गीताबाईंचा जन्म ३ सप्टेंबर १९०७ चा. साने कुटुंब विदर्भातल्या नागपूरजवळच्या वाशिम गावचे. येथे स्त्री-सुधारणेची गती पुण्या-मुंबईच्या तुलनेत संथ होती, पण सुप्रतिष्ठित वकील आणि समाज कार्यकर्ते असलेले गीताबाईंचे वडील स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांच्या पाचही मुली त्या काळात पदवीधर झाल्या. गीताबाई भावंडांत सर्वात मोठ्या. त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा आणि अभ्यासकाचा! त्यातून त्यांनी केलेलं समाजकार्य आणि कथा-कादंबऱ्यांतून चित्रित केलेली कुटुंबसंस्थेत होणारी स्त्रीची कोंडी, जिव्हाळ्याच्या नात्यातल्या फटी, ओरखडे तत्कालीन समाजजीवनावर ठसा उमटणारे होते. स्त्री चळवळीला पुढे नेणारे होते.

१९२३ मध्ये आठवी उत्तीर्ण झाल्यावर रीतीप्रमाणे वडिलांनी गीताबाईंसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. पण गीताबाईंनी म्हटलं, ‘‘मला अजून शिकायचं आहे. आत्ताच लग्न नको.’’ वडिलांनी ताबडतोब ते मान्य केलं. शालेय शिक्षण वाशिमला झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी गीताबाई नागपूरला आल्या. एका वाड्यात स्वतंत्र खोली घेऊन राहू लागल्या. त्या काळात महाविद्यालयात जाणाऱ्या मुली मूठभरच. बहुतेक जणी कला शाखेच्या असत. गीताबाई मात्र ‘विज्ञान’ घेऊन एम.एस्सी. झाल्या. महाविद्यालयात विज्ञान शाखेत त्या एकट्याच विद्यार्थिनी होत्या. शिक्षक होण्यासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला.

१९३० च्या आसपास एकटं राहण्याबद्दल मुलाखतीत सांगताना गीताबाई म्हणाल्या होत्या, ‘‘माझ्या खोलीचं दार सतत उघडं असायचं. मैत्रिणींप्रमाणेच मित्रही माझ्याकडे यायचे. कोणी अंगचटीला आलेलं मला आवडत नसे. पण बोलण्यात अगदी कोणतेही विषय, कोणतीही चर्चा करायची माझी तयारी असे . १९३१ मध्ये एका मित्रानं स्केचेस काढून मला संतती- नियमनाची माहिती दिली होती. भोवतालच्या लोकांमध्ये कोणी तरी माझ्याबद्दल काही तरी बोलल्याचं क्वचित माझ्या कानावर आलं. पण मला त्याची दखल घ्यावी असंसुद्धा वाटलं नाही.

शिकणाऱ्या स्त्रियांबद्दल त्यावेळच्या समाजमनात शंकाकुशंका होत्या, तसाच वचकही होता. लिंग निरपेक्ष स्त्री-पुरुष मैत्रीसह माणुसकीचे व्यवहार कोणाशीही प्रस्थापित करता आले पाहिजेत. जीवनाचा तो हृद्या आणि सुंदर भाग असतो. मी लोकांचं वागणं पाहत असे. त्यातलं मला काय नको, काय हवं, काय जमण्यासारखं नाही; याचा विचार करत असे. त्यानुसार मी वागत असे. त्यानुसार एका मित्राशी नरसिंग धागमवारशी मी विवाहाचा निर्णय घेतला.’’

