Success Story: प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं. पण, आपण नक्की काय करावं हे अनेकांना लवकर कळत नाही. आज आम्ही अशाच एका यशस्वी उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्याने नकळत सुचलेल्या कल्पनेतून करोडोंचा व्यवसाय सुरू केला आहे.

भावेश चौधरी याने हरियाणातील एका खेडेगावात राहून अवघ्या तीन हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून करोडोंचा तुपाचा व्यवसाय उभा केला. भावेशची ही यशोगाथा अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. भावेशच्या कुटुंबातील अनेक जण लष्करात आहेत, त्यामुळे त्यानेही सैन्यात भरती व्हावे अशी त्याच्या घरच्यांची इच्छा होती. पण, भावेशला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याने बीएसस्सीला प्रवेश घेतला, पण शिक्षणातही त्याला फारसा रस नसल्यामुळे त्याने बीएसस्सीतून शिक्षण अर्धवट सोडले.

भावेश भविष्यात नक्की काय करेल अशी चिंता नेहमीच त्याच्या घरातील सदस्य व्यक्त करायचे. पण, भावेशला ऑनलाइन व्यवसाय करायचा होता, पण काय करावं ते समजत नव्हतं. मग त्याला बीएसस्सीच्या शिक्षणादरम्यानचे हॉस्टेलचे दिवस आठवले. त्याच्या रूममेट्सनी अनेकदा त्याला गावातून शुद्ध तूप आणण्याची विनंती केली होती. शुद्ध गावठी तुपाला शहरांमध्ये किती मागणी आहे, हे भावेशला समजले. येथूनच भावेशला तुपाच्या व्यवसायाची कल्पना सुचली.

पण, या व्यवसायाची सुरुवात कुठून करावी हे भावेशला समजत नव्हते. त्यामुळे व्यवसाय उभा करण्यासाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्याला पॅकेजिंगचे, मार्केटिंगचे ज्ञान नव्हते. शिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. यावेळी त्याने यूट्यूबची मदत घेतली. त्याने त्याच्या आईचे तूप बनवतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात केली. यावेळी शुद्ध तूप हवे असल्यास आपला नंबरदेखील शेअर केला. हळूहळू त्याच्या शुद्ध देशी तुपाची मागणी वाढू लागली. आज तो करोडोंचा व्यवसाय करत आहे.

हेही वाचा: Success Story: दहावीच्या परीक्षेत नापास… नातेवाइकांनी केला अपमान; मेहनतीच्या जोरावर उभी केली करोडोंची कंपनी अन् पटकावले तीन राष्ट्रीय पुरस्कार

भावेशने गायीच्या दुधापासून तूप बनवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अवघ्या आठवडाभरात पहिली ऑर्डर मिळाली. या ऑर्डरमधून त्याला १,१२५ रुपये मिळाले. ही त्याच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात होती. भावेशने आपल्या मेहनतीच्या जोरावर १५,००० हून अधिक ग्राहक मिळवले आहेत. आज भावेशच्या तुपाला भारतभर मागणी आहे. तो प्रत्येक महिन्याला ७० लाख रुपये कमावतो.

‘कसुतम बिलोना तूप’ हे भावेशच्या व्यवसायाचे नाव असून त्याचा हा व्यवसाय आठ कोटी रुपयांचा झाला आहे. त्याची ही गोष्ट अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.