कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवाराने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे बोर्डाच्या सदस्यांचा अनुभव. प्रत्येक सदस्याने आपापल्या क्षेत्रात ३०/३५ वर्षे काम केलेलं असतं, त्यांचा अनुभव दांडगा असतो. त्यांना खोटी आणि कृत्रिम उत्तरं देणं हा त्यांचा एक प्रकारचा अपमान आहे. प्रामाणिक उत्तर देऊन आपण सदस्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आदर करत असतो.

मागील लेखात आपण काही प्रश्नांची उत्तरं मुद्देसूदपणे कशी द्यायची ते पाहिलं. आजच्या लेखातही आम्ही आणखी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशी द्यावीत याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. उमेदवारांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही जी उत्तरं सांगणार आहोत ती आदर्श उत्तरं नाहीत. ती उत्तरं कशी देता येतील हे दाखवणारी आहेत. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे साचेबद्ध उत्तरांपेक्षा वेगळी आणि क्रिएटिव्ह उत्तरं केव्हाही अधिक गुण मिळवून देऊ शकतात.

व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्ही तुमचं क्षेत्र सोडून नागरी सेवेमध्ये का येऊ इच्छिता? उमेदवारांनी इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की नागरी सेवा परीक्षा देण्यासाठीची जी अर्हता (एलिजिबिलिटी) आहे ती कोणत्याही क्षेत्रातला पदवीधर अशी आहे, म्हणजेच ह्या सेवेत कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेतलेली व्यक्ती येऊ शकते. वेगवेगळ्या क्षेत्रातले शिक्षण घेतलेले उमेदवार प्रशासकीय व्यवस्थेत किंवा सरकारी यंत्रणेत आले तर त्यांच्या ज्ञानाचा यंत्रणेत काम करताना फायदा होऊ शकतो. इथे बोर्डाच्या सदस्यांकडून असं म्हटलं जाऊ शकत की तुम्ही डॉक्टर आहात आणि तुमची बदली वित्त मंत्रालयात झाली तर तुमच्या डॉक्टरकीच्या ज्ञानाचा काय उपयोग? इथे उमेदवारांनी काही मुद्दे मांडले पाहिजेत.

पहिला मुद्दा हा की सरकारी सेवेत वेगवेगळ्या विभागात बदल्या होतातच आणि त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या व्यावसायिक शिक्षणाला सोयीचं पोस्टिंग मिळेलच असं नाही याची कल्पना आहे. आणि या वेगळ्या विभागात नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळणारच आहे. दुसरा मुद्दा असा की वित्त विभागात जर एखादा डॉक्टर अधिकारी असेल तर वैद्याकीय शिक्षणावर सरकारने किती खर्च करावा, वैद्याकीय क्षेत्रात कोणत्या गोष्टींमध्ये सरकारने गुंतवणूक करावी यावर तो अधिकारी वेगळा दृष्टिकोन मांडू शकतो. वैद्याकीय क्षेत्रातील उमेदवारांनी मी शासनाचे आरोग्यविषयक धोरण बदलण्यासाठी प्रशासनात प्रवेश करू इच्छितो अशी आदर्शवादी उत्तरे टाळावीत.

शासनाची धोरणं, योजनांत बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला तुमचे आयुष्य पणाला लावे लागते तेव्हा कुठे करिअरच्या शेवटी ती संधी मिळण्याची शक्यता असते. पण शासन योजनांच्या चोख अंमलबजावणीत तुम्ही अगदी सुरुवातीला प्रशिक्षणार्थी काळापासून योगदान देऊ शकता याविषयी सांगायला काहीही हरकत नाही.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या योजना पोहचविण्यासाठी लोकाभिमुख प्रशासन, नेतृत्व, लोकांचा त्यावर विश्वास बसावा म्हणून त्यांना ज्या भागात त्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली त्या भागाला प्रत्यक्ष भेटी आयोजित करणे किंवा दृकश्राव्य माध्यमातून लाभार्थी मंडळीसोबत संवाद साधण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे यासारखी पावले आपण निश्चितच उचलू शकतो. या मुद्द्यांचा आपल्या उत्तरात समावेश असला तर उमेदवार हा व्यवहारिक दृष्टिकोन असणारा आहे, अतिआदर्शवादी नाही असा सकारात्मक संदेशही आपण मुलाखतीच्या पॅनेलला संवादातून देऊ शकतो.

