डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर

मागील लेखात आपण ‘वर्क फ्रॉम होम’ पाहिले, आज आपण थेट ‘होम’ बदलण्याबद्दल बोलू ! नोकरीतील रिलोकेशन ही एक सुवर्णसंधी असू शकते – विशेषतः जर ती करिअरच्या दृष्टीने फायदेशीर असेल आणि त्या ठिकाणी व्यक्ती स्वतःला विकसित करू शकते. मात्र त्यासोबतच वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक बाबींचा बारकाईने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

आजच्या जागतिक आणि गतिमान युगात करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी स्थलांतर (relocation- रिलोकेशन) एक सामान्य बाब झाली आहे. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना विविध कारणांसाठी वेगवेगळ्या शहरात किंवा देशात कामासाठी पाठवतात – हे कारण एखाद्या नवीन प्रकल्पात काम करणे असू शकते, नेतृत्व विकासासाठी संधी असू शकते, किंवा कंपनीच्या विस्ताराच्या योजना असू शकतात.

रिलोकेशनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे करिअरमध्ये वेगाने प्रगती करण्याची संधी. नवे प्रकल्प, नव्या जबाबदाऱ्या आणि विविध प्रकारच्या ग्राहकांशी काम करताना तुमचा अनुभव समृद्ध होतो. तुम्ही अधिक मोठी जबाबदारी व पदासाठी विचारार्ह असाल आणि त्याने तुमच्या कामाच्या व्याप्तीत विस्तार होतो. बहुधा असे रिलोकेशन हे कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रोजेक्ट्ससाठी असते – त्यामुळे अनेक लोकांच्या नजरेसमोर तुम्ही येता आणि तुमची ‘visibility’ वाढते आणि प्रमोशनच्या संधी निर्माण होतात.

नवीन ठिकाणी काम करताना वेगळ्या कार्यसंस्कृतीत काम करण्याचा अनुभव मिळतो. तुम्हाला विविध टीम्ससोबत काम करावं लागतं, संवाद कौशल्यं सुधारतात, आणि लवचिकता वाढते. नवीन प्रणाली, टूल्स, वर्क फ्लो यांचा परिचय होतो – जे पुढे तुम्हाला अधिक चांगल्या नोकरीच्या संधी देऊ शकतात.

बहुतांशी वेळेला रिलोकेशन सोबत वेतनवाढ, HRA वाढ, अतिरिक्त भत्ता किंवा रिलोकेशन बोनस मिळतो. काही कंपन्या घर बदलण्याचा खर्च, शाळा शोधणे अशा बाबींसाठी आर्थिक मदत करतात. बव्हंशी आंतर्राष्ट्रीय संधी आर्थिक फायदा तर देतातच पण कुटुंबाला पण जग पाहण्याची अनुभवायची संधी देतात आणि यामुळे expatriate benefits देखील मिळतात.

नोकरीच्या पहिल्या काही वर्षांमध्ये कुटुंबाची फार जबाबदारी नसते आणि म्हणून सामान्यतः रिलोकेशनचे तोट्यापेक्षा फायदे अधिक असतात. तरीही आपण तौलनिक दृष्ट्या बघितले तर नवीन शहरात जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी मोठा बदल. मुलांची शाळा, जोडीदाराची नोकरी, वृद्ध पालकांची काळजी – या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. एक ठरलेली जीवनशैली, मित्रपरिवार, ओळखीचं वातावरण – या सगळ्या गोष्टी मागे सोडून जावं लागतं. नवीन ठिकाणी जुळवून घेण्यास वेळ लागतो.

काही कंपन्या रिलोकेशनची मदत करतात, पण काही वेळा हे खर्च स्वतःच्या खिशातून करावे लागतात. नव्या घराची सोय, वाहतूक, मूलभूत सुविधा – या सर्व गोष्टींचं नियोजन आर्थिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक ठरू शकतं.

नवीन ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागतं. नव्या टीमसोबत जुळवून घेणं, नवीन जबाबदाऱ्या पेलणं – या सर्वामुळे मानसिक ताण वाढू शकतो. जोडीला कुटुंबातील समायोजनाचे प्रश्न असल्यास ते दडपण अधिक वाढू शकतो.

नोकरीतील स्थलांतर ही एक सुवर्णसंधी असू शकते – विशेषतः जर ती करिअरच्या दृष्टीने फायदेशीर असेल आणि त्या ठिकाणी व्यक्ती स्वतःला विकसित करू शकते. मात्र त्यासोबतच वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक बाबींचा बारकाईने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

जर कंपनीने स्पष्ट योजना दिली असेल, सहकार्य केले असेल, आणि तुम्ही त्या संधीचा सकारात्मक स्वीकार करू शकत असाल, तर स्थलांतर तुमच्या व्यावसायिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, यासाठी प्रामाणिक संवाद, योग्य नियोजन आणि कुटुंबाची (पालक वा जोडीदार ) सहमती ही तीन महत्त्वाची सूत्रे आहेत.

स्थलांतर स्वीकारण्यापूर्वी काही उपयुक्त गोष्टी:

१. सर्व अटी लेखी स्वरूपात घ्या.

२. कुटुंबासोबत संवाद साधून त्यांचे मत समजून घ्या.

३. नवीन ठिकाणाची माहिती आधीच गोळा करा – शिक्षण, आरोग्य, घरभाडे, वाहतूक इ.

४. एकदा स्थलांतर झालं की स्थानिक लोकांशी संवाद, कॅम्पसवरील कार्यक्रम, तिथली भाषा, संस्कृति जाणून घ्या- मग ते भारतात असो वा परदेशात! शेवटी, रिलोकेशन हे केवळ भौगोलिक स्थलांतर नाही, तर एक आव्हानात्मक संधी आहे – जी तुमचं व्यक्तिमत्त्व घडवते आणि भविष्यातील उंची गाठण्यासाठी तुमचं बळ वाढवते.