गीताबाईंना नागपूरपासून दूर उत्तर प्रदेशातील एका गावात-मीरत येथे शिक्षिकेची नोकरी मिळाली. वडील वकील होते, सधन होते परंतु स्वातंत्र्य चळवळीत चुकीच्या प्रकरणात खटल्यात गोवले गेल्याने घरची आर्थिक परिस्थिती ़विस्कटली. त्यामुळे त्यांना भावंडांची जबाबदारी घ्यावी लागली. १९३२ मध्ये वयाच्या ४५व्या वर्षी गीताबाईंनी नरसिंग धागमवार यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

नरसिंग हे धनबाद (बिहार) येथील ‘टाटा कंपनी’च्या कोळशाच्या खाणींवर बडे अधिकारी होते. मात्र धाकट्या भावंडांची शिक्षणं पार पडेपर्यंत हातातली नोकरी सोडायची नाही, असा गीताबाईंनी निर्णय घेतला. नरसिंग धनबादला आणि गीताबाई मीरतला असा हा संसार सुरू झाला. लग्नानंतरही गीताबाईंनी आपलं आडनाव बदललं नाही. या बाबतीत त्या म्हणतात की, ‘साडी बदलण्याइतकं नाव बदलणं मला सोपं वाटलं नाही.’ नवऱ्याच्या संदर्भात कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती अशी बिरुदं स्त्रीच्या नावामागे लावणं गीताबाईंना मान्य नव्हतं.

मुख्य मराठी भूमीपासून दूर असूनही १९३६ ते १९४२ मध्ये गीताबाईंनी आठ मराठी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्या प्रेमकथा नाहीत. त्यांच्या नायिका सर्वसामान्य रूपाच्या, कधी दात पुढे असलेल्या, कुरूपसुद्धा आहेत. आई आणि मुलगी कलह, मुलांवर आपल्या महत्त्वाकांक्षा लादणारी आई असे वेगवेगळे विषय त्यांनी चित्रित केले आहेत. त्याच्या नायिका या कुमारिका, विधवा, परित्यक्ता, शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्या असल्या तरी परिस्थितीने गांजलेल्या, पण स्वत्वाची वाट शोधणाऱ्या आहेत.

गीताबाई १९४४ मध्ये धनबादला कायमच्या राहायला आल्या. तेव्हा ब्रिटिश सरकार होतं. गीताबाईंची धारणा अशी की, आपण ज्या परिसरात राहतो, त्या लोकांना आपल्याबद्दल माया असली पाहिजे. भूगर्भात खोल जाऊन त्यांनी खाणीत काम करणाऱ्या मजुरांचं जीवन पाहिलं. सगळे त्यांना माताजी म्हणत. गीताबाई त्यांच्याकडे चहा घेत. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत. नरसिंग धागमवार यांचा स्वातंत्र्य चळवळीशी असलेला संबंध ‘टाटा कंपनी’ला मान्य नव्हता. म्हणून काही वर्षांनंतर ती नोकरी सोडून दोन मुली असलेलं हे चौकोनी कुटुंब धनबाद गावात स्थायिक झालं. तरी खाण परिसरात जाणं-येणं होतं. पुढे भारत सरकारचा कारभार सुरू झाला. ‘रिजनल लेबर कमिशन ऑफिसर’ने खाणीच्या ‘वेल्फेयर अडव्हायझरी कमिटी’मध्ये गीताबाईंना सभासद करून घेतलं.

प्रत्येक वेळेला ‘अजेंडा’ आला की, त्या अभ्यास करून बैठकीला जात असत. आपण शंभर सूचना दिल्या की त्यातल्या दोन तरी स्वीकारल्या जातात, असा अनुभव त्यांनी मुलाखतीत सांगितला. ही बरीच शिकलेली बाई अभ्यास करते, साधी राहते अशी त्यांची प्रसिद्धी झाली. बाकीच्या स्त्री-अधिकारी फक्त ‘सामाजिक प्रशिक्षण’ घेऊन आलेल्या होत्या. त्या काळात इतर अधिकारी स्त्रिया हजार-बाराशे रुपयांच्या साड्या नेसत होत्या. तेव्हा गीताबाईंच्या नऊवारी साड्या साडेचार-पाच रुपयांच्या असत. त्यामुळे त्या वर्तुळात गीताबाई विक्षिप्त गणल्या जाऊ लागल्या. काम करणाऱ्या स्त्रिया असल्या की वरिष्ठ लिपिकाची श्रेणी गैरफायदा घेणारी. या बायका गरीब परिस्थितीतल्या, वयाने तरुण असत. त्या प्रलोभनाला, मोहाला कधी तरी बळी पडायच्या.

