आणखी काही वर्षांनी लग्न करणं, मूल जन्माला घालणं हे प्रश्न ‘जीवनमरणाचे’ उरणार नाहीयेत. आताच त्याला सुरुवात झालीय. ‘तरुण पिढी अशी का वागते? कुटुंब व्यवस्थेचं काय होणार?’ वगैरे प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि पचवणं अवघड आहे. मग मुलं लग्नाचा विषय पुढे ढकलतायत, हे बघून पालकांनी अस्वस्थ का व्हावं? उलट आपल्याला यात नेमका कशाचा त्रास होतोय? या प्रश्नाचं उत्तर शोधणं प्रवास सुसह्य करेल.

इरा-देवेशच्या लग्नाच्या निमित्तानं इराच्या आत्याला- रेवतीला तिची दूरची बहीण श्रद्धा बऱ्याच दिवसांनी भेटली. जेवणानंतर कोपऱ्यातल्या खुर्च्या धरून दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. रेवतीचा मुलगा अद्वैत परदेशात, त्यांची पत्नी तमिळ. तर श्रद्धाची लेक अनन्या अजून अविवाहित होती. स्टेजवर बसलेल्या इराकडे पाहून श्रद्धा म्हणाली, ‘‘इरा खूश दिसतेय. तुमच्या दोघांचीही मुलं बरी आज्ञाधारक! लग्नाला तयार झाली. माझी अनन्या २७ वर्षांची होऊनही ‘एवढ्यात लग्न नको’चा हेका सोडेना. रोज वाद होतात. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींकडेही हेच चाललंय. डोकं गरगरतं या मुलांची तऱ्हा पाहून.’’

हेही वाचा : पाळी सुरूच झाली नाही तर?

रेवती हसून म्हणाली, ‘‘माझी मुलं आज्ञाधारक?… अगं, आमच्याकडेही मतभेद होतेच. पण लग्नासाठी मुलांवर सक्ती थोडीच करणार? ‘लग्न करा’च्या आमच्या आग्रहाला मुलांचा थंड प्रतिसाद आम्हाला समजतच नव्हता. आमचा अद्वैत आणि ही इरा, दोघांच्याही वेळी घरून लग्नाचा तगादा लावल्यावर अनेक वाद, चर्चा झाल्या… तसं हळूहळू चित्र उलगडत गेलं. नजर बदलली आमची.’’
आता श्रद्धाला अद्वैत आणि इराच्या कहाण्या ऐकायच्या होत्या. रेवती सांगू लागली. ‘‘इरा साधी-सरळ. एका मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यांचं लग्न ठरल्यासारखंच होतं. नोकरी करत असली तरी ‘करिअरिस्ट’ नव्हती. पण नंतर अचानक त्यांचं ब्रेकअप झालं. त्या उत्साही, स्वप्नाळू मुलीचं शांतपण आम्हा घरच्यांना बघवेना. मग काळजीने आम्ही सगळेच ‘स्थळं बघ’ म्हणून तिच्या मागे लागायचो. ती तो विषय टाळायची, कधी चिडायची. एकदा मात्र तिनं शांतपणे सगळ्यांना एकत्र बसवलं आणि सांगितलं, की ‘आमची चार वर्षांची रिलेशनशिप अशी तुटल्यावर लगेच नव्यानं प्रेमात पडणं अवघड आहे. त्यात कुठून तरी आलेल्या स्थळाचा काय भरवसा? त्यामुळे आता मला थोडा वेळ हवाय. करिअरवर फोकस करायचंय मला. घरात हा एवढाच विषय असतो. मला घरात पाय ठेवताना रोज दडपण येतं. सर्वांनी ताणात राहण्यापेक्षा मी बदलीच मागून घेऊ का?’ ’’

‘‘इरानं अशी धमकी दिली?… म्हणजे यांचीच मनमानी!’’ श्रद्धाला काही हे झेपेना.
‘‘आम्हालाही आधी राग आला, पण ती प्रामाणिकपणे बोलत होती. पण तिच्या जागी उभं राहून विचार करून पाहिलं आणि जाणवलं, की आधीच ती स्वत:च्या ताणात आहे, त्यात कुटुंबीयांकडून व्यक्त होणाऱ्या अति काळजीमुळे, त्याच त्या संवादांमुळे तिला घरात राहाणं नकोसं होऊ शकतं… मग वाईट वाटलं. इराबद्दलच्या भाबड्या चिंतेच्या नादात, आम्हाला ती ब्रेकअपच्या अनुभवातून प्रगल्भ होईल, भावनिक, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होईल, या शक्यता दिसल्याच नव्हत्या. त्यानंतर घरातला लग्नाचा विषय थांबला. इरानं करिअरवर लक्ष दिलं. पुढे कालांतरानं तिला देवेश भेटला, त्यांचं जुळलं आणि आज लग्न झालं.’’ रेवती म्हणाली.

