निखिल कामत यांनी त्यांच्या पॉडकास्टवर यासंदर्भात विधान केलं. “मला हे वाचल्याचं आठवतंय की तुम्हाला गुगलनं कंपनी न सोडण्यासाठी तुम्हाला १०० मिलियन डॉलर्स देऊ केले होते. ही आजची रक्कम नाही, १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा १०० मिलियन डॉलर्स म्हणजे खूप मोठी रक्कम होती”, असं निखिल कामत म्हणाले. यावर नील मोहन यांनी हा दावा फेटाळला नाही.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtube ceo neal mohan confirms got 855 crore from google to not quit on nikhil kamath podcast pmw