एका केंद्रावरची एक विधवा अशीच कुठे तरी फसली होती. वरिष्ठ लिपिकाला सुगावा लागला. त्या नवरा-बायकोनं तिला गर्भपातासाठी मदत केली. नंतर त्या गर्भपाताची बातमी पसरवून तिला बदनाम केलं. प्रकरण गीताबाईंकडे आलं. त्या तिला घरी जाऊन भेटल्या. ती अशक्त, आजारी, अंथरुणाला खिळलेली होती. जे झालं ते सगळं तिने गीताबाईंना सांगितलं. गीताबाईंनी तिला ‘‘घाबरू नकोस. काहीही होणार नाही.’’असा धीर देऊन अहवालामध्ये लिहिलं की, तिच्याविरुद्धचे सगळे अहवाल खोटे आहेत आणि ते प्रकरण बंद करून टाकले. वास्तविक तिला काय झालं आहे, ते सगळ्यांना माहीत होतं. त्यावर बोलाचाली झालीच. गीताबाईंनी सवाल केला, ‘‘ज्या कोणा पुरुषामुळे हे झालं त्याला तुम्ही कोणती शिक्षा करणार आहात? ते मला आधी सांगा.’’ कोणाकडेच त्याचं उत्तर नव्हतं. सहा वर्षं गीताबाईंनी अशा प्रकारचं काम केलं. त्यात असे शेकडो अनुभव आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

गीताबाई ‘ऑनररी मॅजिस्ट्रेट’ (मानद दंडाधिकारी) होत्या. या कामासाठी त्यांनी भारतीय दंड संहिता वाचली. कायद्याचा अभ्यास केला. तेव्हाची गोष्ट. त्यांच्यापुढे एक प्रकरण आलं होतं. खाणीच्या एका मॅनेजरने एका बाईवर चोरी केल्याचा आरोप ठेवला होता. तिच्या खांद्यावर एक मूल होतं. दुसरं हातात होतं. मॅनेजर न्यायालयात येतच नव्हता. नऊ महिने प्रकरण पडून होतं. खांद्यावरचं मूल तुरुंगात जन्माला आलं होतं. ती सहा महिन्यांची गर्भवती असताना पकडली गेली होती. ती म्हणाली, ‘‘आप तो देख रही है, मेरे कंधेपर एक बच्चा. दूसरा हाथ मे। देखो मेरा ये टूटा हाथ। मै कैसे चोरी करती? ’’ तिने तुटलेला हात दाखवला. नियमाप्रमाणे गीताबाईंनी चोरीचा माल हजर करायला सांगितलं.

इमारतीतला भला मोठा गर्डरचा तुकडा घेऊन दोन मजूर आले. जो माल आणायला दोन मजूर पाहिजेत तो ती एक हात नसलेली, सहा महिन्यांची गर्भार बाई कशी चोरणार होती? गीताबाईंनी तिला निर्दोष म्हणून सोडून दिलं. ती म्हणाली, ‘‘माताजी, जिनकी दुष्मनी है उन लोगोने किया…’’ गीताबाईंनी स्वत:चे पाच रुपये देऊन तिला सांगितलं, ‘‘ताबडतोब स्टेशन गाठ आणि गावी निघून जा.’’ यावर गीताबाईंचं भाष्य ‘चोरीच्या तक्रारी येतात. पोलीस नीट चौकशी करू इच्छित नाहीत. ही बाई निराधार आहे. डांबा तुरुंगात, असा पोलिसी खाक्या असतो. हे प्रकरण खूप गाजलं. पोलिसांना गीताबाईंचा भयंकर राग आला होता. गीताबाईंविरुद्ध जिल्हा न्यायालयाच्या मॅजिस्ट्रेटपर्यंत तक्रारी गेल्या होत्या. पुढे काहीही झालं नाही. गीताबाई मनमोकळेपणानं सांगतात की, धनबादमध्ये नरसिंग प्रतिष्ठित वकील होता. त्यामुळे त्रास झाला नाही.

