Success Story Of IAS Tushar Singla : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (सीएसई) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणून ओळखली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस, आयपीएस, आयएफएस किंवा आयआरएस अधिकारी होण्याचे स्वप्न मनात घेऊन या परीक्षा देतात. पण, केवळ काही जणच यशस्वी होतात. ही आव्हानात्मक परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये आयएएस अधिकारी तुषार सिंगला यांचासुद्धा समावेश आहे, ज्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी सीएसई उत्तीर्ण केली आहे. चला तर त्यांचा प्रवास जाणून घेऊयात…
तुषार सिंगला हा एक हुशार विद्यार्थी आहे, ज्याने आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. नंतर त्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्याने २०१३ मध्ये यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीत तुषारने त्याच्या यूपीएससी तयारीच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. त्याची तयारी टप्प्याटप्प्याने विभागली गेली होती. त्याने मे २०१३ मध्ये परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि नोव्हेंबर २०१३ पर्यंत चालू ठेवला. त्यानंतर त्याने ब्रेक घेतला आणि डिसेंबर २०१३ ते २५ जून २०१४ दरम्यान अभ्यास अजिबात केला नाही. त्याने २८ जून २०१४ रोजी पुन्हा तयारी सुरू केली आणि नोव्हेंबर २०१४ मध्ये होणाऱ्या परीक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. त्याच्या मते, शेवटचे पाच महिने त्याच्या तयारीचा सर्वात महत्त्वाचा काळ होता.
प्रीलिम्ससाठीची रणनीती (Success Story )
तुषारने दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक ८६ मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली. प्रीलिम्ससाठीची रणनीती सांगताना तो म्हणाला की, त्याने पेपर एकमध्ये ८५ आणि पेपर दोनमध्ये ७८ प्रश्नांची उत्तरं लिहिली. तुम्ही किती प्रश्न सोडवताय, यापेक्षा तुम्ही उत्तरे किती चांगली देता यावर यश अवलंबून असते. चुकीचे पर्याय काढून टाकून आणि स्मार्ट अंदाज वापरून त्याने अशा प्रश्नांचेदेखील उत्तर दिले, ज्याबद्दल त्याला पूर्णपणे खात्रीसुद्धा नव्हती.
तुषार त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीदेखील ओळखला जातो. तुषारचे लग्न २०१७ च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी नवजोत सिमीशी झाले आहे. हे जोडपे २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. तसेच तुषार यांनी उलुबेरियामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. अलीकडेच त्यांना कॅबिनेट सचिवालयांतर्गत बिहार विकास अभियानाचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून एक महत्त्वाची नवीन भूमिका देण्यात आली आहे. तर त्यांची गोष्ट देशभरातील अनेक यूपीएससी इच्छुकांना प्रेरणा देत आहे, एवढं तर नक्की…