हेही वाचा : ‘शुभंकर’ रुग्णांचा आधार!

‘‘योग असतात खरे! पण माझी अनन्या अजूनही एकटी आहे. कसं होणार तिचं?’’ श्रद्धानं मूळचा मुद्दा काढला.
‘‘तुला त्रास नेमका कशाचा होतोय? अनन्या अजूनही एकटी असण्याचा, की तरीही ती खूश आहे याचा?’’ रेवतीनं अनपेक्षित प्रश्न विचारला.
श्रद्धाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह बघून रेवतीच म्हणाली, ‘‘हा प्रश्न मला माझ्या अद्वैतनं विचारला होता. माझ्या आग्रहापोटी तो काही मुलींना भेटला आणि नंतर म्हणाला, ‘आई, मी एकटा असूनही आनंदात राहतोय, याचा त्रास होतोय का तुला? तिशीनंतर आणि एवढ्या शिक्षण, नोकरीनंतरही मला लहानच समजून काळजी करते आहेस तू. मलाही कुणीतरी हवंय, पण मनं जुळायला हवीत. परदेशात खूपच वेगवेगळं शिकायला मिळतंय, अनुभव मिळतायत, ते मला सध्या जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा तीव्रतेनं जोडीदार हवासा वाटेल, तेव्हा सापडेलच ना कुणीतरी! लग्न करण्याच्या वयापेक्षा, लग्नानं आयुष्यात भर पडणं महत्त्वाचं आहे ना?…’ अद्वैतचं म्हणणं मला पटलं. वयाच्या तेहेतिसाव्या वर्षी तिथे त्याला विभा भेटली. सूर जुळल्यावर भाषा वेगळी असल्याचाही अडथळा वाटला नाही.’’
‘‘अनन्यालाही ट्रेकिंग, प्रवास, हजार गोष्टी करायच्या असतात. मलाही ‘चल’ म्हणते ती. पण शेवटी मुलांचं वेगळं, मुलींचं वेगळं…’’

‘‘काळ बदललाय गं. मुलांची आणि मुलींची स्वप्नं पूर्वीसारखी वेगवेगळी राहिली नाहीत आता. अद्वैत, इरा आणि अनन्याचंच बघ. तिघंही एकुलती, कौतुकात वाढली. सारख्याच संधी त्यांना मिळाल्या. आपापली आवड आणि व्यक्तिमत्त्वानुसार तिघं पुढे जातायत. केवळ सुशिक्षित शहरी मुलांचंच नव्हे, तर गावाकडेही काही प्रमाणात असंच आहे. ‘आयटी’तल्या मुलांना बुद्धीच्या जिवावर मोठ्या शहरांत किंवा परदेशी जायला सहज संधी आहेत. हे स्वातंत्र्य अनुभवल्यानंतर अनेक मुलांसाठी ‘लग्न’ पूर्वीसारखं महत्त्वाचं उरलंच नाहीये. पण गावातल्या मुलांना तेही घरी सांगता येत नाहीये…’’
‘‘असं कसं?’’ श्रद्धाला हे पटेना.

हेही वाचा : सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!

