Success Story of Anjali Vishwakarma : चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे धावणे ही गोष्ट फार कमी लोकांना जमते. अनेकदा आपल्याकडून होणारच नाही, आपण करूच शकणार नाही किंवा आता वेळ गेली, असे म्हणणारे तुम्हाला भरपूर दिसतील. पण, आज आपण अशा एका आयपीएस ऑफिसरच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत; जिने परदेशातील उच्च पगाराची नोकरी सोडून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला.

तर आज आपण आयपीएस अंजली विश्वकर्मा यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. अंजली विश्वकर्मा हिचा जन्म उत्तराखंडमधील देहरादून येथील एका साध्या आणि सामान्य कुटुंबात झाला . अंजली नेहमीच अभ्यासात हुशार होती आणि शालेय परीक्षांप्रमाणेच ती बारावीच्या बोर्ड परीक्षेतही अव्वल राहिली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने प्रतिष्ठित आयआयटी कानपूरमधून एरोस्पेस अभियांत्रिकीमधून बी.टेक केले.

dnaindia दिलेल्या वृत्तानुसार तिच्या कारकिर्दीची सुरुवात अभियांत्रिकी क्षेत्रात झाली आणि त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या. गेल्या काही वर्षांत तिने न्यूझीलंडसह सहा वेगवेगळ्या देशांमध्ये काम केले; जिथे तिला लाखोंच्या पॅकेजमध्ये पगार होता (वार्षिक पगार ४८ लाख रुपये होता, असे सांगण्यात आले आहे). पण, परदेशातील या यशस्वी जीवनानंतरही अंजलीला स्वतःच्या देशाची सेवा करण्याची इच्छा होती.

कामामुळे आदरासह मिळाली ओळख (Success Story)

परदेशातील नोकरी सोडून ती भारतात परत आली आणि यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय तिने घेतला. हा निर्णय सोपा नव्हता आणि तिचा प्रवास आव्हानांनी भरलेला होता. ती यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली नाही. त्यामुळे तिने पुन्हा प्रयत्न केला. अखेर २०२० मध्ये अंजलीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची भारतीय पोलिस सेवेत (IPS) निवड झाली. महिलांशी संबंधित गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठीच्या तिच्या कामामुळे तिला आदरासह ओळखही मिळवून दिली आहे.

सध्या अंजली विश्वकर्मा कानपूर शहर पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ADCP) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १९ मार्च २०२५ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी बाबूपुरवा येथे सहायक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून आणि कानपूरमधील सायबर क्राइम युनिटमध्येही काम केले आहे. तर असा आयपीएस अंजली विश्वकर्मा हिचा प्रवास आहे.