पंकज व्हट्टे

या लेखामध्ये आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन घटकांचा – स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जगाचा इतिहास – यांविषयी चर्चा करू. स्वातंत्र्योत्तर भारतातील पायाभरणी आणि पुनर्रचना आणि अठराव्या शतकाच्या मध्यापासून जगाचा इतिहास याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित आहे.

स्वातंत्र्योत्तर भारत

अभ्यासक्रमाच्या या घटकामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतातील समस्या आणि आव्हाने, देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणे, राज्यांची पुनर्रचना आणि शासनाने हाती घेतलेल्या विविध सुधारणा यांचा समावेश होतो. स्वातंत्र्योत्तर भारतासमोर फाळणीनंतरची हिंसा, स्थलांतर आणि पुनर्वसन, आर्थिक मागासलेपण, निरक्षरता आणि दारिद्र्य अशी आव्हाने होती. भाषिक पुनर्रचना आणि राष्ट्रीय भाषेचा प्रश्न यामुळे भाषा ही महत्त्वाची समस्या होती. या आव्हानांचा सामना करताना भारत सरकारने आखलेली धोरणे उदा. आर्थिक नियोजन, सामूहिक विकास कार्यक्रम, जमीनदारी निर्मूलन, जमीन सुधारणा, शैक्षणिक धोरण, औद्याोगिक धोरण, संरक्षण धोरण, विज्ञान तंत्रज्ञान धोरण, हरित क्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, आणीबाणी, उदारमतवादाचे धोरण याचा अभ्यास करावा.

या धोरणांवर आणि समस्यांवर अनेकवेळा प्रश्न विचारले गेले आहेत. ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचे महत्त्व आणि उत्क्रांतीबाबत २०१३ सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता. स्वातंत्र्योत्तर भारताने जे धोरण स्वीकारले त्यावर लेनिनप्रणीत १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणाचा कसा प्रभाव पडला त्याचे मूल्यमापन करा, असा प्रश्न २०१४ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता. भाषिक आधारावरील राज्यांनी भारतीय एकतेला बळकट केले आहे का, असा प्रश्न २०१६ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. नजीकच्या काळामध्ये नव्याने स्थापन केलेल्या राज्यांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला आहे का असा प्रश्न २०१८ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता.

हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर्सकडून प्रशिक्षण

याकाळात भारतासमोर अनेक आव्हाने होती. ज्यामध्ये संविधाननिर्मिती, संस्थानांचे विलीनीकरण, परराष्ट्र धोरणाची पायाभारणी यांचा समावेश होता. संविधान सभेने संसद म्हणून काम केले. संविधान सभेला संविधान निर्मितीसाठी तीन वर्षे लागली. यासाठी संविधान सभेवर टीका केली जाते. १९३५ च्या कायद्याचा अनुभव भारतीयांना तीन वर्षामध्ये संविधान निर्मितीसाठी कसा सहाय्यकारी ठरला, हा प्रश्न २०१५ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. संस्थांनांना भारतात विलीन करण्याच्या प्रक्रीयेमध्ये कोणत्या प्रशासकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक समस्या होत्या, यावर २०२१ च्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता.

भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी आणि जागतिक महासत्तांशी असणारे संबंध, पंचशील करार, अलिप्ततावादी धोरण, आण्विक धोरण आणि ताश्कंद करार, शिमला करार, नेपाळशी मैत्री करार यां सारख्या करारांचा समावेश होतो. ताश्कंद कराराची पार्श्वभूमी आणि त्याची वैशिष्ट्ये यावर २०१३ सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता. बांगलादेशच्या निर्मितीमधील भारताच्या निर्णायक भूमिकेचे चिकित्सक परीक्षण करा असा प्रश्न २०१३ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता.

स्वातंत्र्योत्तर भारतातील चळवळींचा अभ्यास करताना भूदान चळवळ, ग्रामदान चळवळ, पर्यावरणीय चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ, दलित पँथर चळवळ, जयप्रकाश नारायण यांची चळवळ, फुटीरतावादी चळवळी यां सारख्या चळवळींचा अभ्यास करावा. आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळ आणि ग्रामदान चळवळ यांचे मूल्यमापन करा असा प्रश्न २०१३ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता.

