एआयच्या विश्वातलं सगळ्यात आधुनिक आणि चित्तथरारक प्रकरण एजंटिक एआयचं आहे. एजंटिक एआयमुळे सगळ्या जगात मोठ्या उलथापालथी होणार असल्याची भाकितं एकीकडे केली जात असताना एआय माणसावर भारी पडेल की काय, अशा प्रकारच्या चर्चा होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे एजंटिक एआयच आहे. एआयचे गॉडफादर जेफ्री हिंटन यांच्यापासून एआयच्या जगातल्या सगळ्या प्रख्यात तज्ज्ञांनी याविषयी अनेकदा दिलेले इशारे भयप्रद आहेत. एआयला माणसावर नियंत्रण प्रस्थापित करता येऊ नये, तसंच एआयनं त्याला आखून दिलेलं काम नेमकेपणानं करण्याचाच मार्ग कायम अवलंबला पाहिजे यासाठी तरतुदी करणं अत्यावश्यक असल्याचं स्वत: हिंटनसुद्धा आग्रहानं सांगतात. प्रत्यक्षात ही भीती आपल्याला का वाटते आणि ती किमान काही प्रमाणात तरी दूर करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं, याचा आज विचार करू.

एजंटिक एआयचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अशा सॉफ्टवेअरला आपण दिलेलं स्वातंत्र्य. या सॉफ्टवेअरनं साधारणपणे कशा प्रकारे काम करावं, कोणते संदर्भ वापरावेत, काय करावं, काय करू नये याविषयीचे ढोबळ संकेत एजंटिक सॉफ्टवेअर लिहित असलेला प्रोग्रॅमर सूचनांच्या रूपानं देत असतो. जर एजंटिक सॉफ्टवेअरनं काही सूचनांनुसार अगदी तंतोतंतपणे काम करावं अशी अपेक्षा असेल तर या सूचना ढोबळपणानं न देता नेमकेपणानं द्याव्या लागतात. याचं एक उदाहरण घेऊ. समजा एका एजंटनं डॉलर आणि रुपया यांच्यामधला विनिमय दर एखाद्या ठरावीक वेबसाइटवरून घ्यावा असं आपण एजंटला सांगितलं असेल आणि नेमकं त्याच वेळेला ही वेबसाइट उपलब्ध नसेल तर? अशा वेळी एजंटिक सॉफ्टवेअर लिहित असलेल्या प्रोग्रॅमरला ‘ही वेबसाइट उपलब्ध नसेल तर पर्याय म्हणून अमुक अमुक असं कर’ असं एजंटला उद्देशून लिहावं लागतं. हे न केल्यास एजंट गोंधळून जाऊ शकतो. आता नेमकं काय करावं, हे त्याला ‘सुचत’ नाही – अगदी एखाद्या माणसासारखं.

याच्या पुढची पायरी म्हणजे काही बाबतींमध्ये एजंटला आपण अगदी काटेकोर सूचना न देता ढोबळ सूचना दिलेल्या असतील तर अशा वेळी एजंट ‘स्वत:ला वाटेल त्या प्रकारे’ कृती करण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो. नेमक्या अशाच प्रसंगी एआय माणसाला वरचढ होण्याची दाट शक्यता निर्माण होते. आपण वर उल्लेख केलेल्या डॉलर-रुपया उदाहरणात हा धोका अत्यंत नगण्य किंवा विचारातसुद्धा न घेण्यासारखा आहे. मात्र समजा एजंटिक आयचा वापर आपण काही धोकादायक कामांसाठी करत असलो आणि अशा वेळी संबंधित एजंटनं स्वत:हून काही निर्णय घेऊन त्यानुसार कामकाज करायला सुरुवात केली, तर काय होईल? ही शक्यता अशक्यप्राय अजिबातच नाही. यावर माणसाचं नियंत्रण कसं ठेवायचं?

एजंटिक एआयमध्ये यासाठी ‘ह्यूमन इन द लूप (एचआयटीएल)’ नावाची संकल्पना वापरली जाते. म्हणजेच एआयनं समजा काही महत्त्वाचे निर्णय स्वत: घेतलेले असतील तर ते घेऊन एआयला बेधडकपणे पुढे जाता येऊ नये आणि त्यापूर्वी एआयनं माणसाची परवानगी घ्यावी यासाठी एआयचं काम काहीसं स्थगित करून माणसानं परवानगी दिल्यावरच ते पुढे जावं अशी ही तरतूद असते. एआविषयीच्या असंख्य प्रकारच्या शंकाकुशंका, एआयच्या स्वातंत्र्याविषयीची भीती, नीतिमत्तेचे प्रश्न या सगळ्या मुद्दयांमध्ये एचटीआयलची भूमिका महत्त्वाची ठरते. अर्थात एजंटिक सॉफ्टवेअर लिहित असलेल्या प्रोग्रॅमरने यासाठीच्या तरतुदी करणं गरजेचं असतं. त्या केलेल्या नसतील तर ‘माणसाचं एआयवरचं नियंत्रण निघून जाण्याची’ शक्यता निर्माण होते.

सारांश म्हणजे एजंटिक एआय या सॉफ्टवेअरच्या प्रकाराला आपण स्वयंचलित म्हणत असलो तरी हे स्वैर किंवा संपूर्ण स्वयंचलन असू शकत नाही. त्यावर माणसाचं नियंत्रण असलंच पाहिजे. कदाचित आज आपल्याला याचं महत्त्व समजत नसेल. किंवा कदाचित अजून एजंटिक एआय तितकंसं प्रचलित नसल्यामुळे तसंच त्याविषयी फारसं बोललं जात नसल्यामुळे हा मुद्दा गौण असल्याचा गैरसमज अनेक लोक करून घेत असावेत. जसजशी एजंटिक एआयची क्षमता आणि त्याचा वापर वाढत जाईल तसतसा हा मुद्दा जास्त प्रकर्षानं चर्चेला येईल. तेव्हा फक्त ‘खूप उशीर’ झालेला नसेल, ही आशा!
akahate@gmail.com