‘‘अद्वैतशी बोलल्यानंतर मी माझ्याच अपेक्षा तपासल्या. ‘बेटा, मुझे एक बहु और पोता दे दो,’ अशी जुन्या फिल्मी ‘माँ’सारखी अपेक्षा मला नव्हती. त्याला योग्य सोबत मिळण्याची इच्छा माझ्यापेक्षा जास्त त्याला स्वत:लाच असणार ना?… तरीही माझा ‘लग्न कर’चा धोशा म्हणजे प्रेम आणि काळजीच्या नावाखाली मी नकळत त्याच्या आयुष्यावर हक्क सांगतेय, ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करतेय हे मला जाणवलं.’’
‘‘हो गं, असं होतंय खरं! तरी अनन्याशी रोज वाद होण्याइतकी अस्वस्थता येते. तू नव्हतीस का अस्वस्थ?’’ श्रद्धानं कुतूहलानं विचारलं.
रेवती सांगू लागली, ‘‘त्या वेळी भावना थोड्या बाजूला ठेवून मी वस्तुस्थितीचा नव्यानं विचार केला. आपल्या पिढीत २०-२१ व्या वर्षी पदवी मिळाल्याबरोबर मुलीचं लग्न होत असे. मुलगा २४-२५ व्या वर्षापर्यंत नोकरी-व्यवसायाला लागला की झालं. मुलींसाठी ठरावीक नोकऱ्या, घर सांभाळणं अनिवार्य. पुढे यथावकाश दोन मुलं झाली की ‘सेटल’ झाल्याचं समाधान! ‘कुटुंब आणि लग्न’ हेच सर्व गोष्टींचं केंद्र होतं. आपल्या पिढीच्या मनात नकळतपणे या कल्पना इतक्या खोलवर रुजल्यात, की आता केंद्र ‘व्यक्ती’भोवती आलंय, नव्या पिढीच्या सांसारिक कल्पना वेगळ्या असू शकतात, हे आपल्याला मान्यच होत नाही. मोठा फरक झालाय तो ‘टाइम फ्रेम’मध्ये. या पिढीत ‘सेटल’ होणं २५ वरून ३५ कडे सरकलंय, हे आपल्याला चुकीचं वाटतं. पण आता कुटुंबंही छोटी झालीत, आर्थिक सुबत्ता आलीय आणि जग खुलं झालंय. आपण मोठे आणि अनुभवी आहोत, म्हणून मुलांनी आपलं ऐकावं असं आपल्याला वाटतं खरं, पण मुलांच्या आयुष्यातली स्पर्धा, वेग, त्यांच्या रिलेशनशिप्स, ब्रेकअप, लैंगिकतेविषयीचे ताण आपण अनुभवलेले नाहीयेत. फक्त लग्न लांबलं की ‘केवढं आयुष्य वाया गेलं,’ म्हणून आपण घाबरतो.’’

‘‘पण स्त्रीला नवरा आणि मुलं नसती तर किती अपूर्ण वाटलं असतं?’’ श्रद्धानं आपलं म्हणणं रेटलं.
‘‘असं तुला वाटतं. हे खूप सापेक्ष आहे गं! आपण संसारात रुळलो म्हणून आपल्याला असं वाटतं. पण मला सांग, तुला संसार किंवा बँकेतल्या नोकरीऐवजी ‘कॉर्पोरेट’ जगतात जाण्याची संधी तेव्हा लग्नाआधीच मिळाली असती, तर काय निवडलं असतंस?’’
‘‘नाही सांगता येत!’’ पॉश कॉर्पोरेट ऑफिसमधल्या खुर्चीत श्रद्धा मनोमन बसून आली आणि मनापासून हसली.
‘‘आपलं काय होतं, की आपल्या जुन्या चपला पायात तशाच ठेवून आपण मुलांच्या चपलांत शिरायला बघतो. किंवा मुलांच्या मेंदूतल्या ‘सेटिंग’पासून पेहरावापर्यंत सर्व काही बदललंय, हे कळत असूनसुद्धा, त्यांना जुन्याच चपला पायांत घालण्याचा आग्रह धरतो! इंटरनेटच्या जमान्यात, स्वतंत्रपणे काही वर्षं घराबाहेर, देशाबाहेर राहिलेल्या मुलांच्या मनात नेमकी काय उलथापालथ झाली असेल, ते लक्षातही न घेता आपण आपल्या मोठेपणाच्या आणि अनुभवी असण्याच्या फुग्यात राहतो…’’
श्रद्धा अचंबित झाली. ‘‘मी असा विचारच केला नव्हता गं कधी! माझे आई-बाबा, नातलग काय म्हणतील? अनन्याच्या किती मागे लागू मी? अशाच प्रश्नांत गरगरते मी!’’
‘‘अनन्याच्या जागी जाऊन बघ ना… तिला लग्न का नको वाटत असेल?’’

हेही वाचा : मनातलं कागदावर : रंगीत जादूचा खेळ!

