खरे तर, उद्योजक जन्माला यावा लागतो? की घडत जातो, हा पेच फार जुनाच आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील उदा. उद्योजक होण्यासाठी एका विशिष्ट कुटुंबात जन्म घ्यावा लागेल का? व्यवस्थापन विषयक उच्च शिक्षण (एम.बी.ए.) घेतल्यानंतरच उद्योजक होता येते का? किंवा भरपूर अनुभव गाठीशी असणे अथवा एखाद्या बलाढय़ उद्योजकाचे मार्गदर्शन मिळणे उद्योजकासाठी अत्यावश्यक ठरते का? वगरे वगरे.
तसे पाहायला गेलो तर आपल्यापकी दर तीन व्यक्तींमधील एक व्यक्ती आयुष्यात ‘एखाद्या दिवशी’ व्यापार सुरू करण्याचे स्वप्न पाहत असते, पण ही आकांक्षा प्रत्यक्षात उतरवणारे फक्त शंभरातले दोनच असतात. मनात असलेले व्यापार सुरू करण्याचे स्वप्न, सत्यात उतरवायचे असेल तर दोन गोष्टी अत्यावश्यक ठरतात. या गोष्टी म्हणजे जोखीम किंवा धोका पत्करण्याची पात्रता आणि जोखीम स्वीकारण्याची स्वेच्छा. प्रगती साधण्यासाठी उद्योगधंद्यात स्वेच्छेने जोखीम अंगावर घेण्याची धडाडी असणे हे यशस्वी उद्योजकाचे लक्षण आहे.
नुसते पोहण्यावरचे पुस्तक वाचून कोणी पोहायला थोडेच शिकू शकते? उलट जितका वेळ या वाचनात घालवाल, तितका पाण्यात पहिली उडी घ्यायला उशीर होईल. पोहणे शिकताना तुम्ही पाण्यात उतरण्याच्या तीन शक्यता असतात- एक तर तुम्हाला कोणी तरी पाण्यात ढकलावे लागते, किंवा पोहण्याच्या प्रशिक्षकासोबत तुम्ही पाण्यात उतरता, किंवा तुमचा ‘आतला आवाज’ तुम्हाला सांगतो- ‘मला पाण्यात उडी घेऊन जीव वाचवायला शिकायचे आहे.’
हा ‘आतला आवाज’ किंवा आव्हाने स्वीकारण्याची आणि त्यांचा सामना करण्याची ‘स्वेच्छा’ हाच उद्योजक होण्यासाठी लागणारा प्रमुख गुण आहे.
कदाचित तुमच्या मनात बऱ्याच वर्षांपासून एखाद्या नावीन्यपूर्ण वस्तूच्या उत्पादनाबद्दल किवा लोकांना एखादी कल्पक सेवा पुरविण्याबद्दल अथवा सध्याच्या बाजारपेठेत काही अभिनव बदल घडवण्याची कल्पना घोळत असेल. तुमच्या मनातल्या या कल्पनाबीजाचे जेव्हा फलन किंवा विस्तार होईल तेव्हाच तुमचे उद्योजक बनण्याचे स्वप्न आकार घेईल. अजूनही निर्णय घेण्याबाबत तुम्ही संभ्रमात असाल, साशंक असाल तर स्वत:लाच काही प्रश्न विचारून पाहा.
० माझ्याकडे पुरेशी आíथक पुंजी आहे का?
० माझ्याकडे योग्य माणसांचा ताफा आणि साधनसामग्री आहे का?
० तयार होणाऱ्या उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी बाजारपेठ उपलब्ध आहे का?
० प्रस्तावित व्यापार किंवा उद्योग कसा करावा, याची इत्थंभूत माहिती मला आहे का?
आíथक मदतीसाठी अनेक वित्तसंस्था, भांडवलदार, मित्र, आप्त उपलब्ध असतात. बाजारपेठेचा अभ्यास आणि आढावा यातून उत्पादित मालाला कोठे आणि किती मागणी असेल याचा अंदाजही बांधता येतो. शिवाय उद्योगधंद्यातील फायदे-तोटे, खाचाखोचा शिकवणारी अनेक पुस्तकेही बाजारात आहेत. मग आता ‘एखाद्या दिवशी’ उद्योग सुरू करण्याचे तुमचे स्वप्न, सत्यात उतरवायला वाट कसली पाहताय? अजूनही तुमच्या मनात किंतू असेल तर मात्र आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला एखाद्या व्यवस्थापन शिक्षणक्रमाची मदत घेता येईल. अशा प्रशिक्षणातील पदवी तुमच्यात उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची ‘पात्रता’ निश्चित निर्माण करेल, पण आपणहून उद्योग सुरू करण्याची ‘स्वेच्छा’ मात्र केवळ तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते, हे नक्की.
