Amit Damani Success Story In Marathi : आपल्या देशामधील अनेक तरुण मंडळी सध्या स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. लॉकडाउनपासून स्वत:ची कंपनी, स्वतःचे दुकान सुरु करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगात वेगवेगळ्या क्षेत्रात, मोठमोठ्या व्यवसायांमध्ये अनेकांनी आतापर्यंत स्वतःची नाव मोठे केले आहे. त्यातीलच एका व्यक्तीची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत…
मुंबईतील सरकारी शाळेत एकेकाळी शिक्षक म्हणून काम करणारे अमित दमानी आज १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यवसाय चालवत आहेत. त्यांनी त्यांच्या लोणावळा येथील घरापासून त्यांच्या प्रवास सुरू केला आणि मग काही वर्षात याचे एका यशस्वी उपक्रमात रूपांतर झाले आहे.
अमित दमानी अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदवीधर आहेत. त्यांनी मुंबईतील धारावी येथील एका सरकारी शाळेत टीच फॉर इंडिया फेलोशिप अंतर्गत शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०१२ मध्ये ही फेलोशिप पूर्ण केल्यानंतर, त्यांनी डालबर्ग ग्लोबल डेव्हलपमेंट ॲडव्हायझर्स नावाच्या कंपनीत असोसिएट कन्सल्टंट म्हणून २०१४ पर्यंत काम केले आहे.
नंतर २०१५ मध्ये त्यांनी अंकिता शेट आणि प्रणव महेश्वरी यांच्या बरोबर मिळून व्हिस्टा रूम्स (आताचं नाव स्टेव्हिस्टा असे आहे) या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला ही कंपनी लहान हॉटेल्स आणि घरं भाड्याने देण्याचं काम करत होती. पण नंतर ते लक्झरी प्रॉपर्टीज म्हणजेच जास्त सोयी-सुविधा असलेल्या आलिशान व्हिलाकडे वळले. आज स्टेव्हिस्टा ही कंपनी भारतातील एक प्रसिद्ध लक्झरी व्हिला रेंटल ब्रँड म्हणून ओळखली जाते. त्यांच्याकडे ८०० हून अधिक निवडलेली हॉलिडे होम्स असून त्या ६० पेक्षा जास्त ठिकाणी उपलब्ध आहेत.
कंपनीचा टर्नओव्हर ११० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला… (Success Story)
स्टेव्हिस्टा कंपनी प्रत्येक बुकिंगवर ३० टक्के कमाई ठेवते आणि ७० टक्के घराच्या मालकाला दिले जाते. केवळ १० वर्षांत या कंपनीने खूप मोठी आर्थिक प्रगती केली आहे. तसेच २०२३ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर ११० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. येत्या काही वर्षांत १,००० कोटी रुपयांची उलाढाल आणि २,५०० हून अधिक घरे व व्हिला त्यांच्या ब्रँडखाली असतील असे स्टेव्हिस्टाचे कंपनीचे लक्ष्य आहे.
तर अमित दमानी एंजेल इन्व्हेस्टर म्हणूनही काम करतात. म्हणजेच ते नवीन कंपन्यांमध्ये सुरुवातीला पैसे गुंतवतात. त्यांनी ज्या काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यात Medbikri आणि Driffle यांचा समावेश आहे. त्यांना डिझाइन, टेक्नॉलॉजी, व्यवसाय आणि खरेदी यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये रस आहे. डमानी हे मुंबईतील रॉबिन हूड आर्मीचे संस्थापक सदस्य देखील आहेत. ही संस्था हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील उरलेलं अन्न गोळा करून ते गरजू लोकांना देण्याचं काम करते.