Bisleri Success Story : माणसाला जगण्यासाठी पाणी हा अत्यंत आवश्यक घटक आहे; पण जीवनसंजीवनी असलेल्या या पाण्याला १९६५ मध्ये खऱ्या अर्थाने व्यावसायिक रूप मिळाले. कोणताही लहान-मोठा कार्यक्रम असो किंवा प्रवासादरम्यान किंवा सण-वाराच्या कार्यक्रमात बिसलेरी या पाण्याच्या बाटलीने जागा निर्माण केली. आणि ‘बिसलेरी’ हे नाव घरोघरी पोहोचले. रमेश चौहान यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत हा ब्रॅण्ड मोठा केला आणि मेहनतीच्या जोरावर ७,००० कोटींची कंपनी उभी केली. आज आपण रमेश चौहान कोण आहेत आणि त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश चौहान – घराघरात पोहोचवली बिसलेरी

RJC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश चौहान यांचा जन्म १९४० मध्ये मुंबईत झाला. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी Massachusetts Institute of Technology (MIT)मधून मेकॅनिकल इंजिनियरिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये दोन पदव्या घेतल्या. काहीतरी वेगळं करण्याच्या जोशात त्यांनी पाण्याची बाटली विकायचा विचार केला. त्यावेळी पाणीही बाजारात विकले जाऊ शकते, असा कोणी विचारही केला नव्हता.

१९६९ मध्ये चौहान यांच्या नेतृत्वाखाली ‘पार्ले एक्स्पोर्ट्स’ने इटलीच्या एका उद्योजकाकडून ‘बिसलेरी’ हा ब्रॅण्ड विकत घेतला आणि भारतात मिनरल वॉटर विकायला सुरुवात केली. पाच दशके उलटली; पण बिसलेरीची क्रेझ आजही कायम आहे. चौहान येथेच थांबले नाहीत, तर त्यांनी थम्स अप, गोल्ड स्पॉट, सिट्रा, माझा व लिम्का यांसारख्या लोकप्रिय पेयांचे ब्रँड्स लाँच करून, आपला व्यवसाय वाढवला.

चौहान यांनी बिसलेरी ब्रॅण्डमध्ये ग्राहकांना नवनवीन ऑफर्स दिल्या. २०१६ मध्ये त्यांनी ‘बिसलेरी पीओपी’द्वारे स्पायसी, लिमोनाटा, फोनझो व पिना कोलाडा अशा चार अनोख्या फ्लेवर्समध्ये फिजी ड्रिंक्स ग्राहकांसमोर आणले.
१९९५ मध्ये चौहान यांनी भारतामध्ये पीईटी (Polyethylene Terephthalate) या रिसायकलिंग कंपनीची मुहूर्तमेढ उभारली, ज्यामुळे पर्यावरण सुरक्षित ठेवण्यास मदत झाली आणि रॅग पिकर्सना उत्पन्नाचे स्रोत मिळाले. अधिकृत आकडेवारीनुसार, बिसलेरी दरवर्षी अंदाजे ६०० टन पीईटी गोळा करते. कंपनीने २०१५ मध्ये शाळकरी मुलांच्या मदतीने आठ तासांत १.१ मिलियन प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आपल्या नावे केला.

झैनाब चौहान – बिसलेरीच्या यशामागे लपलेले नाव

रमेश चौहान यांच्या पत्नी झैनाब चौहान यांनी बिसलेरी ब्रॅण्ड मोठे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बिसलेरी इंटरनॅशनल टॉप मॅनेजमेंटच्या सदस्य म्हणून त्यांनी १९७० च्या दशकात थम्स अप, लिम्का व गोल्ड स्पॉटसह भारतातील अनेक लोकप्रिय ब्रॅण्डना मोठे केले.
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या उद्योगात झैनाब या मार्केटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या आणि फ्रँचायजींशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या महिला उद्योजकांपैकी एक होत्या.

आम्हीच आमचे स्पर्धक : जयंती चौहान

झैनाब आणि रमेश चौहान यांची लेक जयंती आता बिसलेरी ही कंपनी सांभाळते. फक्त २४ वर्षांच्या जयंतीच्या नेतृत्वाखाली ‘बिसलेरी’मध्ये नवनवीन बदल दिसून येत आहेत. हे बदल येत्या काळात ‘बिसलेरी’ला एक नवी उंची गाठण्यास मदत करतील.
‘फोर्ब्स’ला दिलेल्या मुलाखतीत जयंती सांगते, “स्पर्धेकडे स्पर्धा म्हणून बघण्यावर माझा विश्वास नाही. मी मानते की, आम्हीच आमचे स्पर्धक आहोत.”

मीडिया रिपोर्टनुसार ‘बिसलेरी’ला फक्त चार लाख रुपयांत रमेश चौहान यांनी खरेदी केले होते. आणि त्यांचे त्यावेळी फक्त पाच स्टोअर्स होते. आज देशात ‘बिसलेरी’चे १२२ हून अधिक ऑपरेशनल प्लांट आहेत आणि संपूर्ण भारतात जवळपास ५,००० ट्रकबरोबर ४,५०० हून अधिक व्यक्तींचे डिस्ट्रीब्यूटर नेटवर्क आहे. आज पाण्याची बाटली खरेदी करायची असेल, तर ‘एक बिसलेरी आण’. असं लोक सहज बोलून जातात. त्यावरून ‘बिसलेरी’ने जनमानसांत अढळ स्थान निर्माण केल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bisleri success story of ramesh chauhan who built 7000 crore bisleri indias biggest packaged water brand inspirational journey ndj