|| जयश्री हरी जोशी
मराठीनं, माझ्या मातृभाषेनं माझं भावविश्व समृद्ध केलं. या संस्कृतीत माझी पाळंमुळं बहरली, वैचारिक आणि सैद्धांतिक संकल्पनांची पायाभरणी झाली. इतर अनेक भाषांकडे पाहायची सजगता मराठीनं रुजवली. मी तिचे ऋण अंशत: फेडू पाहते आहे ते संस्कृत, हिन्दी, आंग्ल आणि जर्मन अशा विविध भाषांतील साहित्याच्या भाषांतरातून.
नवीन भाषा वाचत जाताना आपल्यासमोर तिची सांस्कृतिक घडण आणि ताणेबाणे उलगडत जातात, तिचं स्पंद पावणं स्वत: समजून घेऊन, आपलंसं करून, ते सुगम करून स्वभाषेत वाचकाला सांगायचं असतं. मी या दुसऱ्या भाषेला परकीय भाषा म्हणू शकत नाही. कारण ती भाषा कशी फुलते, कुठली वळणं घेत जाते, कुठे ओघवती होते हे आत्मसात करून तिला आपलीशी केल्याशिवाय आपल्या भाषेत ती प्रतिबिंबित करता येत नाही. आज मी बोलते आहे ते जर्मन भाषेतून थेट मराठीत अनुसर्जित केलेल्या कवितांबद्दल. आपण कविता वाचतो, अनु-भवतो, त्या अनुभवाशी स्वत:ला जोडून घेतो, कवितेचं भाषांतर हे भाष्यांतर असतं, अनु-वाद, अनुकृती, अनुसर्जन आणि पुनर्सर्जन अशा विविध पातळय़ांवरचा अंतर्वक्र भिंगासारखा सोहळा- मूळ कवितेपासून अपसृत होणाऱ्या या अर्थशलाका एकत्रित करून, त्याचं नाभीय अंतर मापून घेताना इथे दोन भाषांमधलं अंतर संपवायचं असतं ते एक आंतरिक दुवा सांधून. कवितेचं भाषांतर म्हणजे अभ्यंतरचारी रूपांतर. अर्थानिर्णयनाच्या सर्व स्तरांवर- शब्द, ताल, छंद, प्रतिमासृष्टी, ध्वनी आणि कवितेच्या परंपरेतील सर्व संदर्भ या रूपांतराच्या प्रक्रियेत सह-कार्यान्वित व्हायला लागतात.
‘ग्यो २थे इन्स्टिटय़ूट माक्स म्युलर भवन- मुंबई’नं २०१५ मध्ये सुरू केलेल्या प्रकल्पात २१ जर्मन आणि दक्षिण आशियाई भाषांतील ६७ कवी एकत्र आणले आणि साकवसंवादक भाषांतरकारांच्या मदतीनं सुमारे ४०० भाषांतरं तयार झाली. याच कार्यक्रमातून स्फूर्ति घेऊन ‘साक्षीभावाने बघताना’ हा अनुसर्जित काव्यसंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला. जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक कवितांचं अनुसर्जन अरुणा ढेरे आणि मी रसिकांसमोर मांडलं.
जर्मनभाषिक साहित्यक्षेत्रात उलरिकं द्रेस्नरच्या कवितेनं स्वत:चं एक अनन्यसाधारण स्थान निर्माण केलं आहे. या कवितेची प्रकृती फार वेगळी आहे. यात दुराग्रह, हट्ट, त्रागा, आक्रोश अथवा विद्रोह नाही. कवितेतील स्त्रीचं स्त्री असणं हे सह-ज आहे, त्या कवितेतलं स्त्रीत्वाचं स्पंदन ठळक, आत्मजाणिवेनं परिपक्व आणि तरीही संयत आहे. या प्रामाणिक कवितेत स्त्रीच्या शारीर अनुभवांचं सहजसुगम विश्लेषण आहे. जगाच्या पाठीवरचे अनुभव घेताना केलेली निव्वळ अवलोकितं आहेत, एक अलिप्त, सूक्ष्म निरीक्षण आहे आणि अचानक कलाटणी देणारं अनुस्यूत भाष्य आहे. ही कविता ध्वनीचं बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात, नवीन शब्दांचं सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे, तिच्या कवितेची मांडणी वैविध्यपूर्ण असते. कधी प्रत्येक ओळीतला एकच स्वर हेतुपूर्वक पुढच्या ओळींत खेळवत ठेवलेला असतो, काही अक्षरांची पुनरावृत्ती केलेली आढळते. व्याकरणाचे काही नियम अर्थहानी आणि रसभंग न करता वाकवले जातात, शिवाय कवितेचा आकृतिबंध, दृश्यरूप हे तिच्या कवितेचं विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता हा एक प्रकारचा क्रमपाठ आहे. ही कविता आहे बोट धरून बरोबर नेणारी, डोळे उघडून जगाकडे बघायला लावणारी आणि माणसांतली समीकरणं, त्यांच्या भावनांचे खेळ, लालसा आणि आशा-आकांक्षांचं ओझं हे जगाच्या पाठीवर सारखंच असतं हे दाखवून देणारी. अशी कविता मराठीत आणणं समकालीन अभिव्यक्ती आणि अभिरुचीच्या मूल्यसंवर्धनासाठी फार महत्त्वाचं वाटलं.