तुम्हाला नागरी सेवांमध्ये का यायचं आहे? या प्रश्नाच्या उत्तरात अनेकवेळा उमेदवार समाजसेवा, व्यवस्थेमध्ये बदल अशा प्रकारची काही अंशी आदर्शवादी उत्तरं देतात. त्यात काही चुकीचं आहे असं नाही. पण अती आदर्शवादी उत्तरं प्रामाणिक वाटत नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी आपलं प्रामाणिक उत्तर काय आहे ह्याचा मनाशी विचार करावा.

सरकारी नोकरीमध्ये सुरक्षितता आहे, या नोकरीत असल्यावर समाजात थोडा मान सन्मान मिळतो ह्याही गोष्टी उमेदवारांना महत्त्वाच्या वाटत असतात. त्यात गैर काहीच नाही. ते प्रामाणिक आणि सौम्यपणे बोर्डापुढे मांडण्यात काहीच गैर नाही. सरकारी यंत्रणा अफाट मोठी असते आणि इथल्या कामाचा प्रभाव (इम्पॅक्ट ) खूप मोठा असतो, बदल आणण्यासाठी आवश्यक ते अधिकार नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना असतात म्हणूनही नागरी सेवेत यायची इच्छा असू शकते.

सनदी सेवेतून तुम्हाला प्रशासनाच्या उच्च पदावर जाऊन समाजासाठी काही भरीव कामगिरी करण्याची संधी मिळते, लहानपणापासून आपण एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या समाजाभिमुख वा धडाकेबाज कामगिरीविषयी पाहिले, वाचले वा ऐकलेले असते अशा अधिकाऱ्यांच्या कामाविषयी संक्षिप्त तपशील देत त्यातून प्रेरणा मिळाली किंवा प्रशासकीय सेवेचे आपले आकर्षण वाढले हे मुद्देही उत्तरात मांडायला हरकत नाही. अनेकदा मुलाखतीत प्रशासनातील पैसा, सत्ता आणि सेवा या तिन्हीत तुम्हाला कोणती गोष्ट महत्त्वाची वाटते असा प्रश्न विचारला जातो आणि या प्रश्नाचे उत्तर देताना, तुम्ही ज्या पदांसाठी परीक्षा देत आहात त्यातील सर्व्हिस किंवा सेवा या शब्दाचा विसर पडता कामा नये.

अनेकवेळा मुलाखतीत तणावामुळे वेळेवर एखाद्या प्रश्नाचे अचूक उत्तर आठवत नाही त्यावेळी पॅनेलची परवानगी घेत, आपल्या मर्यादित ज्ञानाच्या आधारे आपण त्या उत्तराच्या जवळपास जाणारा अंदाज बांधत आहोत असे सांगत त्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकतो. मुलाखतीत तुम्हाला चांगले गुण मिळवण्यासाठी कुठल्याही प्रश्नाचे क्विझसारखे एकेरी उत्तर न देता सर्वसमावेशक विश्लेषणात्मक मुद्दे उत्तरात येतील अशा प्रकारे संरचना करत उत्तर दयावे. तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे आली यापेक्षा पॅनेलला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज अभिप्रेत असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कसे दिलेत त्यावर मुलाखतीत चांगले गुण मिळण्यास मदत होते.

प्रश्न पूर्ण ऐकूनच त्याचे उत्तर द्यावे. सिलेक्टिव्ह लिसनिंग करू नये म्हणजे विचारले एक आणि उत्तर दिले दुसरेच असे होता कामा नये जेणेकरून मुलाखती दरम्यान आत्मविश्वास कमी होईल. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवाराने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे बोर्डाच्या सदस्यांचा अनुभव. प्रत्येक सदस्याने आपापल्या क्षेत्रात ३०/३५ वर्षे काम केलेलं असतं, त्यांचा अनुभव दांडगा असतो. त्यांना खोटी आणि कृत्रिम उत्तरं देणं हा त्यांचा एक प्रकारचा अपमान आहे.

प्रामाणिक उत्तर देऊन आपण सदस्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आदर करत असतो. अतिआदर्शवादी गोष्टीदेखील सदस्यांपुढे मांडणं योग्य नाही कारण त्यांनी खूप जग पाहिलेले असते, मोठ्या यंत्रणेत काम करताना काय आव्हानं येऊ शकतात, अनेकवेळा प्रयत्न करूनही यश मिळत नाही, आपल्या नियंत्रणाबाहेरच्या अनेक गोष्टी असतात याची सदस्यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे प्रामाणिक आणि रिअॅलिस्टिक उत्तरं देणं हे केव्हाही उमेदवारांच्या हिताचं असणार आहे.

mmbips@gmail.com, supsdk@gmail.com