Premium

यूपीएससीची तयारी : इतिहास विषयाची तयारी- सामान्य अध्ययन पेपर १

प्राचीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या घटकाची जास्त व्यापक आणि जास्त सखोल तयारी करणे अत्यावश्यक आहे.

guidance for upsc preparation exam
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

अजित देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय प्रशासनात सनदी सेवकांची भरती करण्यासाठी आयोजित केली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची २०२३ सालासाठीची मुख्य परीक्षा नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने आपण आजच्या लेखात या परीक्षेतील सामान्य अध्ययन- १ या पेपरमधील इतिहास विषयाचे महत्त्व आणि या घटकावरील प्रश्नांची उत्तरे देताना अंमलात आणावयाची रणनीती याची चर्चा करणार आहोत.

यावर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत इतिहास या घटकावर एकूण सहा प्रश्न (दहा गुणांसाठी तीन प्रश्न आणि पंधरा गुणांसाठी तीन प्रश्न) विचारण्यात आले. एकूण सहा प्रश्नांपैकी प्राचीन भारत आणि आधुनिक भारत या घटकावर प्रत्येकी दोन, तर मध्ययुगीन भारत आणि जगाचा इतिहास या घटकावर प्रत्येकी एक प्रश्न विचारण्यात आला. याचाच अर्थ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेची तयारी करताना कोणत्या घटकासाठी किती वेळ द्यायचा याचे गणित विद्यार्थ्यांच्या डोक्यात पक्के असले पाहिजे.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये आणि त्यावर परिणाम करणारे घटक कोणते?

मुख्य परीक्षेतील इतिहास विषयाची तयारी करताना प्रश्नांचे घटकनिहाय वितरण लक्षात घेतले असता अभ्यास करताना कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा हे स्पष्ट होते. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरते. हे विश्लेषण म्हणजे मुख्य परीक्षेच्या तयारीला एक प्रकारे दिशा देणारा घटक आहे.

प्राचीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या घटकाची जास्त व्यापक आणि जास्त सखोल तयारी करणे अत्यावश्यक आहे. अर्थात हे करताना जगाचा इतिहास आणि मध्ययुगीन भारत याकडे दुर्लक्ष होता कामा नये. तसेच गेल्या काही वर्षातील मुख्य परीक्षेमधील इतिहास विषयावरील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेतले असता दिसून येते की, थेट आणि सोपे प्रश्न विचारले जात नाहीत. विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडले जाणारे, विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय समज आहे का याची चाचपणी करणारे आव्हानात्मक प्रश्न विचारण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्राधान्य दिल्याचे दिसते. काही प्रश्न हे आंतरविद्याशाखीय (interdisciplinary) स्वरूपाचे दिसून येतात. आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे प्रश्न म्हणजे एकावेळी दोन किंवा जास्त अभ्यासशाखांवर आधारित विचारले जाणारे प्रश्न होत.

उदा. २०२३ च्या मुख्य परीक्षेत पुढील प्रश्न १० गुणांसाठी (अंदाजे १५० शब्दात उत्तर लिहिणे अपेक्षित) विचारण्यात आला.

प्र. प्राचीन भारताचा विकास होण्यामध्ये भौगोलिक घटकांनी कोणती भूमिका बजावली हे स्पष्ट करा?

या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तपासताना विद्यार्थ्यांची इतिहास आणि भूगोल या दोन्ही घटकांची समज कितपत आहे, याचे आकलन करता येते. या प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरांमधून विद्यार्थ्यांच्या एकूण बौद्धिक आकलनाची पातळी कळून येते. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भौगोलिक घटक इतिहास घडविण्यात कशा प्रकारे भूमिका बजावतात याचे स्पष्टीकरण देणे अत्यावश्यक आहे. यापूर्वीच्या मुख्य परीक्षेत इतिहास आणि भूगोल यांची सांगड घालणारा पानिपत येथील लढायांबाबतचा प्रश्न २०२० सालच्या परीक्षेत विचारला गेला आहे.

(पानिपतची तिसरी लढाई १७६१ मध्ये झाली. साम्राज्यांना हादरवून टाकणाऱ्या अनेक लढाया पानिपत येथेच का लढल्या गेल्या?)

या प्रश्नाचे उत्तर लिहिताना पानिपतचे भौगोलिक स्थान महत्त्वपूर्ण ठरते, हे नमूद करणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच पूर्वीच्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास आपल्याला मुख्य परीक्षेस सामोरे जाण्याची योग्य दिशा मिळते. २०२० सालच्या प्रश्नाचे आदर्श उत्तर तयार करून ठेवल्यास आपल्याला यावर्षीच्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मोलाची मदत मिळते.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी भारतात कोणत्या कायदेशीर उपाययोजना करण्यात आल्या?

याच प्रकारे २०२३ च्या मुख्य परीक्षेत आधुनिक भारत या घटकावर आधारित प्रश्नामध्ये महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांची तुलना विचारली आहे. (महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या शिक्षण आणि राष्ट्रवाद विषयक विचारांमधील फरक स्पष्ट करा.) यापूर्वी देखील महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस (२०१६) तसेच महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर (२०१५) यांच्या दृष्टिकोनाबाबत तुलना करणारा आणि फरक स्पष्ट करणारा प्रश्न विचारला गेला आहे. म्हणजेच पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरते. या प्रश्नाचे उत्तर देताना केवळ एनसीईआरटी अथवा प्रमाणित संदर्भ साहित्य यांचा वापर पुरेसा ठरणार नाही. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्याला महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या शिक्षण आणि राष्ट्रवाद याविषयी विचारांचे आकलन झालेले असणे गरजेचे आहे.

१९०८ साली रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रातील पुढील उक्ती ही उपरोक्त उत्तराची आदर्श सुरुवात ठरू शकते. ‘Patriotism can’t be our final spiritual shelter. I will not buy glass for the price of diamonds and I will never allow patriotism to triumph over humanity as long as I live.’ ही उक्ती मुख्य परीक्षेच्या काही महिने आधी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रात ‘Wordly Wise’ या सदरामध्ये उद्धृत केली होती. म्हणजेच चांगल्या दैनिकाचे बारकाईने वाचन करणे, त्याची टिपणे काढणे हे परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. वृत्तपत्राचे बारकाईने वाचन करणे हे मुख्य परीक्षेच्या दृष्टीने मूल्यवर्धन (Value Addition) करणारा घटक आहे. यूपीएससी मुख्य परीक्षेचा पेपर सोडविताना वेळेचे गणित पाळणे महत्त्वाचे ठरते. १० गुणांचा प्रश्न अंदाजे सात मिनिटांत आणि १५ गुणांचा प्रश्न अंदाजे अकरा मिनिटांत सोडवला गेल्यास तीन तासांमध्ये पेपर पूर्ण सोडवता येतो. दिलेल्या वेळेत सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिता यावीत याकरिता प्रश्नोत्तरे लिहिण्याचा वारंवार सराव करणे, याच सर्वोत्तम मार्ग आहे. इतिहास विषयाची तयारी करताना देखील वेळेचे हेच सूत्र पाळणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून दिलेल्या वेळेत दिलेल्या शब्द मर्यादेत आपण इतिहासाची उत्तरे लिहू शकतो. पुढच्या लेखामध्ये आपण मुख्य परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहिता येतील याबद्दल माहिती घेऊयात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi zws 70

First published on: 07-12-2023 at 13:49 IST
Next Story
१०-१२ वी नंतर Aviation क्षेत्रात कसे करावे करिअर, भरतीचे नियम, निकष जाणून घ्या? वाचा आजच्या दिवसाचे महत्त्व