साधारणत: पालक आणि विद्यार्थी वर्ग अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय क्षेत्रांकडे एक सुरक्षित करिअर म्हणून पाहतो. समाजमाध्यमांच्या क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. केवळ या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गंभीरतेने पाहायला हवे. या माध्यमाचा बारकाईने अभ्यास करावा. फेसबुक, यूटय़ूब, इन्स्टाग्राम, ट्विटर तसेच विविध विषयांची सविस्तर माहिती देणारी संकेतस्थळे यांचा विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास केला तर यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे दिसून येईल, असे मत ‘मराठी सोशल मीडिया संमेलनाचे सहसंस्थापक’ आणि समाजमाध्यमांच्या विश्वातील उद्योजक, अभ्यासक समीर आठल्ये यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या समाजमाध्यमांवर विविध विषयांची विस्तृत मात्र मनोरंजनात्मक पद्धतीने माहिती देणाऱ्या अनेक चित्रफिती प्रसारित होत असतात. याबरोबरच अनेकांचे नृत्य, चित्रकला, गायन, वादन यांसारख्या विविध कलागुणांचे सादरीकरण करणाऱ्या अनेक छोटया चित्रफिती समाजमाध्यमांवर दिसत असतात. अशाच पद्धतीने कलागुणांच्या सादरीकरणासह विविध विषयांवरील चित्रफिती तयार करून त्या समाजमाध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविणे याद्वारे समाजमाध्यमांतील प्रभावक (सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर) म्हणून काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांनाही दैनंदिन घडामोडींचा अभ्यास करणे, त्यांचे विविध पैलू समजून घेणे आणि शेवटी सोप्या भाषेत नागरिकांना समजावून सांगण्यावर भर द्यायला हवा. समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांना काय हवे आहे याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे आठल्ये यांनी आवर्जून सांगितले. अगदी सण, दिनविशेष तसेच विविध प्रकारचे शुभेच्छा संदेश तयार करणारी असंख्य संकेतस्थळे तसेच विविध अ‍ॅप्लिकेशन कार्यरत आहेत. ही संकेतस्थळे आणि अ‍ॅप्लिकेशन कार्यान्वित ठेवण्यासाठी संकेतस्थळ तज्ज्ञांची मोठी गरज असते. यामुळे संकेतस्थळांचा आणि अ‍ॅप्लिकेशन यंत्रणेचा अभ्यास केल्यास या यंत्रणा हाताळणीच्या करिअर संधी उपलब्ध आहेत. तसेच यावर विविध भाषांमध्ये मजकूर लिहिण्यासाठीच्या देखील अनेक संधी उपलब्ध असल्याचे समीर आठल्ये यांनी सांगितले. समाजमाध्यमांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी विविध पदवी अभ्यासक्रमांची जोड असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media sameer athalye student class engineering ysh
First published on: 22-06-2022 at 00:02 IST