कवी विलियम हेन्ले आपल्या एका कवितेत म्हणतात- ‘मीच माझ्या नशिबाचा मालक आहे आणि मनाचा नायक आहे.’
उद्योगी मनोवृतीची घडण अनेक सद्गुणांच्या समन्वयातून होत असते, उदा. स्वत्वाची जाणीव, आत्मविश्वास, आव्हाने अंगावर घेण्याची ‘स्वेच्छा’, मेहनत, स्वयंप्रेरणा व सर्वात महत्त्वाचा दूरदर्शीपणा. द्रष्टेपण अंगी बाणवायचे असेल तर ध्येयाप्रती अढळ निष्ठा, इच्छा, खुल्या दिलाने भविष्यात डोकावण्याची वृत्ती आणि सतत मनाला ‘पुढे काय?’ असे प्रश्न विचारून प्रगतिपथावर नेणे गरजेचे आहे.
उद्योगाचा शुभारंभ
एव्हाना उद्योजक बनण्याची अंत:प्रेरणा तुमच्या मनात पुरेशी जागृत झाली असेल. तुमच्या स्वप्नातल्या कल्पना आता तुमच्या मनात तरळू लागल्या असतील किंवा बाजारपेठेत क्रांतिकारी बदल घडवणारी अशी एखादी संकल्पना तुमच्या मनात असेल किंवा दुसऱ्या कोणत्या तरी उद्योजकाने व्यवसायात संपादन केलेले यश तुम्हाला खुणावत असेल किंवा लोकांच्या एखाद्या अपूर्ण गरजेसाठी विशिष्ट सेवा उद्योग सुरू करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली असेल. पण मुख्य म्हणजे यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी फक्त निरनिराळ्या कल्पना असून भागत नाही, त्यासाठी इतरही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. उद्योगधंदा सुरू करण्याची कल्पना अमलात आणणे ही मोठी जोखीम आहेच, पण म्हणून संकटांना घाबरून ही जोखीम टाळणे, हे अधिकच जोखमीचे नाही का?
जगातील यशस्वी संस्थापकांनी, लहान-मोठय़ा उद्योजकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, स्वत:ची प्रतिभा जगापुढे आणताना काय बरे विचार केला असेल? मुळातच एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हाने स्वीकारण्याची स्वेच्छा असणे आणि उद्योजक होणे या दोन गोष्टींतील सीमारेषा खूप पुसट आहे. ही स्वेच्छाच तुमच्या मनातील सर्व भय नष्ट करते आणि तेव्हाच आपण आकस्मिक संकटांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो.
जर ठरवल्याप्रमाणे उद्योग चालला नाही तर पुढे काय? हा प्रश्न जर तुम्ही सध्या नोकरीत असाल तर तुम्हाला नक्कीच भेडसावेल, पण याबद्दलचा आराखडा आधीच तयार असणे गरजेचे आहे. यासाठी संबंधितांशी बोलून आíथक बाजूंची योजनाबद्ध आखणी करणे जरुरी आहे, जेणेकरून निदान स्वत:चा व कुटुंबाचा खर्च भागू शकेल. एक मात्र खरे की, या सगळ्या नियोजनाअंती, उद्योजक होण्याची मनस्वी ओढच तुम्हाला तुमच्या रोजच्या सवयीच्या कार्यक्षेत्रातून बाहेर पडण्यास प्रवृत्त करेल.
भविष्यकाळाचा अंदाज बांधण्यापेक्षा तो घडवण्यासाठी पावले उचलणे केव्हाही श्रेयस्करच ठरते. हा लेख वाचताना, वाचकहो, तुमच्या मनातल्या उद्योजक होण्याच्या सुप्त इच्छेला आकार येऊ लागला आहे का? त्यासाठी कशा आणि कोणत्या योजना आखाव्या लागतील याची माहिती देण्याचा प्रयत्न या पाक्षिक सदरातून करण्यात येईल. मात्र, प्रारंभीचा हा लेख वाचून तुम्ही उद्योगधंद्यात उडी मारायला तयार आहात का?
devang.kanavia@acumen.co.in
(वरिष्ठ सल्लागार, अॅक्युमेन बिझनेस कन्सल्टिंग)
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2014 रोजी प्रकाशित
तुमच्यातील उद्योजकाला जागं करा
अभिनंदन! या क्षणाला तुम्ही भारतात आहात, हे तुमच्यासाठी उत्तमच आहे.

First published on: 13-01-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New business