आजच्या लेखामध्ये आपण, चित्रपट -नाटक-टीव्ही मालिका- वेब मालिका पाहण्याची आवड यावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहूया. आम्ही वेळोवेळी या सदरामधल्या लेखात हे सांगितले आहे की उमेदवारांनी डीटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरला पाहिजे. काळजीपूर्वक अशा अर्थाने की जी माहिती त्यात लिहिली जाते ती पूर्णपणे खरी असली पाहिजे. माहिती अगदीच ढोबळ किंवा जनरल असू नये किंवा खूपच स्पेसिफिक पण असू नये. डीटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये? ‘चित्रपट पाहण्याची आवड’ हा एक पर्याय झाला. ‘हिंदी चित्रपट पाहण्याची आवड’ हा दुसरा पर्याय झाला. ‘१९७०-८० च्या दशकातले हिंदी चित्रपट पाहण्याची आवड’ हा आणखी एक पर्याय झाला. त्याचप्रमाणे, ‘विनोदी चित्रपट, थरारक किंवा भयपट, प्रादेशिक भाषांतले चित्रपट, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट बघण्याची आवड’ अशा प्रकारे बऱ्याच पद्धतीने उमेदवार आपल्या आवडीबद्दल लिहू शकतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही जे लिहिले आहे तो एक तुम्ही आणि बोर्डाचे सदस्य यामधला संवादाचा दुवा आहे.

चित्रपट पाहण्याची आवड या विषयी मुलखातीत नेहमी विचारले जाणारे प्रश्न –

१. तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहता? या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून तुम्हाला पुढील प्रश्न विचारले जातील.

२. तुम्ही भारतीय चित्रपटांची आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी तुलना कशी करता?

३. भारतीय चित्रपटांना ऑस्करसाठी वारंवार नामांकन का मिळत नाही?

४. तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे? का? तुमचा आवडता अभिनेता, अभिनेत्री कोण आहे?

५. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रमुख व्यक्तिमत्त्वे?

६. जर तुम्ही प्रादेशिक चित्रपटांचा उल्लेख केला तर तुम्हाला तुमच्या प्रदेशातील चित्रपटाचे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपटात योगदान कसे आहे याबद्दल प्रश्न येऊ शकतात.

७. भारतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे निर्माण करणाऱ्या भारतातील प्रमुख संस्था कोणत्या?

८. राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था यांचे कार्य

९. समांतर चित्रपट म्हणजे काय?

१० जुने चित्रपट अधिक लोकप्रिय होते का?

११. हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील नेमका फरक? बॉलिवूड, टॉलीवूड, कोलिवूड, मॉलीवूडमधील फरक काय?

१२. ऑस्कर पुरस्कारांना अकादमी पुरस्कार का म्हणतात? आजतागायत किती भारतीयांना आणी कोणत्या कॅटेगरीत ऑस्कर अवॉर्ड मिळाले आहे?

१३. सेन्सॉर बोर्डचे काम काय असते?

१४. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त म्हणून चित्रपट उद्योग वाचवण्यासाठी तुम्ही चित्रपटांची पायरसी कशी थांबवाल? कोणत्या कायद्यानुसार?

१५. तुम्ही इंटरनेटवर पायरेटेड चित्रपट पाहता का?

१६. कोणते चित्रपट हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटसृष्टीचे मैलाचे दगड/मानबिंदू आहेत?

१७. महिला अभिनेत्री, कनिष्ठ कलाकार, भारतीय चित्रपट उद्योगातील इतर सहकाऱ्यांचे छळ आपण कसे रोखू शकतो? या संदर्भात कायदेशीर तरतुदी काय आहेत?

१८. व्हीएफएक्स तंत्रज्ञान म्हणजे काय? बाहुबली आणि तान्हाजी चित्रपटांमध्ये ते कसे वापरले जाते?

१९. लोक चित्रपट का पाहतात?

२०. पीएसए म्हणजे काय? चित्रपटगृहांमध्ये पीएसए प्रसारित करण्याची परवानगी कोण देते?

२१. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य आहे का? राष्ट्रगीताच्या वेळी तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती उभी नसेल तर तुम्ही काय कराल?

२२. अमेरिकेत इतर देशांच्या चित्रपटांवर १००% कर लावल्याने भारतीय चित्रपट उद्योगाच्या महसुलावर परिणाम होईल का?

२३. आजकाल दक्षिण भारतीय चित्रपट भारतीय चित्रपटांवर वर्चस्व गाजवताना दिसत आहेत का?

२४. २०२४ सालचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले का आणि वेगवेगळ्या कॅटेगरीत कुणा कुणाला ते पुरस्कार घोषित केले गेले?

नाटक पाहण्याची आवड

उमेदवाराने ही आवड जर नमूद केली असेल तर, चित्रपटांप्रमाणेच कोणत्या प्रकारची नाटक पाहायला आवडतात हा प्रश्न येऊ शकतोच. मराठी नाटकं पाहण्याची आवड असेल तर मराठी रंगभूमीच्या दीर्घ परंपरेबद्दल उमेदवाराला थोडी फार माहिती असलीच पाहिजे. संगीत रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, समांतर रंगभूमी , बाल रंगभूमी या संकल्पना काय आहेत याचीही माहिती हवी. मराठी थिएटरवर पाश्चात्य थिएटरचा प्रभाव आला का? मराठी नाट्यसृष्टीतले महत्वाचे नाटक कार, महत्वाचे निर्माते, कलाकार ही माहिती असली पाहिजे. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर , महेश एलकुंचवार, विजया मेहता ह्यांचे मराठी नाटक क्षेत्रात काय योगदान आहे? घाशीराम कोतवाल , सखाराम बाईंडर या विजय तेंडुलकर यांच्या प्रसिद्ध नाटकांवर यूपीएससी मुलाखतीत हमखास प्रश्न विचारतात.

तुम्ही नाटक का पाहता, आवडतं नाटक हे नेहमीचे प्रश्न. मराठी बाल रंगभूमीने मराठी, हिंदी नाटक आणि चित्रपट क्षेत्राला अनेक गुणी कलावंत मिळवून दिले त्याबद्दलही थोडीफार माहिती हवी. मराठी रंगभूमी दिवस आणि जागतिक रंगभूमी दिवस केव्हा आणि का साजरे करतात? मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ कोणता?

वेब- टिव्ही मालिका

हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला मनोरंजनाचा प्रकार आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वेब वा टिव्ही मालिका बघायला आवडतात आणि का, याची व्यवस्थित तयारी करावी. वेगवेगळ्या भाषांमधल्या वेब सिरीज किंवा मालिका पाहत असाल तर त्यातला फरक, विषयांची निवड, विषयाचे सादरीकरण याबद्दल थोडीफार माहिती असली पाहिजे. क्राइम थ्रिलर्समुळे गुन्हेगारांना वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करण्यास अधिक माहिती दिली जात आहे का? ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचं प्रमाण कमी झालं आहे असं तुम्हाला वाटत का?

डीटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलेल्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून कायकाय प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याचा विचार करून त्या अनुषंगाने उमेदवारांनी तयारी केली पाहिजे.