सत्यजीत भटकळ
आज आईला ८१ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक आजार असूनही आजही नवनवीन गोष्टी शिकण्याचा तिचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न जणू तिच्या आयुष्याचा मूलमंत्र तर वयाची सत्तरी झाल्यानंतर बाबाने चक्क डॉक्टरेट पूर्ण केली. चार नवीन पुस्तके लिहिली. आज वयाच्या ८४ व्या वर्षी गांधी आणि शास्त्रीय संगीत अशा दोन विषयांत तो जागतिक पातळीवर अभ्यासक म्हणून मानला जातो. पंचाहत्तरी झाल्यानंतर त्याने त्याचे पहिले नाटक लिहिले. अजूनही अनेक नवीन कल्पना आणि ऊर्जा घेऊन तो रोज उठतो आणि काम करतो. दोघेही साधक आहेत..’’ सांगताहेत सत्यजीत भटकळ बाबा रामदास आणि आई लैला भटकळ यांच्याविषयी..
तसं पाहिलं तर पुस्तकप्रेमी विश्वात भटकळ हे आडनाव बऱ्यापैकी ओळखलं जातं. या वर्तुळात माझं आडनाव ऐकल्यावर, ‘तू रामदास भटकळ यांचा कोण?’ असं आवर्जून विचारलं जायचं. रामदास भटकळ, म्हणजेच माझा बाबा, याने माझ्यावर आणि माझा मोठा भाऊ हर्ष यावर खूप महत्त्वाचे संस्कार केले. त्याबद्दल मी सांगेनच. पण त्याअगोदर मला सांगावंसं वाटतं ते माझ्या आईबद्दल.
अगदी जन्मापासून माझी आई जगावेगळी असावी. कारण तिच्या आई-वडिलांनी तिचं नाव काय ठेवावं, तर लला! म्हणजे लीला नाही, लीना नाही तर चक्क लला! हे मराठी नाव तर नव्हतंच पण त्याचा संदर्भ माझ्या आजी-आजोबांना बहुधा नसावा. आजी-आजोबा तसे पारंपरिक विचारसरणीचे होते. आजोबा शिवानंद पालेकर हे सरकारी सेवेत होते. जिल्हा न्यायाधीश आणि कायदा सचिव अशी पदे त्यांनी भूषवली. लला हे नाव एरवी मजनूच्या संदर्भात घेतले जाते हे कळले असते तर त्यांना धक्काच बसला असता. सुदैवाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसावी असा माझा समज आहे.
आईने अगदी बालपणापासून तिचं वेगळेपण दाखवलं. ज्या काळात मुलींना खेळण्याची फारशी मुभा नव्हती, त्या १९४०-५० च्या दशकात आई टेबल-टेनिस, बॅडिमटन सारखे खेळ आणि होय चक्क स्विमिंगसुद्धा चांगलीच शिकली. खेळातून तिला भरपूर हिंमत मिळाली असावी कारण वयाच्या अठराव्या वर्षी (काहीसा कौटुंबिक विरोध असूनही) तिने माझे वडील रामदास भटकळ याच्याशी प्रेमविवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अर्थात, मी लहान असताना मला हे सगळं माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. बालपणात आई ही आम्हाला जगातली बेस्ट आई वाटत असे, तरी सर्वसाधारणपणे ती इतर आईप्रमाणेच होती. म्हणजे, लाड, प्रेम, संस्कार, शिस्त, प्रार्थना या सर्व गोष्टी भरभरून होत्या. एक विशेष गोष्ट होती, की हॉकी, बॅडिमटन, टेबल टेनिसपासून सर्व खेळ आम्हाला बाबाने नव्हे तर आईने शिकवले. मला पाण्याची खूप भीती होती तेव्हा आईने समोर उभं राहून, ‘मी आहे, तू पोह बघू’ असे सांगून माझी पोहोण्याची भीती दूर केली. सोसायटीमध्ये गणपतीच्या वेळेस जेव्हा स्पर्धा व्हायच्या तेव्हा आई अगदी पन्नाशी गाठेपर्यंत टेबल टेनिसमध्ये सोसायटीची चॅम्पियन होती. तरुण मुलींना ती सहज हरवायची.
आईने आश्चर्याचा धक्का दिला तो मी सातवीत असताना. ती म्हणाली, ‘मी पुन्हा महाविद्यालयात जाणार आहे.’ तसं पाहिलं तर आईने लग्नानंतर संस्कृत आणि समाजशास्त्र या विषयांत पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. परंतु या दोन्ही विषयांत तिला फारसा रस नव्हता. तिला खरा रस होता तो शिक्षणात, तेही अशा मुलांच्या शिक्षणात, ज्यांना निसर्गत:च काही अडचण होती. सुरुवातीला आई शिवडीच्या ‘जय वकील’ शाळेत आणि मग १९७५ पासून ‘एस.पी.जे. साधना स्कूल’मध्ये मंदबुद्धी मुलांना शिकवू लागली होती. काम खूप कठीण होते पण तिला त्यात प्रचंड आनंद मिळायचा. आम्हालाही या कामाबाबत खूप अभिमान होता. तेव्हा साधना शाळेत काही वर्ष गेल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर रुक्मिणी कृष्णस्वामी यांनी आईला सुचवलं, की तिच्या या प्रॅक्टिकल अनुभवाला थेअरीची साथ असावी. नेमकं याच वेळेला ‘एसएनडीटी युनिव्हर्सटिी’तर्फे ‘बी.एड्. इन स्पेशल एजुकेशन’ हा कोर्स सुरू झाला होता आणि आई पहिल्याच बॅचमध्ये चक्क पुन्हा महाविद्यालयात गेली. म्हणजे ज्या वयात माझा भाऊ महाविद्यालयात जाण्याची तयारी करत होता त्याच वेळेला आई पुन्हा महाविद्यालयात!
त्या वेळेला आम्हा भावंडांना या गोष्टीचं फारसं कौतुक नसावं. आम्ही मुलं. आमचं विश्व हे स्वार्थी, आत्मकेंद्रित होतं. तेव्हा घरी आल्यावर आई नाही. चावीने दरवाजा उघडून संध्याकाळचा नाश्ता स्वत:च्या हाताने वाढून घेऊन खायचा हे फारसं आवडलं नसतं तर नवल. आईने बी.एड्. पूर्ण केल्यावर एक मोठा निर्णय घेतला. डॉक्टर कृष्णस्वामी यांनी तिला सांगितलं की डिसलेक्सिक मुलांसाठी काहीच व्यवस्था नाही. डिसलेक्सिक मुलं म्हणजे अशी मुलं, जी मंदबुद्धी नाहीत, परंतु नैसर्गिक कारणास्तव त्यांना लिहिण्या-वाचण्यात खूप त्रास होतो. या गोष्टीचा अर्थात त्यांच्या शिक्षणावर प्रचंड परिणाम होतो. ‘तारे जमीन पर’ चित्रपटातला इशान अवस्थी हे डिसलेक्सियाचे उत्तम उदाहरण.
मात्र ते वर्ष होते १९८१. डिसलेक्सियाबद्दल कोणालाच फारशी जाण नव्हती. अशा वेळेस आई, माझी मावशी रजनी वाघ आणि त्यांची मत्रीण प्रभा आपटे यांनी एकत्र मिळून ‘सॅपलिंग’ (स्कूल फॉर अॅप्रोप्रिएट लìनग) ही शाळा सुरू केली. सुरुवातीला ही शाळा माझ्या मावशीच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये चाले. मात्र अशा शाळेची प्रचंड गरज होती आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली तेव्हा फ्लॅट लहान पडला आणि ‘सॅपलिंग’चे वास्तव्य हे ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या बांद्रा पूर्व शाखेत अनेक वर्षे होते. आजही ती शाळा ‘लिटल एंजल्स’ या शाळेचा भाग म्हणून चालू आहे. पंचवीस वर्षे आईने शाळेची मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. तिच्या हाताखाली शेकडो विद्यार्थी शिकले. ही अशी मुले होती, की ज्यांपैकी अनेकांना इतर शाळेचे दरवाजे बंद झाले होते. त्या काळात या मुलांबद्दल संवेदनशीलपणा तर दूरच साधी माहिती नव्हती. ही मुलेच आळशी आहेत किंवा त्यांचे संस्कार वाईट आहेत किंवा ही मुले खूप खोडकर आहेत, असे अनेक प्रकारचे गैरसमज त्यांच्याबद्दल होते. अशा वातावरणात डिसलेक्सियाबद्दल माहिती देत, लोकांचे गैरसमज दूर करत, या मुलांना हक्काची शाळा मिळाली. शिक्षकांचे प्रेम आणि मार्गदर्शन मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना आत्मविश्वास मिळाला. अनेकांना चांगल्या नोकऱ्या लागल्या. अनेकांचे संसार व्यवस्थित उभे राहिले व आजही चालू आहेत.
