आशुतोष शिर्के

दुहेरी पदवीचा अभ्यास करताना अभ्यास अधिक नियोजनबद्ध आणि दुप्पट मेहनतीने करावा लागेल हे तर खरेच. पण करिअरची देदीप्यमान भरारी आणि आवडत्या विषयाचा सखोल अभ्यास या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील तर ड्युएल-डिग्री म्हणजेच दुहेरी पदवीच्या नव्या पर्यायाचा नक्की विचार करा.

मीता आणि तिचे पालक मला भेटायला आले तेव्हा काहीसे गोंधळलेले दिसत होते. मीताला स्टॅटिस्टिक्स (सांख्यिकी) ह्या विषयात उच्च-शिक्षण घ्यायचं आहे हे जवळ जवळ नक्की होतं. त्यासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये तिची शोधाशोध सुरूही झाली होती. पण त्याचबरोबर संगीत ह्या विषयातही तिला प्रचंड रस होता. गेल्या काही वर्षांमध्ये मेहनत करून पाश्चात्य अभिजात संगीतातील पियानोच्या आंतरराष्ट्रीय ट्रिनिटी परीक्षाही तिने मुंबईतील एका संस्थेद्वारा दिल्या होत्या.

‘मॅथ्स आणि स्टॅट्स ह्या विषयात मला पुढे पोस्ट-ग्रॅज्युएशन करायचंच आहे, पण त्याबरोबर संगीत केवळ छंद रहायला नको. भविष्यात जर मी त्यात प्रभावी ठरले आणि संधी मिळाली तर पुढे संगीत क्षेत्रातही काम करायला मला आवडेल. मला संगीताचा व्यासंग खरंच जोपासायचाय! जगातल्या विविध संगीत प्रकारांचा अभ्यास करायचाय,’ मीता खूप तळमळीने तिची समस्या मांडत होती. तिला नवं जग आणि त्यातल्या अभूतपूर्व संधी खुणावत होत्या. तिला काही गोष्टी करून पाहायच्या होत्या. पालकांना तिच्या करिअरच्या सुरक्षित मार्गाबद्दल काळजी वाटत होती. मीताला अर्थातच परदेशातील विद्यापीठांमधून अंडर-ग्रॅज्युएट डिग्रीपासून सुरुवात करावी लागणार होती.

मीतासारख्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून दिल्या जाणाऱ्या दुहेरी पदव्या अथवा ‘ड्युअल डिग्री’ योग्य ठरू शकतील. स्टॅटिस्टिक्स ह्या विषयातील बॅचलर डिग्री आणि त्याचबरोबर म्युझिकोलॉजी (संगीतशास्त्र) ह्या विषयातील बॅचलरसुद्धा ती एकाच वेळी करू शकते. आजच्या युगात परदेशातील अनेक विद्यापीठे जोड-पदव्या अथवा दुहेरी पदव्यांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत. मिताला हे दोन अभ्यासक्रम चार ते पाच वर्षांत पूर्ण करण्यासाठी अतिशय जोमाने आणि नियोजनपूर्वक मेहनत मात्र निश्चितच घ्यावी लागेल.

‘जोड पदवी’ अथवा ‘दुहेरी पदवी’ केवळ अभ्यास करता करता छंद जोपासण्यासाठी उपयोगी असतात असे मात्र नाही. अभ्यासाचे काही विषय वेग-वेगळ्या क्षेत्रातील असू शकतात. मला समजा बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात पदवी घ्यायची आहे पण त्याच बरोबर ‘आंतरराष्ट्रीय संबंध’( International Relations) किंवा अर्थशास्त्र ह्या विषयात सखोल जायचे असेल तर दुहेरी पदवी हा मार्ग असू शकतो. करिअरचे अधिक मार्ग ह्यामुळे माझ्यासाठी उघडू शकतात. बिझनेस मॅनेजमेंट आणि कायदा, इंजिनीअरिंग आणि अर्थशास्त्र, हेल्थ केअर आणि अॅडमिनिस्ट्रेशन, गणित आणि अर्थशास्त्र असे अनेक अभ्यासक्रम संयुक्त रितीने कमी वेळात पूर्ण केल्यास करिअरला एक नवी उभारी येऊ शकते.

