Success Story: आयुष्यात हवे तसे यश मिळवण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण थोड्या मिळालेल्या यशातही समाधानी होतात. पण, असेदेखील काही लोक असतात, संकटाला तोंड देऊन पुन्हा नवी सुरुवात करून आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. तसेच मिळालेल्या यशात आणखी जास्त यशस्वी कसे होता येईल याचा विचार करतात. भारतात असे अनेक जण आहेत, ज्यांनी स्वबळावर मेहनत करून आपलं स्वप्न साकारलं आहे.

पवन गुंटुपल्ली यांचा प्रवासदेखील अनेक अपयशांनी भरला होता. पण, त्यातूनही ते न हारता पुढे आले आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. त्यांना त्यांच्या आयुष्यात एक दोनदा नव्हे तर तब्बल ७५ वेळा रिजेक्ट करण्यात आले होते. मात्र, त्यातूनही ते मेहनतीच्या जोरावर यशस्वी झाले आणि आता ते तब्बल ६७०० कोटींचे मालक आहेत.

पवन गुंटुपल्ली मूळचे तेलंगणामधील आहेत, त्यांचे लहानपणापासूनच कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये काम करण्याचे स्वप्न होते. अगदी लहानपणापासूनच त्यांनी याचा सराव केला होता. त्यांना आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथे त्यांनी कॉम्प्युटर विषयामध्ये उत्तम यश मिळवले. त्यांच्या पदवीनंतर त्यांनी सॅमसंग कंपनीमध्ये काम केले, जिथे त्यांना व्यवसायाचा अनुभव मिळाला. मात्र, नंतर त्यांनी त्यांचा मित्र अरविंद सांका यांच्यासोबत ‘द कॅरियर’ नावाचा व्यवसाय सुरू केला. या स्टार्टअपचा काही अनुभव घेऊन पवन यांनी २०१४ मध्ये रॅपिडो ही बाइक टॅक्सी सेवा सुरू केली.

पण, रॅपिडोच्या कल्पनेने एकही गुंतवणूकदार प्रभावित झाले नाही आणि त्यांना तब्बल ७५ गुंतवणूकदारांकडून नकार मिळाला. यामागचे कारण म्हणजे उबेर आणि ओला यांसारख्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांच्या बाजारपेठेमुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास नकार देत होते. यावेळी पवन यांनी तीन रुपये प्रति किलोमीटर शुल्कासह मूळ भाडे १५ रुपये ठेवले, पण सुरुवातीच्या वर्षांत रॅपिडोने मोठी प्रगती केली नाही. मात्र, तरीही पवन यांनी माघार न घेता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली.

हेही वाचा: Success Story: केवळ १० हजारातून केली सुरुवात, २० वेळा अपयश अन् आज ५०० कोटींचा मालक; जाणून घ्या विकास नाहर यांचा प्रवास

पुढे दोन वर्षांनंतर २०१६ मध्ये Hero MotoCorp चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांनी रॅपिडोमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पवन गुंटुपल्ली यांनी यशाचा पहिला टप्पा पार केला. पवन मुंजाल यांनी गुंतवणूक केल्याने रॅपिडोने केवळ ग्राहकांचाच नव्हे तर गुंतवणूकदारांचाही विश्वास संपादन केला. कंपनीचा १०० हून अधिक शहरांमध्ये यशस्वीपणे विस्तार झाला. रॅपिडो हा बाईक चालवण्यावर आधारित व्यवसाय असल्याने, त्याला डोंगराळ प्रदेशात अधिक लोकप्रियता आणि यशही मिळाले. सध्या रॅपिडोचे सात लाखांहून अधिक वापरकर्ते आणि ५०,००० कॅप्टन/राइडर्स आहेत. सध्या रॅपिडो कंपनीची एकूण किंमत सध्या ६७०० कोटींपेक्षा जास्त आहे.