‘‘ती म्हणते, की ‘मला स्वातंत्र्याची आणि निर्णय घेण्याची सवय झालीय. मनातलं बोलायला मित्रमैत्रिणी आहेत, पण आयुष्य सोबत काढण्यासारखा कुणी आवडला नाही. मला लग्न हे सर्वस्व तर वाटतच नाही. मग पुढे चांगलं भवितव्य दिसत असताना, मी लग्नाच्या घोळात का अडकू? करिअर आणि संसार दोन्हीचा बॅलन्स का घालवू? मला भरपूर फिरायचंय. भेटला एखादा माझ्यासारखा भटका तर भेटला, नाही तर नाही! तुम्ही कष्ट करून आम्हाला एवढी समृद्धी दिलीत, तरीही आम्ही तुमच्याचसारखी स्वप्नं बघायची का?’’
‘‘खरं आहे. मग तुला का इतका त्रास होतोय?’’

‘‘संस्कार म्हण, संस्कृती म्हण! एवढी मोठी मुलगी एकटी नकोच…’’ श्रद्धाच्या या बोलण्यावर रेवती हसली.
‘‘थोडक्यात जुन्या चपला तुटल्यात. नव्या घ्याव्याच लागणारेत. पण त्या चावतील अशी भीती वाटतेय! त्या भीतीतून बाहेर येऊन तर्कसंगत दृष्टीनं बघ ना… पूर्वीच्या पाळण्यात लग्न, बालविवाह या पद्धती हळूहळू जवळपास संपल्यात ना? परक्या पुरुषाशी बोलायचंही नाही, पण अनोळखी माणसाशी लग्न करून शरीरसंबंध करायचे, हे आपले संस्कार दुटप्पी नाहीत का? काळ बदलतो म्हणजेच समाजाच्या ठाम समजुतींमध्ये बदल होतो ना? आपल्या पिढीत दाखवूनच लग्न ठरण्याची सरसकट पद्धत होती, ती आजही आहेच, पण प्रेमविवाह तेव्हा सुरू झाले आणि आता सरसकट होतात. त्यापुढची पायरी एकटं राहणं, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ किंवा ‘टेस्टेड मॅरेज’ येऊ घातलीय. धावपळीच्या जगात काहींना मुलांची जबाबदारी झेपणार नाही असं वाटतंय. ज्यांना जी पद्धत रुचते, ती ते घेतील. हा सर्व बदल अटळ आहे गं… त्यात चांगलं-वाईट, चूक-बरोबर असं काहीच नाही!’’

हेही वाचा : माझी मैत्रीण’ : सुमी!

‘‘पण म्हणजे आपल्या मुलांनी कसंही वागलं तरी शरण जायचं?’’ श्रद्धा चिवटपणे म्हणाली.
‘‘प्रत्येक मूल टोकाचं वागत नाही. मुलांचे विचार जिथपर्यंत स्पष्ट आहेत तशी ती वागणार. जसं मागच्या पिढीचं म्हणणं मुलं तंतोतंत स्वीकारणार नाहीत, तसंच आपणही त्यांचं स्वीकारू शकत नाही. पण त्यात शरण जाणं, हार-जीत कशाची? मागच्या चाळीस वर्षांमधले बदल पाहिले, तर काही वर्षांनी लग्न करणं, मूल जन्माला घालणं, हे प्रश्न ‘जीवनमरणाचे’ उरणार नाहीयेत. ‘ही पिढी अशी का वागते? संस्कृतीचं काय होणार?’ या प्रश्नांची उत्तरं आपल्या हातात नाहीतच श्रद्धा! त्यामुळे आपण आपल्याच काळाच्या फुग्यात अडकून मुलांना आणि स्वत:ला त्रास करून घ्यायचा? की काळाची पावलं ओळखून आपल्या अपेक्षांना वळवून घ्यायचं? जमेल तेवढं अनन्याबरोबर बदलायचं, की आपल्याच जिवाभावाच्या लेकीला विरोध आणि तिच्याशी भांडण करून दु:खी व्हायचं? या प्रश्नांची उत्तरं कदाचित शांत करतील तुला!’’ श्रद्धाच्या भांबावलेल्या चेहऱ्याकडे पाहात रेवती समंजस आपुलकीनं म्हणाली.
neelima.kirane1@gmail.com