फडताळात पुन्हा जागच्या जागी गेलेली दाराची तोरणे, रोषणाईच्या माळा, रांगोळीचे डबे आणि डब्यांच्या तळाशी गेलेला फराळ दिवाळीचा उत्साह ओसरल्याचे दाखवून गेला असला तरी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दिवाळी आता कुठे सुरू झाली आहे. दिवाळीआधी महिनाभर राबून तयार केलेल्या विविध गोष्टी विकून त्यामधून मिळालेल्या मिळकतीतून काही विद्यार्थ्यांचा वर्षभराच्या ‘पॉकेटमनी’चा प्रश्न सुटला आहे, तर काहींच्या पुढील शैक्षणिक वर्षांच्या खर्चाची तरतूद झाली आहे. अंगभूत कलागुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांनी केलेल्या हंगामी व्यवसायातून त्यांना बरीच मिळकत मिळाली आहे. कंदील, पणत्या, घरगुती गोडाचे पदार्थ अशा छोटेखानी उद्योगातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वप्ने मुठीत आली..

बदलापूर येथे राहणारी फाल्गुनी पवार नृत्यकलेत निपुण असली तरी, हस्तकलेच्या आवडीला जोपासण्याकरिता आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या हेतूने यंदाच्या दिवाळीत तिने बरेच उद्योग केले. भरत कॉलेज ऑफ फाइन आर्ट या नृत्य महाविद्यालयात गुरू संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुनी भरतनाटय़म नृत्यशैलीचे धडे गिरवत आहे. मात्र अंगी असणाऱ्या हस्तकौशल्याच्या वेडापाई त्या कलेशी निगडित बरेच प्रकार ती तयार करीत असते. ‘ड्रिम कॅचर’ हा तरुणाईला वेड लावणारा प्रकार बनविण्याच्या उद्योग ती गेल्या काही वर्षांपासून करत आहे. या माध्यमातूनच यंदाच्या दिवाळीत तिने पर्यावरणपूरक कागदी कंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कागदी कंदिलांपासून ते दिवे आणि तोरण बनविण्याचे प्रशिक्षण तिने लहान मुलांना दिले. याशिवाय १५० कंदील बनवीत त्यांची विक्रीही तिने केली. यासाठी समाजमाध्यमाचा पुरपूरे उपयोग केल्याचे फाल्गुनीने सांगितले. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स-अप माध्यमातून कंदील विक्रीचे संदेश तिने पाठविले, त्याला प्रतिसाद देत अनेकांनी या कंदिलांची खरेदी केली. याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून एका सामाजिक संस्थेला मोफत फाल्गुनीने कंदील बनवून दिले. तसेच कागदी पटय़ा दुमडून तयार केलेल्या वजनाने हलक्या अशा आभूषणांची विक्री समाजमाध्यमांच्या बळावर तिने दिवाळीच्या काळात केली.

व्यवसायही आणि पर्यावरणही

पर्यावरण विज्ञान विषयातून यंदाच्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या संजुक्ता मोकाशी ही गेली तीन वर्षे दिवाळीच्या दिवासांमध्ये चॉकलेट विकण्याचा व्यवसाय करीत आहे. विशेष म्हणजे घरघुती पातळीवर चॉकलेट तयार करून आणि त्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत संजुक्ता दिवाळीत हा व्यवसाय करते. वेगवेगळ्या चवींची आणि आकाराची चॉकलेट तयार करणे ही संजुक्ताची खासीयत आहे. गेल्या वर्षी वर्तमानपत्रांची टोपली तयार करून त्यामध्ये चॉकलेट भरून संजुक्ताने विक्रीमध्ये नावीन्य आणले होते, यंदा अशाच पद्धतीने मातीचा ‘ट्रे’ तयार करून त्यामध्ये चॉकलेट विक्री करण्याची शक्कल संजुक्ताने लढवली आणि त्याला ग्राहकांनीदेखील मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला. आईच्या सहकार्याने संजुक्ताने वेगवेगळ्या प्रदर्शनांच्या माध्यमातून चॉकलेटची विक्री केली. या विक्रीतून झालेली मिळकत माझ्यासाठी दिवाळीनंतरचा ‘बोनस’ असल्याचे संजुक्ता सांगते.

आनंदाचे दिवे

रु ईया महाविद्यालयात कला शाखेच्या अखेरच्या वर्षांला असणाऱ्या सुकन्या नाईक या विद्यार्थिनीने दिवाळीत दिवेविक्रीचा व्यवसाय केला. हस्तकौशल्याकडे लहानपणापासूनच ओढा असल्याने आकर्षक वस्तू तयार करून मित्र-मत्रिणींना भेट म्हणून देण्याचा तिचा छंद. यातूनच व्यवसायात रूपांतर करून वर्षभरापूर्वी तिने दिवे तयार करण्यास सुरुवात केली. दिव्यांवरचे सुंदर हस्तकौशल्य अनेकांना आवडल्याने तिचा व्यवसाय यशस्वी झाला. यासाठी तिने आई-वडिलांकडून पसे घेऊन या हंगामी उद्योग सुरू केला. समाजमाध्यमाच्या साहाय्याने तयार केलेल्या आकर्षक दिव्यांचे छायाचित्र तिने अनेकांना पाठविले. त्याद्वारे तिला ४० ते ४५ ऑर्डर मिळाल्या. मुख्य म्हणजे या माध्यमातून मला आत्मविश्वास मिळाला असून दुसऱ्या बाजूने आर्थिक फायदा झाल्याचेही सुकन्या हिने सांगितले.

कमाईतून शिक्षण

यंदाच्या दिवाळीत दादरच्या बाजारात सर्वाचे लक्ष कापडी आणि लोकरीच्या कंदिलांनी वेधून घेतले होते. या कंदिलांची निर्मिती करणाऱ्या विघ्नेश जांगळी याची खऱ्या अर्थाने पुढील शैक्षणिक वर्षांची तरतूद या कंदिलांच्या विक्रीतून झाली आहे. विघ्नेश जे.जे.कला महाविद्यालयात अप्लाइड आर्ट या विभागात दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. या वर्षी त्याने सहा हजारांहून अधिक निरनिराळ्या रंगसंगतीचे कंदील दादर व मुलुंड येथील बाजारात विक्रीसाठी ठेवले होते. दर वर्षी कंदिलांच्या दहा-बारा डिझाइन बाजारात आणण्याचा विघ्नेशचा प्रयत्न असतो. कपडा आणि लोकरीच्या धाग्यापासून तयार करण्यात आलेले कंदील टिकाऊ असल्याने त्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे खप मोठा होत असल्याचे विघ्नेश सांगतो. या सगळ्या व्यवसायातून मिळालेल्या नफा पुढील शिक्षणाकरिता उपयोगात येईल असे, विघ्नेश याने आवर्जून सांगितले.