एमपीएससी मंत्र : विश्लेषण आणि तयारी

गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील पेपर एक संयुक्त पेपर व पेपर दोन पदनिहाय पेपर हा पॅटर्न सन २०१८ पासून लागू झाला आहे.

एमपीएससी मंत्र : विश्लेषण आणि तयारी
प्रतिनिधिक छायाचित्र

लिपिक टंकलेखक पदनिहाय पेपर

रोहिणी शहा

गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील पेपर एक संयुक्त पेपर व पेपर दोन पदनिहाय पेपर हा पॅटर्न सन २०१८ पासून लागू झाला आहे. या पद्धतीनुसार सन २०१८ व २०१९ या दोन वर्षी मुख्य परीक्षा झाली आहे. लिपिक टंकलेखक पदासाठीचा पेपर दोन या वर्षी १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण केल्यास या वर्षीच्या तयारीसाठी दिशादर्शक ठरेल. प्रत्येक घटकावर विचारण्यात येणा-या प्रश्नांची संख्या सोबतच्या कोष्टकामध्ये देण्यात आली आहे.

यापैकी बुद्धिमापन विषयक प्रश्नांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे. इतर घटकांच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

 इतिहास

इतिहास घटकामध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. मध्ययुगीन व आधुनिक कालखंडांवरील प्रश्न यामध्ये समाविष्ट आहेत. सन २०१८मध्ये बहुविधानी प्रश्न जास्त होते. केवळ एक प्रश्न हा सरळ सोट असा होता तर सन २०१९ मध्ये सर्वच प्रश्न हे तथ्यात्मक व सरळसोट प्रकारचे होते. सर्वच प्रश्न सोडविण्यासाठी नेमकी माहिती असणे आवश्यक असल्याचे लक्षात येते. त्यामुळे या पाच गुणांसाठीसुद्धा अभ्यास करताना पाठांतराचा शॉर्टकट उपयोगाचा नाही. एनसीईआरटी व राज्य पाठय़पुस्तक मंडळाची पुस्तके आणि सतीश चंद्रा याचे मध्ययुगीन भारत व बिपिन चंद्रा यांचे आधुनिक भारत ही पुस्तके अभ्यासावीत. या पुस्तकांचा मराठी अनुवाद केसागर प्रकाशनाने उपलब्ध करून दिला आहे.

 भूगोल

भूगोलामध्ये जग, भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरील प्रश्नांचा समावेश केलेला आहे. दूरसंवेदनावरही प्रश्न विचारलेला दिसून येतो. या घटकावरील प्रश्न तथ्यात्मक आणि बऱ्याच अंशी सरळसोट असे दिसून येतात. एकूण विषयाचा आवाका पाहता जागतिक भूगोलातील महत्त्वाची तथ्ये कोष्टकामध्ये नोट्स काढून पाठ करण्यापुरताच मर्यादित ठेवणे व्यवहार्य आहे. भारताच्या प्राकृतिक भूगोलावर तर महाराष्ट्राच्या आर्थिक, राजकीय व प्राकृतिक भूगोलावर भर देणे आवश्यक आहे. या घटकाच्या तयारीसाठी माजिद हुसेन यांचे वल्र्ड जिओग्राफी, जिओग्राफी ऑफ इंडिया आणि के. ए. खतीब यांचे महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

 नागरिकशास्त्र

नागरिकशास्त्र घटकामध्ये राज्यघटना, स्थनिक स्वराज्य शासन आणि राज्यव्यवस्था विषयातील मूलभूत संकल्पना / सिद्धांत विचारलेले दिसून येतात.या घटकावरील संकल्पनात्मक प्रश्न हे विषयाची समज असेल तर सोडविता येतील असे आहेत. तर तथ्यात्मक प्रश्नांची काठिण्य पातळी पाहता राज्यघटना व स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचे कायदे मूळातून व बारकाईने अभ्यासणे आवश्यक ठरते. शासनाचे प्रकार, त्यांचे चांगले वाईट गुणधर्म, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, घटनेतील महत्त्वाच्या तरतुदींमागचे तत्त्वज्ञान आणि हेतू, महत्त्वाची कलमे – मूलभूत हक्क, नितीनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, केंद्र राज्य संबंध, कायदा निर्मिती प्रक्रिया, केंद्र व राज्य कायदेमंडळे (संसद, विधानसभा, विधान परिषदा), न्यायपालिका, घटनात्मक पदे – याबाबतच्या तरतुदी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करताना ७३ व ७४वी घटना दुरुस्ती, महाराष्ट्रातील पंचायतराज संस्थांसाठीचे कायदे यामधील तरतूदी बारकाईने पाहाव्यात. या घटकाच्या अभ्यासाठी एम. लक्ष्मीकांत यांचे ‘इंडीयन पॉलिटी’ व के सागर प्रकाशनाचे ‘महाराष्ट्रातील पंचायतराज’ ही पुस्तके उपयुक्त आहेत.

 गणित

संख्यांचे प्रकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, अपूर्णाकांवरील क्रिया, लसावि, मसावि, समीकरणे, बहुपदी, आलेख, शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ, काम, वेग, अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता, क्षेत्रफळ, परिमिती यांवर आधारित प्रश्नांचा यामध्ये समावेश होतो.

मूलभूत अंकगणितावरील प्रश्न सोडविण्यासाठी सरावच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे दहावीपर्यंतची गणिताची तसेच के सागर प्रकाशनाची अंकगणितावरील पुस्तकेही तयारीसाठी उपयुक्त आहेत. पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात. शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण हे घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.

नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच, पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
CBSE 10th Result 2022 : सीबीएसई दहावी बोर्डात ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; जाणून घ्या निकाल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी