अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जेईई (मेन्स) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे; महाराष्ट्राची अभियांत्रिकी प्रवेशासाठी असणारी MH-CET परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. यात आता पुढचा टप्पा म्हणजे ऑप्शन फाॅर्म भरणे. अभियांत्रिकीला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता या टप्प्यावर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अभियांत्रिकीचा कोणता कोर्स आणि कोणते काॅलेज निवडावे जेणेकरून भविष्यात करिअरच्या उत्तम संधी मिळतील. या संदर्भातील निर्णय घेताना उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेऊ.

१) अभियांत्रिकी शाखा निवडताना विद्यार्थी ठरावीक मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर आणि फार फार तर केमिकल एवढ्याच ठरावीक शाखांचा विचार केला जातो. मुळात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या राज्यात ७० शाखा आहेत. त्यातील अनेक शाखा एक किंवा दोन महाविद्यालयात आहेत. या शाखांमध्येही करिअरच्या आणि नोकरीच्या भरपूर संधी आहेत आणि मुख्य म्हणजे एक किंवा दोनच काॅलेजेसमध्ये हे कोर्सेस असल्याने स्पर्धाही कमी आहे. गरज आहे ती फक्त चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची. पाॅवर इंजिनीअरिंग, एन्वायरमेंटल इंजिनीअरिंग, प्रिंटींग व पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, बायोटेक इंजिनीअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग अशा काही शाखांचा यात समावेश आहे.

२) कोणत्या शाखेला वाव (स्कोप) जास्त आहे किंवा चार वर्षानंतर कोणत्या शाखेला स्कोप जास्त असणार आहे असे प्रश्न विद्यार्थी आणि पालक कायम विचारतात. खरे तर अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांना उत्तम वाव आहे मात्र तो अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे जे अभियांत्रिकीच्या पहिल्या सेमिस्टरपासून सातत्याने प्रथम वर्गात उत्तीर्ण होतात; एकदाही एकाही विषयात नापास होत नाहीत. कारण कंपन्या जेव्हा कँपस इंटरव्ह्यूसाठी येतात त्यावेळी विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलावताना सर्व सेमिस्टरमध्ये फर्स्ट क्लास हे सूत्र लावतात. अभियांत्रिकीच्या चारही वर्षात विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवली तर स्कोपचा विचार करण्याची गरजच भासणार नाही. अर्थात कॅम्पस इंटरव्ह्यूमधून उत्तम नोकरी मिळण्यासाठी या चार वर्षांत आणखी महत्त्वाची तयारी विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे, ती म्हणजे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे.

३) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि आयटी इंजिनीअरिंग या दोन शाखांच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नसल्याने त्यातली कुठलीही शाखा निवडलेली चालू शकेल. एआय, मशीन लर्निंग किंवा डाटा सायन्स संबंधित अभियांत्रिकी शाखा उपलब्ध असेल तर त्याला प्राधान्य द्यावे.

४) ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीनंतर एमबीए किंवा यूपीएससी/एमपीएससीकडे वळायचे आहे त्यांना कोणतीही शाखा किंवा कोणतेही महाविद्यालय निवडले तरी फारसा फरक पडत नाही, कारण त्या ठिकाणी मुख्यत्वे पदवी मिळवलेली असणे यालाच महत्त्व असते.

५) ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीनंतर नोकरी करायची आहे, त्यांनी अशा कॉलेजची निवड काळजीपूर्वक करायची आहे. ज्या कॉलेजमध्ये गेल्या काही वर्षांपासून कॅम्पस रिक्रूटमेंट चांगली होत आहे. गेल्या ४ वर्षांचा या संदर्भातील इतिहास तपासताना किती टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आणि सरासरी किती पगार मिळाला हे पाहणे आवश्यक आहे. पदवीनंतर नोकरीसाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘सँडविच’ कोर्स निवडणे फायद्याचे ठरू शकते. कारण या कोर्समध्ये पदवीबरोबरच एक वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो जो नोकरी मिळताना उपयोगी पडतो. ज्या विद्यार्थ्यांना एमबीए करायचे आहे त्यांनाही सँडविच कोर्स लाभदायक ठरू शकतो.

६) ज्या विद्यार्थ्यांना पुढे तांत्रिक विषयातच भारतात वा परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आवडत्या अभियांत्रिकी शाखेची निवड करणे जास्त महत्त्वाचे आहे, मग त्याकरिता कॉलेज निवडीमध्ये थोडी तडजोड करावी लागली तरी चालेल.

७) कॉलेज निवडताना त्या त्या कॉलेजच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली माहिती वाचावी ज्यामध्ये कॉलेजमधील पायाभूत सुविधा, प्राध्यापक वर्ग, कॅम्पस रिक्रूटमेंट याची माहिती असते. शक्य असेल त्या महाविद्यालयात समक्ष जाऊन प्राध्यापकांशी बोलले किंवा त्या कॉलेजमधे आत्ता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणे या गोष्टी फायद्याच्या ठरतात.

८) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत प्रेफरन्स फाॅर्म (पसंतीक्रम) भरताना मला काय मिळू शकेल, गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता याची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ती तपासावी. नंतरच आपल्याला हव्या त्या काॅलेजचा व शाखेचा पर्याय आपल्या आवडीनुसार भरावा. फक्त भरताना पसंतीक्रम उलटसुलट भरू नये तर जे जास्त आवडणारे कॉलेज / शाखा आहे ती प्रथम, त्याखालोखाल आवडणारी नंतर या क्रमाने भरावेत. आपल्या मेरिट नंबरप्रमाणे संगणक जेव्हा आपला फॉर्म वाचेल त्या वेळेला तो आपल्या पसंतीप्रमाणे पर्याय वाचत जाईल आणि जेथे आपली पसंती व जागांची उपलब्धता यांची सांगड बसेल ते कॉलेज आणि शाखा संगणक अलाॅट करेल याची जाणीव ठेवावी.

९) यंदा प्रवेशाचे चार राऊंड होणार आहेत, त्यामुळे हवं ते काॅलेज/ शाखा मिळण्यासाठी चौथ्या राऊंडपर्यंत प्रयत्न करावा.

१०) काॅलेजची निवड करताना स्वायत्त (ऑटोनॉमस) काॅलेजना प्राधान्य द्यावे कारण त्यांना स्वतःचे सिलॅबस ठरवण्याचा अधिकार असतो त्यामुळे इंडस्ट्रीच्या गरजेनुसार सिलॅबसमध्ये बदल करणे त्यांना सहज शक्य होते.

११) पदवीनंतर नोकरी मिळण्यासाठी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवणे खूपच महत्त्वाचे ठरते त्यामुळे ज्या महाविद्यालयांत शिक्षणाबरोबरच इंटर्नशिप मिळते त्या महाविद्यालयांना प्राधान्य द्यावे.