भारताला सुमारे ७,५०० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. म्हणूनच सागरी सुरक्षेसाठी, मासेमारीसाठी आणि जलपर्यटनासाठी तंत्रज्ञानाचे अद्ययावत पर्याय उपलब्ध करून देणे हे पुणेस्थित आय फोर मरिन टेक्नॉलॉजीज् प्रा. लि. या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या उत्पादनांविषयी सांगत आहेत कंपनीचे सहसंस्थापक प्रकाश खानझोडे…

आमच्या कंपनीत आम्ही चार संस्थापक आहोत. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनीअर आणि इंडस्ट्रीअल प्रोडक्ट डिझाइनर आहे. आलोक मुखर्जी (डीआरडीओचे निवृत्त शास्त्रज्ञ), राजा मेहुबानी (इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअर) आणि सनी सबॅस्टीअन (जहाज निर्मिती उद्योजक) असे आम्ही चौघेही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमधील जाणकार आहोत. आम्ही लष्कर, डीआरडीओसाठी काही प्रकल्पांमध्ये काम केले होते. तिथेच आमची ओळख झाली. भारताचा पहिला बॉम्ब निकामी करणारा ‘दक्ष’ नावाचा रोबोट तयार करणाऱ्या टीममध्ये आम्ही होतो.

आमच्या असे लक्षात आले की भारताला तिन्ही बाजूंनी विशाल समुद्रकिनारा लाभलेला असूनही पाण्याशी संबंधित क्षेत्रात फार सर्जनशीलता दिसलेली नाही. नवे तंत्रज्ञान आलेले नाही. जे उपलब्ध आहे ते बहुतांश आपण आयात करतो. पण त्या तुलनेने महाग असतात. त्यामुळे पाण्याशी संबंधित तंत्रज्ञानासाठी आपण आपले ज्ञान वापरून भारतीय बनावटीचा वापर करून गोष्टी तयार करू शकू, असे ठरवले. ऑटोनॉमस मरिन मोबिलिटी म्हणजे पाण्यावर आणि पाण्याखाली जाणारी स्वयंचलित मानवरहित प्रणाली उदाहरणार्थ ऑटोनॉमस ड्रोनसारखे तंत्रज्ञान करायचे असे आम्ही ठरवले. अशी मूळ प्रणाली की जिचा वापर करून पुढे विविध क्षेत्रात त्याचा उपयोग करता येईल.

पाण्याशी संबंधित तंत्रज्ञानाविषयीची ही कंपनी आम्ही २०२३ मध्ये सुरू केली. आय फोर मरिन टेक्नॉलॉजीज् प्रा. लि. असे कंपनीचे नाव. चार आय म्हणजे – इंटेलिजन्ट, इंडिजिनस, इंटिग्रेटेड इनोव्हेशन्स. इंटेलिजन्ट म्हणजे बुद्धिमान, इंडिजिनस म्हणजे देशी बनावटीचे, इंटिग्रेटेड म्हणजे एकत्रित पद्धतीचे हे इनोव्हेशन्स म्हणजे नवोन्मेष, जे समुद्राशी किंवा पाण्याशी निगडित आहे.

पाणबुडे पाण्याखाली फार वेळ राहू शकत नाहीत किंवा पाण्याखाली अशा काही जागा असतात जिथे माणूस पोहोचू शकत नाही किंवा अन्य काही मर्यादा असतात, समुद्राच्या तळातले विश्व असते, त्याचा वेध सूक्ष्म पद्धतीने घेता येत नाही. या मानवी मर्यादा ओलांडणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम आमची कंपनी करते. याचे नागरी आणि सैनिकी असे दोन्ही उपयोग आणि गरजही आहे. कंपनीसाठी आम्ही भांडवल उभारले. शिवाय आम्हा प्रत्येकाच्या आपापल्या टीम, मनुष्यबळ, सॉफ्टवेअर होतेच, मोठा अनुभव गाठीशी होता, त्याचा उपयोग झाला. काही आयआयटींनी देखील आम्हाला पाठबळ दिलं.

पाणबुड्या, बोटी वगैरे अस्तित्वात आहेत. पण पाण्याच्या खाली आणि पृष्ठभागावर एकाच वेळी काम करणारी प्रणाली, ज्यामध्ये स्वयंचिलत बोट, ड्रोन आणि तत्सम उत्पादने तयार करून त्यांचा एकत्रित मोठा परिणाम साधणे हे आमच्या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. तसेच आमचे प्रत्येक उत्पादन हे पर्यावरण पूरक, हरित ऊर्जेवर चालणारे आहे. डीझेल, पेट्रोलसारख्या इंधनाचा वापर होणार नाही आणि सर्व सुटे भाग भारतीय बनावटीचे असतील, हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं. त्यानुसार आमची आतापर्यंत पाच उत्पादने लाँच झाली आहेत.

