आशुतोष शिर्के
परदेशी शिकायचं स्वप्न असेल तर गुणांबरोबर अनुभव, कौशल्य, आणि समाजाशी नातं या सगळ्यांचा सुंदर संगम घडवून तेणे गरजेचे आहे. विद्यापीठं तुमची गुणपत्रिका पाहतात, पण तुमची कहाणी मात्र काळजीपूर्वक वाचतात. त्यातून दिसणारी तुमची जीवनमूल्य, जिद्द आणि समाजाशी तुम्ही घडवू पाहात असलेलं नातं समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
भारतीय विद्यापीठांमध्ये किंवा सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी जास्तीत जास्त मार्क्स मिळवावे लागतात हे आपल्याला माहीत आहेच. भारतीय शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना त्याची सवयच जडलेली असते. परदेशी विद्यापीठांमध्ये मात्र केवळ उत्तम टक्केवारी असून भागत नाही. होय, चांगली शैक्षणिक कामगिरी आवश्यक आहे, पण त्या सोबतच तुमचा अनुभव, समाजाशी असलेलं नातं आणि स्वत:ची कहाणीही तितकीच महत्त्वाची ठरते.
अनुभव कामहत्त्वाचा आहे?
अमेरिका, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलियातील किंवा अशा इतर देशांमधील विद्यापीठं अर्ज पाहताना कोणते निकष महत्त्वाचे मानतात? ‘‘विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी खरंच विषयात रस घेते का?’’ तो किंवा ती शिकलेल्या ज्ञानाचा वापर कुठे करते?’’ आणि ‘‘समाजाशी तो किंवा ती कशारितीने जोडलेली आहे? समाजाशी त्यांचं नातं काय आहे?’’
याच प्रश्नांची उत्तरं तुमच्या इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स, संशोधन व सामाजिक काम यातून मिळतात.
म्हणूनच अनेकदा थोडे कमी गुण असलेल्या पण उत्तम अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश व शिष्यवृत्ती मिळतात, आणि फक्त टक्केवारीवर अवलंबून राहणारे विद्यार्थी मागे पडतात.
काही प्रेरणादायी उदाहरणे
माझ्याकडे समुपदेशासाठी साक्षी आली होती. साक्षी अभियांत्रिकीची विद्यार्थीनी. तिनं पर्यावरण-अभियांत्रिकी या विषयात मास्टर्स करायचं ठरवलं. महाविद्यालयात असतानाच तिने ग्रीन क्लब सुरू केला, एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम केलं आणि पर्यावरण विषयावरील काही ऑनलाईन कोर्सेस पूर्ण केले. तिच्या अनुभवांमुळे तिच्या अर्जाला अधिक बळ मिळालं.
दुसरं उदाहरण राजचं. राज कॉमर्सचा विद्यार्थी. परदेशात फायनान्स शिकायचं त्याचं स्वप्न. त्याने एका स्टार्ट-अपमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर एक छोटा उद्याोगही सुरू केला. पालकांना हा उद्याोग चक्क अनाठायी वाटत होता. राजने फायनान्सवर ब्लॉग लिहीणंही सुरू केलं. या सार्यातून तो अर्ज करत असलेल्या विद्यापीठांना त्याची उद्यामशील वृत्ती स्पष्ट जाणवली आणि त्याला प्रवेश मिळाला.
अशीच एक कला शाखेतील विद्यार्थिनी, अनन्या. हिला समाजशास्त्रात रस होता. अनन्याने ग्रामीण भागात अनेक सर्वेक्षणं केली. त्यावर आधारित छोटे संशोधन प्रबंध लिहिले. त्याकरिता प्राध्यापकांची मदत घेतली. काही स्पर्धांमध्ये हे प्रबंध वाचले. एका NGO मध्ये काम केलं. ती कॉलेजमधील एका डिबेट क्लबचं नेतृत्वंही करीत होती. या सार्यामुळे आनन्या ची आवड फक्त पुस्तकांपुरती किंवा वाचनापुरती नाही हे सिद्ध झालं.