अनुसर्जनात या सर्व स्तरांवर कवितेला न्याय देणं सोपं नाहीच. अशा कवितेला सर्व पातळय़ांवर भिडून मराठीत आणण्यासाठी अरुणाताईंसारख्या सिद्धहस्त, विदग्ध कवयित्रीचा रुकार मिळाला हा मणिकांचन योग. या कवितेचं अनुसर्जन करताना माझी पहिली भूमिका साकव-संवादकाची होती. मूळ कवितेतली प्रत्येक ओळ शक्यतो शब्दश: भाषांतरित करायची, तिला व्याकरण आणि अर्थानुरूप न्याय द्यायचा, पण स्वत:चं अर्थनिर्णयन कवितेवर लादायचं नाही. हे तसं अवघडच. सर्वप्रथम आम्ही उलरिकंसमवेत कवितांची निवड केली. मग मी जर्मन भाषेत तिच्या कवितांविषयी आलेले समीक्षात्मक लेख वाचले, तिचं स्वत:चं कवितेबद्दलचं लेखन वाचलं. ही नांगरणी झाल्यावर कवितांना हात घातला. किमान आठ-नऊ वेळा कविता वाचून काढल्या, शब्दांचे संदर्भ शोधले, टिपणं तयार केली, स्वत:पुरतं प्राथमिक पातळीवरचं अर्थनिर्णयन करून मी आधी आंतरओळी-भाषांतर केलं, मग अरुणाताईंबरोबर बसून एकेक ओळ विंचरून काढली, कवितांच्या आशयाबद्दल चर्चा होऊ लागल्या, अर्थनिर्मितीचे विविध पर्याय शोधले जाऊ लागले, काही संदिग्ध, काही मुळीच आकलन न झालेल्या शब्द, ओळी, प्रतिमा याचं संकलन केलं गेलं. या प्रवासात कवितेचं बोट धरून चालताना कधी दमछाक झाली, कधी हताश व्हायला झालं, कधी एखाद्या वळणावर असं काही सापडलं, की स्तिमित व्हायला झालं, तर कधी पुनप्र्रत्ययाचा आनंद मिळाल्यानं हरखून गेल्यागत वाटलं. मग आमच्या चर्चा घडू लागल्या, उलरिकंच्या कवितेच्या शब्दशक्तीचे विविध पदर उलगडले जाऊ लागले,अनुसर्जन आणि पुनर्सर्जन यांच्या सीमारेषेवर आम्ही उभ्या ठाकलो. कधी एखादा शब्द हुलकावणी देत राहिला, तो अनेक दिवसांनंतर कुठे तरी सापडला, कधी एखादा वाक्प्रचार किंवा क्रियापद कवडसा पडल्यासारखं अचानक मनात डोकावलं. कधी बैठक जमली, कधी सूर लागता लागला नाही. म्हणजे, कुठल्याही इतर कलासाधनेइतकाच भाषांतर हा गंभीर कलाविष्कार आहे याची पुन्हा एकदा प्रचीती आली. या प्रक्रियेदरम्यान उलरिकंशी विविध माध्यमांतून, ध्वनिसंदेशाद्वारा, सातत्यानं संवाद चालू होताच. ३५ कवितांचं अनुसर्जन करायला दीड वर्ष लागलं. मग पहिला खर्डा तयार झाल्यावर एक आठवडा उलरिकंच्या समोर प्रत्यक्ष बसून आम्ही प्रत्येक कवितेचा साकल्यानं आढावा घेतला. २०१७ च्या हिवाळय़ात आम्ही तिघी कित्येक दिवस ‘माक्स म्युलर भवन, मुंबई’च्या ग्रंथालयात एका मेजाशी बसून कवितांना भिडलो. अखंड चर्चा केली, स्पष्टीकरणं दिली-शोधली, मग प्रश्नचिन्हांची उद्गारचिन्हं होऊ लागली आणि चक्रव्यूह सुटत गेले. कित्येक ठिकाणी मराठी आणि जर्मन भाषांमधील साम्यस्थळं पाहून विस्मयचकित व्हायला झालं. जर्मन कवितेतील चित्रदर्शी आणि शब्दसृष्टीतल्या प्रतिमा आणि भारतीय संस्कृती, नि परंपरेतील साधर्म्य पाहून उलरिकंला सानंदाश्चर्य वाटलं. जर्मन भाषेतील काही विशिष्ट संकल्पना मराठी भाषेच्या प्रतिमाजगतात सहजगत्या ओघवत्या शब्दात थेट मुठीत आल्या. प्रत्येक कवितेचं बीज कुठे, कसं रुजलं, तिची निर्मितीप्रक्रिया कशी होती आणि कवयित्रीला कोणता अर्थ अभिप्रेत होता, याचबरोबर तिची स्वत:ची वैचारिक बैठक, तिच्या वैयक्तिक आयुष्याची जडणघडण या गोष्टींची माहिती मिळत गेली आणि उलरिकंचं व्यक्तिमत्त्व आमच्यासमोर उलगडत गेलं. कवितेतून उमटलेलं तिचं प्रातिभ कौशल्य संवादातून अधोरेखित झालं. या आदानप्रदानातून उलरिकंची मनस्वी कविता या अनुसर्जनाला आंतरिक ऊर्जा प्रदान करून गेली.
jayharijoshi@gmail.com