उमेदवारांची सर्वसाधारण आणि भाषिक आकलन क्षमता तपासण्याच्या उद्देशाने हा घटक आयोगाच्या परीक्षांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पूर्व परीक्षा पेपर दोनमध्ये ५० टक्के गुणांसाठी असणारा हा भाग सर्वाधिक वेळखाऊ सुद्धा आहे. त्यामुळे याची तयारी आणि परीक्षा हॉलमधील वेळेचे नियोजन या बाबी अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
आकलन – उताऱ्यांवरील प्रश्न या घटकाचे सर्वसाधारण स्वरुप पुढीलप्रमाणे आहे-
अभ्यासक्रमातील आकलन आणि इंग्रजी व मराठी भाषा आकलन या दोन स्वतंत्र मुद्द्यांसाठी उताऱ्यांवरील प्रश्न विचारण्यात येतात.
एकूण १० पैकी आठ उतारे हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये देण्यात येतात.
एक उतारा फक्त मराठीमध्ये आणि एक उतारा फक्त इंग्रजीमध्ये त्यात्या भाषांच्या आकलनाची चाचणी करण्यासाठी समाविष्ट करण्यात येतो.
सरासरी ३०० ते ३५० शब्दांचे हे उतारे असतात.
एकूण ५० पैकी किमान १० प्रश्न हे बहुविधानी प्रकारचे असतात.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उमेदवारांच्या अनुभवाचे विश्लेषण केले तर या विषयाच्या तयारीमध्ये पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
आकलनाच्या हेतूने वाचन करण्यासाठी लागणारा वेळ हा मनोरंजनासाठी किंवा निर्हेतूक वाचनाच्या जवळपास दुप्पट असतो. त्यामुळे उतारा समजून घेऊन प्रश्न सोडविताना वेळेच्या मर्यादेमुळे ताण येतोच. परिणामी एकाग्रतेने आणि वेगाने उतारा वाचणे आव्हानात्मक वाटते. वेळेचे नियोजन आणि मार्कांचे गणित कोलमडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळ लावून सराव करणे या घटकाच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
परीक्षा हॉलमध्ये आपल्याला उताऱ्याचा अभ्यास करायचा नाही तर प्रश्नांची उत्तरे देऊन गुण मिळवायचे आहेत हे मनामध्ये व्यवस्थित बिंबवून घ्यायला हवे. आपल्याला प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित सापडत असेल तर उतारा संपूर्णपणे कळला नसेल तरी हरकत नसते. अर्थात प्रश्न वाचून त्यांची उत्तरे शोधली आणि काम झाले असा कोणताही उतारा सहज सोपा नसतो. तो ढोबळमानाने तरी समजलाच पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उतारे वाचणे आणि सोडवण्याचा सराव अत्यंत आवश्यक आहे.
दिलेला उतारा उमेदवार पहिल्यांदाच वाचत आहे हे प्रश्नकर्त्याला माहीत असते त्यामुळे विनाकारण गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जात नाहीत.
बहुतांश वेळा मराठीतूनच उतारा वाचण्याचा उमेदवारांचा कल असतो. पण बऱ्याच वेळा यामुळे पर्यावरणविषयक किंवा काही विज्ञानविषयक माहितीवरील उतारे वाचून समजण्यास जास्त वेळ लागतो. अवघड पारिभाषिक शब्दांमुळे उमेदवारांना उताऱ्याचे आकलन होण्यात अडचणी येतात. अशा उताऱ्यांमध्ये जर पारिभाषिक संज्ञा जास्त असतील आणि तथ्यात्मक प्रश्न जास्त विचारले असतील तर असे उतारे इंग्रजीतून वाचल्यास वेळेची बचत होऊ शकते.
तथ्यात्मक माहिती, पारिभाषिक संज्ञांचा समावेश असलेल्या उताऱ्यांवर सरळ प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे हे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते. असे उतारे आधी प्रश्न पाहून वाचत गेल्यास शक्य तेथे प्रश्नानुसार आवश्यक माहिती अधोरेखित करत वाचणे शक्य होते आणि उत्तरे देण्याचा वेळ कमी होतो.
एखाद्या उताऱ्याचा टोन औपरोधिक किंवा तिरकस असेल तर भाषेवर आवश्यक पकड नसलेल्या उमेदवारांसाठी तो समजून घेणे आव्हानात्मक ठरु शकते. अवांतर साहित्यिक वाचनाची सवय (अभ्यासावर परिणाम होऊ न देता) असेल तर असे उतारेही आत्मविश्वासाने सोडविता येतात.
काही वेळा उताऱ्याच्या पहिल्या काही ओळी वाचून तो अवघड वाटल्याने आत्मविश्वास कमी होतो. आणि त्यामुळे त्यावरील प्रश्न फारसे आव्हानात्मक नसले तरी अवघड वाटू लागतात. एखादा उतारा नाही समजला आणि त्यावर तथ्यात्मक माहिती विचारली असेल तर तो बोनस घ्यायलाच हवा.
प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून दिसते की, संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न हे प्रबोधन काळ, लेखकांचे व्यक्तिगत अनुभव, अॅॅबस्ट्रॅक्ट विषयांवर आधारित उताऱ्यांवर बहुतांश विचारण्यात येतात. त्यामुळे अशा विषयांवरील लोकसत्ता, साधना मासिक अशा स्राोतांतील लेख वाचणे आणि तयारीच्या वेळी ते व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे लेखन समजून घ्यायचा सराव झाला की परीक्षा हॉलमध्ये कमीत कमी वेळेमध्ये उताऱ्यांचे आवश्यक आकलन होण्यास मदत होते.
मराठी आकलनासाठी तिरकस, औपरोधिक आणि तत्त्वचिंतनपर अशा विषयांवरील साहित्य वाचण्याचा सराव आवश्यक आहे.
इंग्रजी आकलनासाठी इंडियन एक्सप्रेस मधील संपादकीय, विज्ञान व अर्थव्यवस्थेबाबतचे लेख वाचून ते समजून घेण्याचा सराव आवश्यक आहे. त्याचबरोबर शब्द संग्रह वाढविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करायला हवा. याचा फायदा नेहमीसाठी होणार आहे.
आकलनाच्या पारंपरिक प्रश्न पद्धतीमध्ये प्रश्नांची स्वत:च्या भाषेत उत्तरे लिहून आपले कौशल्य दाखविण्यास वाव असतो. पण वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये दिलेल्या पर्यायांमधून उत्तरे शोधताना नेमकेपणा आणि प्रश्नकर्त्याला अपेक्षित उत्तराचा अंदाज बांधणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे वाचन आणि त्यातून नेमके आकलन याचा सराव या घटकामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
दिलेला उतारा उमेदवारांनी कमीत कमी वेळेत समजून घेऊन त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे यामध्ये अपेक्षित आहे. एका अर्थाने हा उमेदवारांच्या वाचन आणि आकलनाची परीक्षा असतो. आकलनाशिवाय वेगाने वाचन सोपे आहे. पण नुसते वाचन आणि आकलनासह वाचन यांमध्ये गुणवत्ता आणि आवश्यक वेळ दोन्हीतही फरक असतो. वाचनाचा वेग आणि आकलन वाढविण्याचा प्रयत्न करणे या घटकाच्या तयारीसाठीच नाही तर एकूण अभ्यासामध्येही अत्यंत महत्त्वाचे आहे. आकलनासहित वाचनाचा वेग वाढवण्यासाठी सराव आणि सवय या दोन्ही बाबी खूप आवश्यक आहेत.
steelframe.india@gmail.com