सुमित कोंडे

संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेमधील पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल या घटकाची आजच्या लेखामध्ये आपण चर्चा करणार आहोत. २०११ पासून या घटकावर पूर्व परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची संख्या लक्षणीय आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षेतून जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पात्र होतात त्यांना नागरी सेवेची मुख्य परीक्षा लिहिण्याची संधी मिळते. मात्र त्याचबरोबर भारतीय वन सेवेची मुख्य परीक्षा लिहिण्याची संधी देखील यातून मिळू शकते. कदाचित याच कारणांमुळे पूर्व परीक्षांमध्ये पर्यावरण या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची संख्या लक्षणीय दिसून येते. नागरी सेवा पूर्व परीक्षेचे मेरीट आणि वनसेवेसाठीचे मेरीट यामध्ये तफावत आहे. पण वन सेवेसाठी उपलब्ध पदसंख्या नागरी सेवा परीक्षेच्या तुलनेमध्ये कमी असल्यामुळे याचे मेरीट थोडेसे जास्त असते. त्यामुळे जे विद्यार्थी नागरी सेवा व भारतीय वन सेवा या दोन्ही परीक्षा देऊ इच्छितात त्यांना पूर्व परीक्षेमध्ये अतिशय चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षेच्या तयारी दरम्यान या घटकाला महत्त्व देणे आवश्यक आहे. २०१७ पासूनच्या पूर्व परीक्षांचे विश्लेषण केले असता या घटकासोबत पर्यावरणीय चालू घडामोडी, कृषी पर्यावरण, भूगोल पर्यावरण या सर्व घटकांवर एकत्रितपणे साधारणत: १८ ते २० इतके प्रश्न विचारलेले दिसून येतात. २०१८ पासून विचारलेल्या प्रश्नांची संख्या पुढील तक्त्यामध्ये दिलेली आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर विचारलेले प्रश्न मूळ अभ्यासक्रम ( static syllabus) आणि चालू घडामोडी अशा दोन्ही घटकांवरती विचारले जातात. त्यामुळे या घटकाची तयारी करत असताना मूळ अभ्यासक्रम आणि चालू घडामोडी यांची सांगड घालणे अत्यावश्यक आहे. आता आपण यातील महत्त्वाच्या उपघटकांकडे वळूया.

पर्यावरण पारिस्थितिकी हा घटक चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी यातील मूलभूत संकल्पना समजून घ्याव्या लागतील. यामध्ये परिसंस्था, अन्नसाखळी, अन्नजाळे, व ऊर्जा पिरॅमिड यासारख्या संकल्पनांचा समावेश होतो. याचबरोबरच इको टोन, इकॉलॉजिकल नीश्च, परिसंस्थेचे विविध प्रकार, जलीय परिसंस्थेतील सुपोषण या संकल्पना समजून घ्याव्यात. या संकल्पना वाचत असताना वेगवेगळ्या आकृत्या किंवा फ्लो चार्ट याची मदत घ्यावी, त्यामुळे त्या पटकन समजतील.

हेही वाचा >>> डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा

जैवविविधता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे, तसेच हा घटक भूगोल या विषयाशी देखील सुसंगत असल्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. यामध्ये जैवविविधतेचे हॉटस्पॉट, धोकादायक स्थितीमध्ये असणारे सजीव, तसेच त्यांच्या संवर्धनासाठी केलेले प्रयत्न, आययूसीएनजी रेड लिस्ट इत्यादी संकल्पनात्मक बाबी येतात. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी अत्यंत काटेकोरपणे या संकल्पना समजून घ्याव्यात. भारतामध्ये जैवविविधता विपुल प्रमाणामध्ये आढळते. तसेच अलीकडच्या काळामध्ये या जैवविविधतेचे संवर्धन हा कळीचा मुद्दा झालेला आहे. याच संदर्भात नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, राष्ट्रीय उद्याने, दलदलीचे प्रदेश, अभयारण्य यांचा अभ्यास करावा. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य हे कोणत्याही एखाद्या विशिष्ट सजीवांसाठी किंवा वनस्पतींसाठी राखीव आहेत का, ते समजून घ्यावे. याचा अभ्यास करत असताना नकाशाचा आवर्जून वापर करावा. शक्य झाल्यास प्रत्येक उद्यान व अभयारण्य हे नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी येतात हे तपासावे. हे कोणत्या सजीवासाठी प्रसिद्ध आहेत इथपासून त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम कसा आहे यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. अलीकडे शाश्वत विकासाच्या चर्चेमुळे देखील जैवविविधतेचे संवर्धन करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे व कृती कार्यक्रम याचा देखील अभ्यास करावा.

याच घटकातील अजून एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे हवामान बदल असा आहे. यामध्ये हवामान बदलाची संकल्पना, प्रदूषण आणि प्रदूषके तसेच हवामान बदलाचा परिसंस्थेवरील, अन्नसाखळीवरील परिणाम, आम्लपर्जन्य, ओझोनची कमी होत जाणारी पातळी आणि त्याचे दुष्परिणाम, जलप्रदूषणामुळे होणारे आजार यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करावा. हवामान बदलासंदर्भात वैश्विक पातळीवर ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतात अशा संस्थांचा अभ्यास व विविध राष्ट्रांनी संमत केलेले प्रोटोकॉल आणि कन्वेंशन याचा देखील अभ्यास करावा. क्योटो प्रोटोकॉल, मॉट्ररियल प्रोटोकॉल, स्टॉक होम कन्वेंशन, रामसर कन्वेंशन, वसुंधरा परिषद, यूएनएफसीसी ( UNFCCC) इत्यादी कन्वेंशन्स महत्त्वाचे आहेत. या घटकावरील चालू घडामोडीचा विचार करता सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक, जमिनीची धूप, राष्ट्रीय जलधोरण, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा वापर आणि त्यावरील बंदी, सागरी प्रदूषण, सागरामध्ये वाढत जाणारे अमलाचे प्रमाण, पर्यावरणीय कर्जे (ecological debt), कार्बन फूटप्रिंट, दुबईमधील सीओपी २८ परिषद इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी मधील या गोष्टी समजून घ्याव्यात. या घटकांचा अभ्यास करताना संदर्भ पुस्तकांचा विचार करता एनसीआरटीच्या इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र या पुस्तकातील शेवटच्या चार प्रकरणांमधून परिसंस्था हा घटक अभ्यासावा. संदर्भ पुस्तकांचा विचार करता द युनिक अकॅडमीचे संदर्भ पुस्तक अभ्यासावे. त्याचबरोबर वेगवेगळे सरकारी अहवाल तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे अहवाल याचा देखील अभ्यास करावा. असे अहवाल पूर्णपणे वाचणे शक्य नसल्यास त्यातील महत्त्वाच्या बाबी वाचून त्याच्या शॉर्ट नोट्स तयार कराव्यात. त्याचबरोबर यापूर्वीच्या पूर्व परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न व सराव प्रश्न आवर्जून सोडवावेत. प्रश्न सोडवताना ज्या चुका होतील त्या चुका समजून घेऊन त्या पुन्हा होणार नाहीत अशा दृष्टीने तयारी करावी.