किरण सबनीस 
बऱ्याच नव-तरुणांना ( GenZ) काही अपरंपरागत कार्यक्षेत्र शोधून काढायची आहेत, त्यामध्ये काम करायचे आहे, स्वत:च्या कल्पनांवर आधारित नवीन उद्याोग, स्टार्ट-अप सुरू करायचे आहेत. अर्थात कोणतीही नवीन संकल्पना, विचार, प्रक्रिया, समस्या संशोधन आणि त्यावरील उपाय याचा गाभा हा सर्जनशीलता ( Creativity) असतो. त्यामुळेच सर्जनशीलतेवर आधारित ‘क्रिएटिव डिझाईन करिअर’ ही आजच्या GenZ विद्यार्थ्यांची व जगाची महत्त्वाची गरज बनली आहे.

रोजच्या आयुष्यातील डिझाईनचे वाढणारे महत्त्व…

आजच्या काळात ‘डिझाईन’ हा जरी एक परवलीचा शब्द झाला असला व त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यात सर्वत्र दिसत असला तरी त्याची सखोल माहिती खूप कमी विद्यार्थ्यांना असते. पुढील उदाहरणांवरून आपण बदलणाऱ्या ‘डिझाईन’ क्षेत्राची आणखी ओळख थोडक्यात करून घेऊया. आपल्या रोजच्या जीवनातील कामे ( Activities) किंवा काही सेवा ( Services) कशाप्रकारे वापरतो आणि त्यांच्यावर ‘डिझाईन’ क्षेत्राचा परिणाम कसा होतो हे पाहूया. उदा. १. ‘दात घासणे’ ही क्रिया करताना आपण घरातील बेसिन जवळच्या कपाटातून दात घासायचा ब्रश हातामध्ये घेऊन त्यावर योग्य प्रमाणात पेस्ट लावतो, नंतर बेसिनचा नळ चालू करून आरशामध्ये पहात दात घासणे पूर्ण करून आपले तोंड नॅपकिन/ टॉवेल पुसून ही क्रिया संपवतो. उदा. २ – आपल्याला एखाद्या चित्रपटाचे तिकीट काढायचे असेल तर आपण मोबाइलचा वापर करून त्यातील योग्य अॅप किंवा संकेतस्थळावर जाऊन हवे ते चित्रपटगृह, वेळ, रांग, जागा निवडतो. त्याचे ऑनलाइन पैसे पाठवून देतो. त्वरित आपल्याला एक मेसेजही येतो व तिकीट तपशीलासह पावती पण मिळते, आपण चित्रपटगृहमध्ये गेल्यावर ते मोबाइलवरील तिकीट स्कॅन केले जाते व आपण चित्रपटाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. पहिल्या उदहरणामध्ये वापरेली प्रत्येक वस्तू – ब्रश, पेस्ट, बेसिन, नळ, नॅपकिन इत्यादी – डिझाईन करताना ‘डिझाईनर’ने सर्व वापरकर्त्यांच्या गरजा, अपेक्षा, क्षमता, आवडी निवडी या विचारात घेतलेल्या असतात. आपल्याला साध्या वाटणाऱ्या नेहमीच्या वापरातल्या दात घासायच्या ब्रशचे डिझाईन करणे वाटते तेवढे सोप्पे नसते, त्यासाठी अनेक बारिकसारिक बाबींचा सखोल विचार डिझाईनर करत असतो. उदा. हाताच्या पंजाचा आकार, बोटांची व स्नायूंची रचना, दातांची रचना, ब्रशचा आकार, हँडलची लंबी रुंदी, रंग संगती, त्याचे पॅकेजिंग, मार्केटिंग व ब्रँड, ग्राफिक्स. त्याचप्रमाणे दुसऱ्या उदहरणामधील ‘ऑनलाइन तिकीट काढणे’ ही सेवा अनुभव डिझाईन ( Service Experience Design) करताना डिझाईनर वापरकर्त्यांची गरज, सभोवतालचा संदर्भ, कार्यपद्धती, मानसिकता, बदलत्या तंत्रज्ञान विषयी माहिती, आवडी निवडी हे प्रामुख्याने विचारात घेतो. ही सर्व डिझाईन प्रकिया ‘वापरकर्त्याना केंद्रस्थानी’ ( User Centric Approach) ठेऊन केलेली असते आणि त्यामुळे काहीप्रमाणात त्यामध्ये विषयनिष्ठता असते.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Understanding the scope and depth of creative design and how to pursue a career in it amy
First published on: 05-04-2024 at 08:32 IST