आधुनिक जगाचा इतिहास

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सामान्य अध्ययन पेपर-१ च्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमामध्ये आधुनिक जगाचा इतिहास या घटकाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी अठराव्या शतकाच्या मध्यापासूनच्या महत्त्वाच्या घटना, राजकीय विचारधारा, त्यांचे स्वरूप आणि समाजावरील त्यांचा परिणाम यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अमेरिकी स्वातंत्र्ययुद्ध, औद्याोगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, राष्ट्रीय सीमांचे पुनर्निर्धारण, वसाहतीकरण, वसाहतींसाठीची स्पर्धा, पहिले महायुद्ध, जागतिक महामंदी, दुसरे महायुद्ध, निर्वसाहतीकरण, शीतयुद्ध यांचा अभ्यास करायला हवा.

२०१३ सालच्या मुख्य परीक्षेत या विविध घटकांवर अनेक प्रश्न विचारले होते. पाश्चात्य जगात जे औद्याोगिक क्रांतीचे स्वरूप होते त्यापेक्षा जपानमधील उशिराने झालेली औद्याोगिक क्रांती वेगळी होती, असा प्रश्न विचारला होता. युरोपीय राष्ट्रांमधील वसाहती मिळवण्याच्या स्पर्धेमुळे आफ्रिका खंडातील राष्ट्रांची सीमारेषा कृत्रिमरित्या निर्माण करण्यात आली, असा प्रश्न विचारला होता. अमेरिकी क्रांती हा व्यापारवादाच्या विरोधातील आर्थिक विद्रोह होता, यावर प्रश्न विचारला होता. जागतिक आर्थिक महामंदीचा सामना करण्यासाठी कोणते धोरणात्मक उपाय योजले गेले, असा प्रश्न विचारला गेला होता.

सुएझ संकटामुळे ब्रिटनच्या महासत्ता असण्याच्या प्रतिमेला कसा तडा गेला असा प्रश्न २०१४ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला गेला होता. औद्याोगिक क्रांती सर्वप्रथम ब्रिटनमध्येच का घडून आली, असा प्रश्न २०१५ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला गेला होता. दोन्ही जागतिक महायुद्धांसाठी जर्मनी कशाप्रकारे जबाबदार होती, याचे चिकित्सक परीक्षण करा असा प्रश्न २०१५ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या आफ्रिकी अभिजन लोकांनी पश्चिम आशियातील वसाहतवादविरोधी संघर्षाचे नेतृत्व केले, असा प्रश्न २०१६ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. मलाय द्वीपकल्पामधील निर्वसाहतीकरणावर २०१७ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. अमेरिकी आणि फ्रेंच राज्यक्रांतीने आधुनिक जगाची पायाभरणी केली, असा प्रश्न २०१९ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये रेल्वेसेवा सुरू झाल्याने कोणते सामाजिक आर्थिक परिणाम झाले असा प्रश्न २०२३ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता.

भांडवलवाद, साम्यवाद, समाजवाद, फासीवाद आणि नव-उदारमतवाद यांसारख्या राजकीय विचारधारांची गाभा संकल्पना, संबंधित व्यवस्था आणि त्यांचा प्रभाव याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. ‘दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात लोकशाही राज्यव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते’ या विधानाचे मूल्यमापन करा असा प्रश्न २०२१ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. लोकशाही राज्यव्यवस्थेसमोर साम्यवाद आणि फॅसीवाद यांच्या उदयाचे आव्हान होते, असे या प्रश्नामध्ये अनुस्यूत होते.

सरतेशेवटी आपण या घटकाबद्दल असलेल्या गैरसमजाबाबत चर्चा करू. मागील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये एक अथवा दोनच प्रश्न विचारले जातात. परिणामी, यांचा जास्त अभ्यास कारण्याची आवश्यकता नाही असा समज होण्याची शक्यता आहे. हा समज चुकीचा आहे. कारण १०-३० गुण तुमचे परीक्षेतील नशीब बदलू शकतात. या घटकांची काळजीपूर्वक तयारी केल्यास त्याचा फायदा निबंधलेखन, सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरच्या तयारीसाठी आणि मुलाखतीमध्येसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे या घटकांकडे दुर्लक्ष करता कामा नये. २०२४ सालच्या मुख्य परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!

(भाषांतर : अजित देशमुख)

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com