‘ऑटोनॉमस सर्फेस व्हेसल – ॲक्वा स्कॅनर’ हे आमचे पहिले उत्पादन आहे. ती चालकविरहित स्वयंचलित छोटी बोट आहे, जी पाण्यावर आपण दिलेल्या मार्गाप्रमाणे मार्गक्रमण करते आणि त्यात जी उपकरणे आपण बसवू ती आपापली कामं करत राहतील. या बोटीचा उपयोग विशेषतः धरणांमध्ये होतो. ही बोट सुमारे पाच फूट लांब आणि तीन फूट रुंद आकाराची बोट आहे. धरणाचा आकार, मॅपिंग नोंदवून ती बोट धरणात सोडली की ती संपूर्ण धरणात फिरते. धरणाची खोली किती, गाळ किती, तळात कुठे भेगा पडल्या आहेत का, इतर काही नुकसान झाले आहे का याची संपूर्ण माहिती घेते. धरणाच्या तळापर्यंत जाणारी उपकरणे त्या बोटीवर असतात, काही सेन्सर्स असतात. आतापर्यंत अशी माहिती मिळत नव्हती असे नाही. पण ही माहिती घेण्यासाठी अभियंत्यांची टीम बोटीत बसून थांबून थांबून त्यांच्याकडील उपकरणांद्वारे ही माहिती मिळवतात. त्यासाठी वेळ खूप लागतो, अनेक ठिकाणी त्यांची बोट जाऊ शकत नाही किंवा त्यात धोका असतो. त्यामुळे संपूर्ण धरणाचे मॅपिंग होत नाही. मग अंदाजे माहिती घेतली जाते. ‘ॲक्वा स्कॅनर’द्वारे अधिक सखोल आणि अचूक माहिती मिळते. धरणात तळाला खोलवर तपासणी करण्यासाठी आमचा ‘ॲक्वा नॉट ड्रोन’ आहे. धरणांच्या भिंतीपासून पाण्यात उभारलेल्या पुलांचं बांधकाम तपासणे, बंदरात येणाऱ्या महाकाय जहाजांच्या तळातल्या भागांची तपासणी या ‘ॲक्वा नॉट ड्रोन’द्वारे करता येऊ शकते.

आमचे तिसरे उत्पादन मत्स्यशेतीसाठी उपयोगात येते. मोठमोठ्या तळ्यांमध्ये कोळंबी आणि माशांची पैदास केली जाते. त्यांना मोठमोठ्या पोत्यांमधून खाणे दिले जाते. या प्रक्रियेसाठी ऑटोनॉमस बोटींच्या माध्यमातून आमचा ‘ॲक्वा फीडबॉट’ फिरत राहतो आणि ठरावीक अंतराने माशांना ते खाद्य सोडत राहतो. म्हणजे थोडक्यात मत्स्यशेतीचे ऑटोमेशन होते. चौथे उत्पादन पर्यटन व्यवसायासाठी आहे. तलावांमध्ये, नद्यांमध्ये आम्ही पर्यटकांसाठी अशा लहान बोटी तयार केल्या आहेत, ज्या स्वयंचलित असतात आणि त्या दिलेल्या मार्गावरून आपोआप चालत राहतात. जेवढ्या लोकांना टूर करायची तेवढेच लोक त्यातून प्रवास करतात. काही अशाही बोटी तयार करण्यावर आम्ही काम करत आहोत, ज्यात लहान स्वयंचलित ड्रोन असतील. ते पाण्याच्या तळात अगदी १०० मीटरपर्यंत जाऊ शकतात. जेथे स्कुबा डायव्हिंग न येणाऱ्यांना किंवा वयोमानानुसार किंवा आजारपणामुळे स्कुबा डायव्हिंग करता न येणाऱ्यांनाही पाण्याखालील जीवसृष्टी, प्रवाळांचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक मासेमारी करणाऱ्यांसाठी आम्ही ड्रोन तयार केले आहेत, ज्यामुळे त्यांना नेमके मासे कुठे आहेत, योग्य प्रजाती, आकाराचे मासे जाळ्यात येतील यासाठी अधिक अचूक पद्धतीने जाळे टाकणे यामुळे शक्य होणार आहे.

सध्या चार राज्यांमध्ये आम्ही जलसंपदा विभागासोबत काम करत आहोत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला २४ सर्वोत्कृष्ट स्टार्टअपमध्ये स्थान दिले आहे आणि राज्य सरकारसोबतही आम्ही लवकरच काम करू. आमच्या प्रायोगिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या. पण सध्या आम्ही पंजाब आणि कर्नाटक राज्यांत कामे सुरू केली आहेत. आमचे तंत्रज्ञान वापरून देशाला सागरी संरक्षण, जलविकासात काकणभर मदत झाली तरी आमच्या कंपनीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

(शब्दांकन : मनीषा देवणे)