या सर्व प्रवासात आई त्यांच्यासोबत दिवस-रात्र असायची. म्हणजे फक्त शाळा चालू होती तेव्हा नव्हे, तर शाळेची वेळ संपल्यावर घरी येऊनही ती तासनतास त्या मुलांचे आणि विशेष करून त्या मुलांच्या पालकांचे मार्गदर्शन करत असे. २०१३ मध्ये आईला ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी तिच्या या कार्यावर एक छोटा माहितीपट बनवला. त्या वेळेस मी अनेक माजी विद्यार्थी-पालकांच्या मुलाखती घेतल्या. सर्वजण ज्या प्रेमाने व आदराने तिच्याबद्दल बोलले त्यातून मला पुन्हा लक्षात आले, की आईचे काम किती कठीण होते व किती मोठे आहे.
एक गोष्ट यात खास लक्षात घेण्यासारखी आहे. ‘तारे जमीं पर’मध्ये राम शंकर निकुंभ (आमिर खान) हा शिक्षक म्हणून लाभल्यानंतर ईशान (दर्शिल सफारी)हा चार-सहा महिन्यांत इतर मुलांसारखंच लिहू-वाचू शकतो. परंतु डिसलेक्सिक मुलांबाबत सहसा असं घडत नाही. आयुष्यभर त्यांना या अडचणींशी सामना करावा लागतो. तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती अतिशय संथ गतीने चालू असताना आपले मनोबल कायम राखण्यासाठी प्रचंड विश्वास, संयम आणि सातत्य लागते. स्वत:वर, त्या विद्यार्थ्यांवर आणि बदल घडण्याच्या प्रक्रियेवर विश्वास लागतो. हा विश्वास आईच्या फक्त शैक्षणिक कामापुरता मर्यादित नव्हता. तिला खूप आतून वाटे की, प्रयत्नाने सर्व काही घडू शकते. प्रत्येक व्यक्ती स्वत:ला आपल्या प्रयत्नातून बदलू शकते, घडवू शकते. प्रयत्न, साधना यातून फक्त व्यक्ती नव्हे, तर समाजही बदलू शकतो यावर तिने आयुष्यभर विश्वास केला. तो विश्वास तिने आम्हा मुलांनाही दिला. आज आईला ८१ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक आजार असूनही आजही नवनवीन गोष्टी शिकण्याचा तिचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न जणू तिच्या आयुष्याचा मूलमंत्र.
बाबा, ‘पॉप्युलर प्रकाशन’चे रामदास भटकळ म्हणून अनेकांच्या परिचयाचे असतील. ‘जिग्सॉ’, ‘मोहनमाया’, ‘जगदंबा’, ‘जिव्हाळा’ या पुस्तकांचे लेखक म्हणूनही अनेक वाचक त्यांना ओळखत असतील. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे अत्यंत अभ्यासू गायक म्हणूनही काहींना त्यांची ओळख असेल. तेव्हा या परिचयाच्या गोष्टी सोडून मी इथे बोलणार आहे ते रामदास भटकळ, एक वडील म्हणून!
