Success Story Of Anubhav Dubey : उद्योजकता याची व्याख्या तयार करायची झाल्यास कठोर परिश्रम, समर्पण आणि पॅशन यांचे मिश्रण अशा शब्दात आपण करू शकतो. एखादा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी काही तंत्रे आणि कौशल्यांची गरज असते. काही मूलभूत गोष्टी आपल्याला माहीत असणे उपयुक्त ठरते. कारण या क्षेत्रात झेप किंवा उडी घेतल्यानंतर उद्भवणारे संभाव्य धोके, अडचणी, ट्रोलिंग यांचा सामना करावा लागतो. तर आज आपण अशाच एका प्रेरणादायी उद्योजकाची कथा जाणून घेणार आहोत.
जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर ही गोष्ट ‘चाय सुट्टा बार’ या चहा कंपनीचे सह-संस्थापक अनुभव दुबे याची. त्याच्या ब्रँडची वार्षिक उलाढाल जवळपास आता १५० कोटी रुपयांची आहे. इथपर्यंत पोचणारा त्याचा प्रवास हे सिद्ध करतो की, योग्य दृढनिश्चयाने एखाद्या कल्पनेला यशस्वी व्यवसायात रूपांतरित करता येऊ शकते.

२८ वर्षीय अनुभव दुबे मध्य प्रदेश राज्यातील रेवा जिल्ह्यातील आहे. अनुभवने आयआयटी किंवा आयआयएमसारख्या संस्थांमध्ये जाण्याचा मार्ग अवलंबला नाही. त्याचे मोठ्या संस्थेत प्रवेश घेण्याचे स्वप्न होते, त्याने यूपीएससी परीक्षेचा प्रयत्नही केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर काही काळानंतर त्याला जाणवले की, त्याची खरी आवड ही उद्योजकतेमध्ये आहे. त्यानंतर स्वतःची आवड लक्षात घेऊन त्याने स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे ठरवले.

२०१६ मध्ये अनुभवने त्याचा मित्र आनंद नायक बरोबर पार्टनरशिप केली आणि केवळ तीन लाख रुपयांमध्ये ‘चाय सुट्टा बार’ सुरू केला, हे पैसे त्याची वैयक्तिक बचत होती. कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेता, अनुभवने मध्य प्रदेशातील इंदूर येथील मुलींच्या वसतिगृहाजवळ एका छोट्या चहाच्या स्टॉलपासून सुरुवात केली आणि हळूहळू उद्योजकतेच्या जगात प्रवेश केला. त्यांनी पारंपरिक मातीच्या कपांमध्ये (कुल्हाड) चाय द्यायला सुरुवात केली, ज्यामुळे तो पटकन लोकप्रिय झाला.

या दोघांकडे अगदी मर्यादित निधी होता, म्हणून ते स्वतःच क्रिएटिव्ह बनले आणि त्यांनी स्वतः कॅफेचे बोर्ड पेंट केले आणि कॅफेला डिझाइन केले. नंतर त्यांनी इको-फ्रेंडली कपांमध्ये २० वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये चहा देण्यास सुरुवात केली. या अनोख्या संकल्पनेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत झाली. त्यामुळे आज, ‘चाय सुट्टा बार’ने भारतातील १९५ हून अधिक शहरांमध्ये तसेच दुबई आणि ओमानमध्ये १६५ हून अधिक आऊटलेट्सपर्यंत विस्तार केला आहे.

२५० हून अधिक कुंभार कुटुंबांकडून मातीच्या कप तयार करतात…

या व्यवसायाची एक खास गोष्ट म्हणजे कंपनी २५० हून अधिक कुंभार कुटुंबांकडून मातीच्या कप (कुल्हाड) तयार करतात आणि त्यांना उत्पन्न देतात आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत करतात. या वर्षी कंपनीची उलाढाल १५० कोटींहून अधिक झाली आहे, जो अनुभवच्या टीमसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. एका छोट्या चहाच्या स्टॉलपासून ते प्रसिद्ध ब्रँडपर्यंतचा त्याचा प्रवास हा व्यवसायाच्या जगात आवड आणि चिकाटीने काय करता येते याचे उत्तम उदाहरण देतो आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of anubhav dubey the co founder of chai sutta bar brand he helps 250 potter families to make traditional kulhads asp