Success Story: स्वतःचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतो. या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात. पण, असेदेखील काही लोक असतात; जे पुन्हा नवी सुरुवात करून आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. भारतात असे अनेक जण आहेत; ज्यांनी स्वबळावर मेहनत करून आपलं स्वप्न साकारलं आहे.

प्रयत्नांती परमेश्वर हा शब्द तुम्ही नेहमी ऐकलाच असेल. असं म्हणतात की, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास, तुम्ही परमेश्वरालादेखील भेटू शकता. मग तुम्ही कठोर परिश्रम करून स्वतःचं स्वप्न पूर्ण का नाही करू शकत? विकास डी. नाहर यांनीही त्यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. ते एक-दोन नव्हे, तर चक्क २० वेळा अपयशी ठरले होते. पण, आता ते तब्बल ५०० कोटींच्या कंपनीने मालक आहेत.

विकास डी. नाहर यांचा जन्म कर्नाटकातील शेतकरी कुटुंबात झाला होता आणि त्यांच्या कुटुंबात पारंपरिक पद्धतीनं कॉफी आणि काळी मिरीची शेती केली जायची. विकास यांना लहानपणापासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बंगळुरू विद्यापीठात संगणकाचा अभ्यास केला आणि २००५ मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी जैन ग्रुपमध्ये वरिष्ठ आयात व्यवस्थापक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. परंतु, काही काळानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये MBA मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

MBA पूर्ण केल्यानंतर ते सात्त्विक स्पेशालिटी फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक झाले. व्यवसाय कसा करावा, हा अनुभव मिळविण्यासाठी नहार यांनी या कंपनीत उत्तम काम केलं. नहार यांना या काळात अनेकदा अपयश आलं; पण त्यांनी कधीही आशा सोडली नाही.

हेही वाचा: UPSC Success Story: जिथे संघर्ष तिथे विजय! कष्टकरी बापाच्या मेहनतीचं केलं चीज; अवघ्या २४व्या वर्षी झाला अधिकारी

२० वेळा अपयश येऊनही मानली नाही हार

बरीच वर्षं विकास नाहर यांनी विविध उपक्रमांमध्ये प्रयत्न केले; पण त्यांना हवं तसं यश कधीच मिळालं नाही. जवळपास २० वेळा हाती अपयश लागूनही ते हार न मानता, सातत्याने अथक प्रयत्न करीत राहिले. अखेर २०१६ मध्ये त्यांनी ‘ड्रायफ्रूट्स अ‍ॅण्ड स्नॅक ब्रांड हॅपिलो’ ही स्वतःची कंपनी सुरू केली. ही कंपनी त्यांनी केवळ १० हजार रुपये आणि फक्त दोन कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे सुरू केली होती. त्यानंतर या कंपनीत त्यांनी ४० विविध प्रकारच्या सुक्या मेव्यांचा समावेश करून आपल्या उत्पादनांची श्रेणी वाढवली. तसेच, ६० प्रकारचे मसाले आणि १०० प्रकारची चॉकलेट प्रॉडक्ट्सचीही विक्री सुरू केली. १० हजार रुपयांमध्ये लावलेल्या व्यवसायाच्या या रोपट्याचा आता ५०० कोटींच्या मोठ्या कंपनीच्या रूपात मोठा वृक्ष झाला आहे. विकास डी. नाहर यांचा हा व्यावसायिक प्रवास नवीन व्यावसायिकांच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी आहे.