पहिली गोष्ट म्हणजे, बाबा आमचा आधी मित्र होता मग वडील. बाबाला नेहमी वाटत असे की आम्ही मुले आईशी ‘तू’कारात बोलतो तर मग त्याच्याशी सावत्र वागणूक का? अगदी भांडून त्याने ‘तू बाबा’ असे आमच्या जिभेवर संस्कार घातले. म्हणून आम्ही दोघा भावंडांनी त्याला तुम्ही असे कधीच संबोधले नाही. या गोष्टीचा इतरांना कसा त्रास झाला असावा (काय उद्धट पोरे हो तुमची!) हा विचार तुम्ही करू शकता. हीच गोष्ट पुढच्या पिढीत येऊन माझी मुलगी नयनतारासुद्धा अनेक वेळेला मला ‘सत्या’ या मित्रत्वाच्या नावाने हाक मारते.
तर, बाबा आमचा मित्र होता. आम्ही एकत्र खेळलो, बुद्धिबळ, पत्ते, क्रिकेट आणि टेबल टेनिससुद्धा. त्याला खेळ फारसे जमत नसले तरी तो आनंदाने खेळला. हरल्याचे फारसे वाईट वाटून घेतले नाही. आम्ही एकत्र चित्रपट पाहिले, नाटके पाहिली, अनेक विषयांबद्दल बोललो. अगदी स्वातीबद्दल(महाविद्यालयातली मत्रीण, आता पत्नी)सुद्धा मी त्याला प्रथम सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकारणापासून ते जगातील प्रत्येक विषयाबद्दल आम्ही वाद घातला. तो वादही इतका भयंकर असायचा, (माझ्या आगाऊपणामुळेच) की कोणाला वाटावे, भांडण चालू आहे. यात विशेष गोष्ट ही, की कधीही बाबाने असे म्हटले नाही की ‘तुला काय कळते’, किंवा ‘मी एवढी वर्षे काढली आणि तू मला शिकवतो.’ इत्यादी. त्याला कितीही त्रास झाला तरी त्याने आदरपूर्वक माझे म्हणणे ऐकून घेतले. प्रत्येक व्यक्तीला लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य आहे हे फक्त त्यांनी म्हटले नाही तर तो चक्क जगला.
लोकशाही पद्धत हा आमच्या घराचा अविभाज्य भाग होता. सर्व महत्त्वाच्या निर्णयांत आम्हा दोघा भावंडांना अगदी लहान वयापासून सामील करण्यात आले. त्यामुळे कुटुंबात ज्येष्ठ-कनिष्ट नव्हे तर अगदी ‘टीम स्पिरिट’ची भावना होती. बाबाला प्रत्येक विषयात रस आहे. जगात असा कोणता विषय नाही जो त्याच्यासाठी वर्ज्य आहे. नाटक-चित्रपट, राजकारण, साहित्य, क्रिकेटपासून ते कोणत्या गल्लीत सर्वात चांगली मिसळ मिळेल, या सर्व बाबतीत त्याला रस होता. याचे प्रतिबिंब अर्थात त्याच्या प्रकाशनात दिसते. वैद्यकीय पुस्तकांपासून ते पाककलेची पुस्तके आणि रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकरांपासून ते विंदा करंदीकर असा विषयांचा आणि साहित्यप्रकारांचा त्याचा दृष्टिक्षेप होता. खूप कमी असे प्रकाशक असतील ज्यांनी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांत इतक्या विविध विषयांवर प्रकाशन केले आहे.
परंतु बाबाने हे जाणीवपूर्वक कधीच केले नाही. तसा व्यवहारीपणा त्याला कधीच जमला नाही. जीवनाच्या प्रत्येक अंगाचा तो आनंद घेत गेला आणि त्यानिमित्ताने लेखक जोडत गेला. त्याचे एक ब्रीदवाक्य होते, ‘ऑल प्ले इज वर्क अॅण्ड ऑल वर्क इज प्ले’ (म्हणजेच, सर्व काम हा खेळाचा म्हणजे आनंदाचाच भाग आहे. आणि सर्व आनंद हा कामाचा भाग आहे.) तेव्हा काम म्हणजेच आनंद, अन्यथ: ते आपण करू नये हे त्याने स्वत:साठी ठरवले व ती शिकवण आम्हा मुलांनाही दिली.
