सुहास पाटील
इंडियन नेव्हीमध्ये ४ वर्ष कालावधीच्या बी.टेक. डिग्री कोर्ससाठी (१०+२ (B. Tech.) Cadet Entry Scheme June 2024 (पर्मनंट कमिशन)) अविवाहीत पुरुष/महिला उमेदवारांना प्रवेश. कोर्स नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला, केरळ येथे जून, २०२४ पासून सुरू होणार. एक्झिक्युटिव्ह अँड टेक्निकल (इंजिनिअरींग अँड इलेक्ट्रिकल) ब्रँच – ३० पदे (९ पदे महिलांसाठी).
पात्रता : १२ वी (PCM) उत्तीर्ण. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांत सरासरी किमान ७० टक्के गुण आवश्यक. (१० वी किंवा १२ वीला इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण आवश्यक) आणि बी.ई./बी.टेक. प्रवेशासाठी असलेली जेईई (मेन) २०२३ परीक्षा उत्तीर्ण.
वय : उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै २००४ ते १ जानेवारी २००७ दरम्यानचा असावा.
शारीरिक आणि वैद्यकीय मापदंड : उंची – किमान १५७ सें.मी., छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.
दृष्टी : चष्म्याशिवाय ६/६, ६/९; चष्म्यासह ६/६, ६/६.
निवड पद्धती : जेईई (मेन) २०२३ मधील ऑल इंडिया कॉमन रँक लिस्ट (CRL) नुसार उमेदवारांना एसएसबी इंटरव्ह्यूसाठी शॉर्ट लिस्ट केले जाईल. एस्एस्बी इंटरव्ह्यू ऑगस्ट २०२३ पासून बंगळूरु/ भोपाळ/ कोलकता/ विशाखापट्टणम येथे घेतले जातील. SSB इंटरव्ह्यूसाठी शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना त्यांच्या ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.
एसएसबी इंटरव्ह्यू स्टेज-१ मध्ये इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर परसेप्शन आणि ग्रुप डिस्कशन यांचा समावेश असेल. जे उमेदवार स्टेज-१ उत्तीर्ण करणार नाहीत, त्यांना परत पाठविले जाईल. स्टेज-१ मधील उत्तीर्ण उमेदवारांचा स्टेज-२ इंटरव्ह्यू घेतला जाईल. ज्यात सायकॉलॉजिकल टेस्टींग, ग्रुप टेस्टींग आणि इंटरव्ह्यू यांचा समावेश असेल. स्टेज-२ इंटरव्ह्यू ४ दिवस चालतील. यातून उत्तीर्ण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेतली जाईल.
एसएसबी इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना जाण्या-येण्याचे एसी ३ टायरचे रेल्वे भाडे तिकीट दाखवून परत दिले जाईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या बँक अकाऊंट पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स अथवा चेकची झेरॉक्स सादर करणे आवश्यक.
ट्रेनिंग : एसएसबी इंटरव्ह्यूमधील गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. इंडियन नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला, केरळ येथे कॅडेट्सना ४ वर्ष कालावधीच्या अॅप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरींग, मेकॅनिकल इंजिनीअरींग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरींगकरिता प्रवेश दिला जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी यांची बी.टेक. डिग्री प्रदान करण्यात येईल व त्यांना इंडियन नेव्हीमध्ये सब-लेफ्टनंट पदावर पर्मनंट कमिशन दिले जाईल. संपूर्ण ट्रेनिंगचा खर्च (पुस्तके, शैक्षणिक साहित्य, हक्काचे कपडे, राहण्या-खाण्याचा खर्च यांचा समावेश) इंडियन नेव्हीकडून केलो जातो.
वेतन : दरमहा अंदाजे वेतन असेल रु. १,१५,०००/- अधिक इतर भत्ते.
प्रमोशन्स : सब-लेफ्टनंट पदापासून कमांडर पदापर्यंत टाईम स्केल बेसिसवर प्रमोशन्स दिली जातील.
इन्श्युरन्स : ग्रुप इन्श्युरन्स अंतर्गत १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
स्पोर्ट्स आणि अॅडव्हेंचर : इंडियन नेव्हीमध्ये विविध खेळांची संधी उपलब्ध असते. रिव्हर राफ्टिंग, गिर्यारोहण, हॉट एअर बलूनिंग, हँड ग्लायिडग, विंड सर्फिग इ. सारख्या अॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्येसुद्धा सहभागी होता येते.
जन्मतारखेचा पुरावा : (१) १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, (२) १० वीचे गुणपत्रक, (३) १२ वीचे गुणपत्रक, (४) जेईई (मेन) २०२३ स्कोअर कार्ड आणि (५) अलिकडच्या काळात काढलेल्या रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ इ. JPG/TIFF फॉरमॅटमध्ये स्कॅन करून ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करावेत.
ऑनलाइन अर्जाची प्रिंट सोबत उमेदवारांनी एसएसबी इंटरव्ह्यूच्या वेळी मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावीत.
ऑनलाइन (e- application) अर्ज www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर दि. ३० जून २०२३ पर्यंत भरता येतील.
suhassitaram@yahoo.com