पुढे धनबाद गावात गीताबाई मुलींच्या शाळेच्या प्राचार्य झाल्या. तेव्हाही त्यांनी अनेक प्रश्न सोडवले, ‘चंबळची दस्युभूमी’ हे गीता साने यांचे पुस्तक (मे १९६५ मौज प्रकाशन) ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांतील चंबळ नदीचे हे टेकड्या आणि जंगलांचे दुर्गम खोरे, दस्यु म्हणजे डाकूंचा प्रदेश. ‘बँडिट क्वीन’ अर्थात डाकू फूलनदेवी याच भागातील होती. स्वातंत्र्य, हक्क-कर्तव्य, कायदा या शब्दांची ओळखच नसलेल्यांचे हे वसतिस्थान. आचार्य विनोबाजी भावे यांनी चंबळ खोऱ्यासाठी ‘शांती समिती’ स्थापन केली होती. १९६१च्या नोव्हेंबरमध्ये ‘शांती समिती’च्या कार्यकर्त्यांसमवेत गीताबाई वयाच्या ५४ व्या वर्षी बसने चंबळच्या दस्यूभूमीत गेल्या.

वेळप्रसंगी चाळीस मैल चालून अगदी आतल्या भागांत गेल्या. गीताबाईंच्या मनातली मुख्य समस्या होती की, भारतात काही भाग अत्यंत दुर्गम आहेत. पण तेथे निर्घृण डाकूगिरी आढळत नाही. मग चंबळच्या खोऱ्यातच निर्घृण डाकूगिरी का आहे? हे शोधण्यासाठी जिवाचा धोका पत्करून त्यांनी डाकूंच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. परत येऊन अनेकानेक पोलीस अहवाल, समित्यांचे अहवाल बारकाईने वाचले. अधिक अभ्यास करून १९६३ मध्ये त्या पुन्हा तेथे एक फेरी मारून आल्या. यातून सिद्ध झालं, गीताबाईंचं हे पुस्तक, ‘चंबळची दस्युभूमी’. जे कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे मार्गदर्शन करणारं आहे.

१९८४ मध्ये गीताबाई ‘विदर्भ साहित्य संमेलना’च्या अध्यक्ष होत्या. १९८६ मध्ये त्यांचे ‘भारतीय स्त्रीजीवन’ हे संशोधन पुस्तक प्रकाशित झालं. हे मराठीत असलं तरीही, अखिल भारतीय स्त्री-जीवनाची, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, कुटुंबसंस्था, वेश्या व्यवसाय सर्वांसंदर्भात मूलभूत मांडणी करणारं पुस्तक आहे. यातून स्त्री चळवळीची दिशाही स्पष्ट झाली आहे.

१२ सप्टेंबर १९९१ रोजी या अभ्यासक कार्यकर्तीचं धनबादमध्येच निधन झालं. महाराष्ट्रापासून किंबहुना इंदोर, बडोदा यांसारख्या बृहन् महाराष्ट्रापासूनही दूर बिहारमध्ये असलेल्या गीताबाई म्हणण्यासारख्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या नाहीत. व्यक्तिगत जीवन सुखासमाधानाचं लाभूनही त्यात त्या गुंतल्या नाहीत. भोवतालच्या समस्याग्रस्त स्त्री-वर्गाकडे त्यांनी सहृदयतेनं पाहिलं. मध्यमवर्गीयांचे ताणतणाव कथा-कादंबऱ्यांतून पुढे आणले. श्रमजीवी तळागाळातल्या स्त्री वर्गामध्ये प्रत्यक्ष मिसळून प्रश्न सोडवण्याचे प्रयास केले. स्त्रीच्या समस्या सोडवण्यासाठी समाजव्यवस्थेचा मूलभूत विचार करणारे संशोधन लेखन सिद्ध केलं. त्यांनी केलेलं हेच लेखन आणि सामाजिक कार्यामुळे त्या पुढच्या स्त्री कार्यकर्त्यांसमोर पुढे नेणारी वाट तयार झाली…

विनया खडपेकर | vinayakhadpekar@gmail.com