Success Story: आजकाल प्रत्येक क्षेत्रात खूप स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेच्या जगात स्वतःला सिद्ध करायच्या नादात लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. एकाच जागी तासन् तास बसून राहणे, अयोग्य आहार, अपूर्ण झोप यांमुळे आरोग्य खराब होते. हैदराबादच्या वेदा आणि सुधा गोगिनेनी या दोन बहिणींना ही वाढती समस्या लक्षात आली. त्या दोघीही अशाच समस्येतून जात होत्या. त्यामुळे त्यांनी उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी ‘अर्थफुल’ या नावाचे एक आरोग्य स्टार्टअप सुरू केले. हे स्टार्टअप हर्बल पौष्टिक उत्पादने बनवते. या दोघींना शार्क टँक इंडियाकडून लाखो रुपयांचा निधीही मिळाला आहे.

वेदा गोगिनेनी यांनी आयआयटी खरगपूरमधून बायो टेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. चांगल्या पगाराची नोकरी करीत असताना या काळात तिने तिच्या वाईट जीवनशैलीकडे लक्ष दिले नाही. परिणामी तिची तब्येत बिघडू लागली. कामाचा उत्साह कमी झाला. प्रत्येक कप कॉफीनंतर तिला अ‍ॅसिडिटी होऊ लागली. ती योगासनं करायची; पण त्यावेळीही तिच्या गुडघ्यांमध्ये वेदना होत होत्या. केस गळत होते, त्वचेच्या समस्या निर्माण होत होत्या. पाठीत वेदना होत होत्या. नीट झोप येत नव्हती. तपासणी केल्यानंतर शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याचे आढळून आले. मग तिला जाणवले की, एकाच ठिकाणी बसल्याने किती नुकसान होते. तिची मोठी बहीण सुधादेखील अशाच समस्यांना तोंड देत होती. तिने केमिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

२०२० मध्ये सुरू केले स्टार्टअप

त्यांचे स्वतःचे आरोग्यासंबंधीचे अनुभव आणि त्यांच्या शिक्षणातून मिळालेले धडे एकत्रित करून, त्या दोघी बहिणींना आयुष्यभर टिकेल असा उपाय निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. एकंदरीत अशा प्रकारे ‘अर्थफुल’ स्टार्टअपची सुरुवात झाली. वेदा आणि तिची मोठी बहीण सुधा यांनी मिळून आरोग्य आणि पोषणाशी संबंधित उत्पादने बनविण्याचा विचार केला. दोन्ही बहिणींची तब्येत बिघडत चालली होती. दोघींचीही बायो टेक्नॉलॉजी आणि केमिकल इंजिनियरिंगची पार्श्वभूमी आहे. त्यांनी आपले ज्ञान आणि अनुभव एकत्रित करून, आधुनिक आरोग्य समस्यांवर नैसर्गिक उपायांवर आधारित उत्पादने तयार केली. २०२० मध्ये त्यांनी ‘अर्थफुल’ लाँच केले. ही कंपनी स्वच्छता आणि वनस्पती यांवर आधारित पौष्टिक उत्पादने तयार करते.

वेदा आणि सुधा यांनी त्यांच्या विज्ञानाच्या ज्ञानाचा वापर करून मल्टीव्हिटॅमिन आणि हर्बल संयोजन तयार केले. त्यामध्ये पेरूची पाने, कढीपत्ता आणि बरेच काही समाविष्ट आहे. त्याच्या स्टार्टअपची टियर-१ व टियर-२ शहरांमध्ये झपाट्याने वाढ झाली. यश मिळाल्यानंतर, त्याला शार्क टँक इंडिया सीझन ४ मध्ये ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याकडून ७५ लाख रुपयांची गुंतवणूक मिळाली. कंपनीचा सध्याचा वार्षिक महसूल दर १५ कोटी रुपये आहे.

मोठ्या पगाराची नोकरी सोडून पत्करला धोका

दोन्ही बहिणींनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आणि परदेशात काम करण्याच्या संधीही सोडल्या. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा धोका पत्करला. ‘अर्थफुल’चे उद्दिष्ट लोकांना नैसर्गिक आणि निरोगी उत्पादने प्रदान करणे आहे; जेणेकरून ते निरोगी जीवन जगू शकतील. ‘अर्थफुल’चे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीची उत्पादने नैसर्गिक घटकांपासून बनवली जातात.