परदेशी विद्यापीठांमध्ये ह्या जोड पदव्यांचे विविध प्रकार काय असतात ते असता समजून घेऊ.

● ड्युअल डिग्री किंवा डबल डिग्री : म्हणजे दोन स्वतंत्र पदव्या. ह्या अगदी वेगवेगळ्या विषयांमध्ये असू शकतात.

● डबल मेजर : एकाच पदवीत दोन विषय, यात एकच पदवी प्रमाणपत्र मिळते.

● जॉइंट डिग्री : दोन विद्यापीठांचे अभ्यासक्रम संयुक्तपणे चालवले जातात.

● इंटर डिसिप्लिनरी प्रोग्राम्स : तंत्रज्ञान व सामाजिक शास्त्रे यांच्या संयोगाचे नवे अभ्यासक्रम अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये सध्या पुढे येत आहेत.

ह्या जोड पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसा मिळवायचा?

हा प्रवेश मात्र एकत्र मिळत नाही. प्रत्येक पदवी अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया असते. प्रवेशाचे निकषही प्रत्येक विषयातील स्वतंत्र असतात. एकाच विद्यापीठातील दोन अभ्यासक्रम काही वेळा दोन स्वतंत्र कॉलेजेस मध्येही चालवले जाऊ शकतात. काही वेग-वेगळी आंतरराष्ट्रीय विद्यापीठे विशिष्ट दुहेरी अभ्यासक्रमांसाठी एकत्र येतात. अशा वेळी दोन्ही पदव्या दोन वेग-वेगळ्या विद्यापीठांतून मिळतात. ही विद्यापीठे किंवा कॉलेजेस दुहेरी पदव्यांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व तऱ्हेचे सहकार्य मात्र अतिशय हिरीरीने करत असताना दिसतात.

पदव्युत्तर अभ्यासक्रमातही (मास्टर्स) अशा प्रकारच्या दुहेरी पदव्या अस्तित्वात आहेत. अर्थात मास्टर्स पातळीवर प्रवेशाचे निकष अधिक कडक असतात. उदाहरणादाखल हार्वर्ड आणि इतर काही आघाडीच्या विद्यापीठातील अलीकडे प्रसिद्ध पावलेल्या मास्टर्स अभ्यासक्रमांची उदाहरणे पाहू.

● विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि मानव्य शास्त्र

● कॉम्प्युटर सायन्स आणि अर्थशास्त्र किंवा बिझनेस एनालिटिक्स.

● सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्स

● सस्टेनेबिलिटी आणि पब्लिक हेल्थ किंवा मॅनेजमेंट

● मीडिया आणि इंटरनॅशनल रिलेशन्स

● इंजिनीअरिंग आणि डिझाइन किंवा ह्युमन सेंट्रिक डिझाइन

● MBA आणि MPP : मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी

● JD आणि MBA: ज्युरिस डॉक्टर (कायदा) आणि मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन

इंजिनियरिंग आणि वैद्याक क्षेत्रातही अशा अनेक दुहेरी पदव्या आता उपलब्ध करण्यात येऊ लागल्या आहेत.

दुहेरी पदवीचा अभ्यास करताना अभ्यास अधिक नियोजन बद्ध आणि दुप्पट मेहनतीने करावा लागेल हे तर खरेच. त्यामुळेच की काय पण भारतीय विद्यार्थी अशा जोड किंवा दुहेरी पदव्यांकडे अभावानेच जाताना दिसतात.

करिअरची देदीप्यमान भरारी आणि आवडत्या विषयाचा सखोल अभ्यास ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील तर ड्युएल- डिग्री च्या नव्या पर्यायाचा नक्की विचार करा. आव्हानात्मक काम करू इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांनी आपल्या ज्ञान-कक्षा रुंदावण्याची आज खरच गरज आहे, नाही का?’’ mentorashutosh@gmail.com