हे सारं एकदम किंवा तात्काळ घडलं नाही. या करिता हे सर्व विद्यार्थी सातत्याने काही वर्ष काम करत होते. त्यांच्या कडे त्यांची एक योजना तयार होती.
तर ही ३ ते ४ वर्षांची योजना कशी असावी?
● पहिलं वर्ष – आपली आवड शोधा. लहान प्रोजेक्ट्स, स्वयंसेवा सुरू करा.
● दुसरं वर्ष – करिअरशी संबंधित इंटर्नशिप करा, ऑनलाइन ग्लोबल कोर्सेस पूर्ण करा.
● तिसरं वर्ष – मोठ्या संस्थेत इंटर्नशिप, रिसर्च पेपर, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घ्या.
● चौथं वर्ष – SOP लिहा, Resume तयार करा, प्राध्यापकांकडून शिफारसपत्रं ( LOR) मिळवा.
पण हे सारं नियोजन करताना कोणते अनुभव उपयुक्त ठरतात ते आता पाहू.
कोणते अनुभव उपयुक्त?
अकॅडमिक व रिसर्च प्रोजेक्ट्स – प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट्स, ऑनलाइन रिसर्च प्रोग्रॅम्स.
करिअरशी संबंधित इंटर्नशिप्स
● विज्ञान/तंत्रज्ञान : प्रयोगशाळा, AI, अभियांत्रिकी प्रोजेक्ट्स.
● समाजशास्त्र/कला : NGOs, मीडिया, पॉलिसी रिसर्च.
● कॉमर्स/व्यवस्थापन : स्टार्ट-अप, मार्केटिंग, फायनान्स.
● समाजाशी जोडलेले अनुभव : ग्रामीण कॅम्प, जनजागृती उपक्रम, स्वयंसेवा.
● भाषा व कौशल्य विकास :फ्रेंच, जर्मन, जपानी इ. भाषा; संवाद, नेतृत्व, लेखनकौशल्य.
● ग्लोबल एक्स्पोजर : एक्स्चेंज प्रोग्रॅम्स, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, ऑनलाइन जागतिक प्रोजेक्ट्स.
आणि यामध्ये काय टाळावं?
● फक्त प्रमाणपत्रं जमा करण्यासाठी वरवरचे कोर्सेस करणं.
● करिअरशी असंबंधित उपक्रमात वेळ घालवणं.
● ‘‘सगळं थोडं थोडं केलं, पण कुठेच खोलात नाही’’ अशी स्थिती होणं.
विद्यापीठांना यातून काय दिसतं?
● बौद्धिक जिज्ञासा : नवीन प्रश्न विचारण्याची आणि शोध घेण्याची वृत्ती.
● नेतृत्व : इतरांना सोबत घेऊन बदल घडवण्याची क्षमता.
● समाजाशी बांधिलकी : केवळ स्वत:साठी नव्हे तर समाजासाठी काम करण्याची तयारी.
● स्वत:ची कहाणी :मार्क्सपलीकडचा खरा व्यक्तिमत्त्वाचा ठसा.
त्यामुळे परदेशी शिकायचं स्वप्न असेल तर आजपासूनच तयारी सुरू करायला हवी. गुणांबरोबर अनुभव, कौशल्य, आणि समाजाशी नातं या सगळ्यांचा सुंदर संगम घडवून तेणे गरजेचे आहे. साक्षी, राज, अनन्या यांसारखे विद्यार्थी फक्त शैक्षणिक यशामुळे नव्हे तर त्यांच्या कहाणीमुळे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये पोहोचले.
हे लक्षात ठेवायला हवं की विद्यापीठं तुमची गुणपत्रिका जरूर पाहतात, पण तुमची कहाणी मात्र काळजीपूर्वक वाचतात. त्यातून दिसणारी तुमची जीवनमूल्य, जिद्द आणि समाजाशी तुम्ही घडवू पाहात असलेलं नातं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ती कहाणी दमदार बनवण्याची संधी तुमच्याकडे पुढील ३-४ वर्षांत आहे.
mentorashutosh@gmail.com