डॉ. श्रीराम गीत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर, मी कला शाखेत प्रथम वर्षात आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे प्रवेश घेतला आहे. मला १० वी ला ७३.२० टक्के गुण आहेत आणि बारावीला कला शाखेत ६६.३३ टक्के गुण आहेत. मला यूपीएससी करायचे आहे; परंतु मनात खूप नकारात्मक विचारही येत आहे आणि संदर्भ साहित्य यांच्या विषयी गोंधळून गेलो आहे. कोणत्या लेखकाची पुस्तके वाचावीत हे समजत नाही. कृपया मला या विषयावर मार्गदर्शन करावे. – रितेश फड

बीए करत असताना दर परीक्षेत ७५ टक्के मार्क मिळवणे हे एकुलते एक ध्येय असू देत तुझे. यूपीएससी हा शब्द सध्या डोक्यातून पूर्णपणे बाजूला ठेव. हाती पदवी येत असताना सामान्य ज्ञान, लोकसत्ता करिअर वृत्तांत असे वाचन, मराठी व इंग्रजीमधे स्वत:चे काही निबंध स्वरूपी लिखाण एवढेच सध्या पुरे.

नमस्कार, मी १२ वीत आहे. मला १० वीला ९५ टक्के होते. मला आयआयटीमधून ग्रॅज्युएशन करायचे आहे. मी २०२४ ला ड्रॉप घेणार आहे. माझा हा विचार योग्य आहे का? जेईई साठी ड्रॉप घ्यावा की नाही? मला यूपीएससी किंवा अभियांत्रिकी करायचे आहे, महाविद्यालयाबरोबर सीएसई परीक्षेची तयारी सुरू करावी की नाही, याबाबत मार्गदर्शन करावे. – वेदिका अस्वले

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतीय उपखंडाची निर्मिती कशी झाली? भारताची भौगोलिक रचना कशी?

दहावीचे ९५ टक्के ज्या दिवशी विसरशील त्या दिवशी तुला पुढचा रस्ता नीट दिसू लागेल. बारावीला ड्रॉप न घेता बारावीची परीक्षा व जेईई ची परीक्षा देऊन तर बघ. पीसीएम मध्ये ८५/ ८५ /८५ मिळाले तर जेईईची परीक्षा रिपीट करता येऊ शकते. तुझे ध्येय अभियांत्रिकी व यूपीएससी असेल तर या सगळ्यांमध्ये आयआयटीचा संदर्भ दुय्यम राहतो. उत्तम मार्गाने अभियांत्रिकी पूर्ण करून यूपीएससीला तू प्रयत्न करू शकतेस. संपूर्ण भारतातून जेईई अॅडव्हान्सच्या परीक्षेत पहिल्या पाच हजारात तू आलीस तरच आयआयटी हा शब्द सुरू होतो. ही तुला नसलेली माहिती मुद्दाम अन्य वाचकांसाठी सुद्धा येथे लिहीत आहे. या साऱ्यावर नीट विचार कर. एवढ्यावरच लक्ष केंद्रित कर. यश मिळेल.

सर, माझ्या मुलीने २०२३ मध्ये बी एस्सी. नर्सिंगचा कोर्स एसएनडीटी विद्यापीठामधून पूर्ण केला आहे. सध्या ती हिंदुजा रुग्णालयात अॅप्रेंटिसशीप करत आहे. नर्सिंग व्यतिरिक्त तिच्यासाठी अजून काही उत्तम पर्याय आहेत का?

राहुल मोटघारे

बीएस्सी नर्सिंग झाल्यानंतर नर्सिंग व्यतिरिक्त अन्य पर्याय आपण विचारत आहात या मागची कारणे कोणती यावर मुलीशी तुम्हाला सविस्तर चर्चा करण्याची प्रथम गरज आहे असे मला वाटते. जो अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण केला आहे त्यात काम न करता दुसरे काहीतरी जर शोधायचे असेल तर ते आवडेल हे कशावरून? या बाबीवर आपण प्रथम नीट चर्चा करावी अशी माझी विनंती आहे. मात्र, आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून काही पर्याय समोर देत आहे. एमबीए इन हेल्थकेअर, मास्टर्स इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन, एमबीए इन मार्केटिंग, मास्टर्स इन सोशल वर्क, किंवा नर्सिंग शिकवणाऱ्या संस्थेमध्ये प्रशिक्षक अशा स्वरूपाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या त्या कामातील नोकऱ्या तिला मिळू शकतात.

सर, मी बीए केले आहे. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करत आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाजकल्याण अधिकारी गट चा सुद्धा अभ्यास करत आहे. माझा घरी राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होणार नाही. शासकीय वसतिगृहात राहण्यासाठी मी बीए नंतर एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा विचार करत आहे. म्हणजे मला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळेल. तेथून मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येईल. बीए नंतर एम.ए करण्यापेक्षा एमएसडब्ल्यूला प्रवेश घ्यावा, असा माझा विचार आहे. हे योग्य ठरेल? – शुभम जामखेडकर

आपल्या वयाचा उल्लेख नाही. त्यामुळे उत्तरावर मर्यादा आहे. एमएसडब्ल्यूला प्रवेश नक्की मिळेल तो घ्यावा पदवी पूर्ण करावी. त्यातून मिळेल ती नोकरी स्वीकारावी व त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा विचार करावा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70