बाबात व्यवहारी वृत्तीचा (चांगल्या अर्थाने) अभाव होता असे म्हणायला हरकत नाही. ‘पॉप्युलर प्रकाशन’ या कंपनीत एकेकाळी जवळजवळ शंभर लोक कामाला होते. तीन शहरांत कार्यालये होती. तरी पशांच्या बाबतीत त्याची सतत तारेवरची कसरत होत असे. महिनोन् महिने त्याला कंपनीतून साधा पगार मिळत नसे. याचा त्रास आईने शांतपणे सहन केला. आज कोणाला सहज विश्वास बसणार नाही, पण भारतात टीव्ही येऊन अनेक वर्षे गेल्यानंतरही बाबा टीव्ही विकत घेऊ शकला नाही. शाळेत आणि कॉलनीत प्रत्येक मुलांच्या घरी टीव्ही आला, पण आपल्याकडेच नाहीये याचा मला थोडाफार कमीपणा वाटायचा. थोडे वैतागून, हर्ष आणि मला मिळालेली बक्षिसे, गल्ल्यात जमा केलेले पैसे, लहान-सहान कामे करून कमावलेले पैसे, सर्व एकत्र करून आम्हीच घरासाठी टीव्ही विकत घेतला. आम्हाला याची थोडीफार लाज वाटत होती. परंतु आई आणि बाबा यांना याचा प्रचंड अभिमान होता. आज अर्थात आम्हालाही आहे.
बाबाने व्यवहाराचा ताण फारसा मनावर घेतला नाही. त्याच्यासाठी प्रकाशन हा व्यवसाय नव्हता. माणसांचा, साहित्याचा, जीवनाचा आनंद घेण्याचा तो एक मार्ग होता. प्रकाशन, लेखन, संगीत, वाचन अशा अनेक गोष्टी करणे बाबाला जमले त्याचे मुख्य कारण हे, की तो शांत चित्ताचा जरी वाटत असला तरी अतिशय कामसू होता. अगदी सकाळी उठल्यापासून तो जो कामाला लागत असे, ते झोपेपर्यंत काही न काही त्याचं चालूच असायचे. मला अजून आठवते, की आम्ही चित्रपट पाहायला जायचो तर वाटेत कुठे न कुठे तो काम काढत असे. आम्ही सुट्टीला बाहेर पडलो तर अगदी ट्रेन निघेपर्यंत प्रुफे तपासण्याचे काम चालूच असे. बाबाने जर म्हटले, की वाटेत एखाद्या लेखकाला भेटायचे आहे तेव्हा आम्हाला ठाऊक असायचे, की ही वाट आडवाटेचीच असणार आणि हे दोन मिनिटांचे काम काही तास घेईलच! या गोष्टींचा लहानपणी खूप वैताग यायचा. ‘काय तंगडय़ात तंगडय़ा घालत असतो आपला बाबा’ असे वाटायचे. पण आज मात्र याचे खूप कौतुक वाटते.
वयाची सत्तरी झाल्यानंतर बाबाने चक्क डॉक्टरेट पूर्ण केली. चार नवीन पुस्तके लिहिली. आज गांधी आणि शास्त्रीय संगीत अशा दोन विषयांत तो जागतिक पातळीवर अभ्यासक म्हणून मानला जातो. पंचाहत्तरी झाल्यानंतर त्याने त्याचे पहिले नाटक लिहिले. अजूनही अनेक नवीन कल्पना आणि ऊर्जा घेऊन तो रोज उठतो आणि काम करतो.
या अर्थाने आई आणि बाबा हे दोघेही साधक आहेत. काम, प्रयत्न, साधना यावर विश्वास ठेवून त्यांनी जीवनाचा मार्ग शोधला.
vinayakhadpekar@gmail.com
chaturang@expressindia.com