वय होतं तसे सांधे झिजतात, हाडांचे पृष्ठभाग खडबडीत होतात, निसर्गानं दिलेली हालचालींची मर्यादा कमी कमी होऊ लागते. साध्या साध्या कामाला वेळ लागतो. वेदना होतात किंवा ते काम करता येत नाही. विशेषत: साठीच्या पुढे जवळजवळ सर्व जनता कमी-अधिक प्रमाणात गुडघेदुखीने त्रासलेली असते. त्यानंतर खुब्याचा सांधा (हिप जॉइंट) आणि तिसऱ्या क्रमांकावर खांद्याचा सांधा. ६५ वर्षांपुढे तीनपैकी एका माणसाला तरी खांदेदुखी कधी ना कधी अनुभवाला येते. हृदयविकार, न्यूमोनिया, स्ट्रोक अशा गंभीर आजारांनंतर अचानक खांदा दुखायला लागला ही गोष्टसुद्धा बरेचदा दिसून येते.
सुरुवातीला प्रत्येक रुग्ण वेदनाशामक औषधं घेतो, विविध व्यायामप्रकार शिकू लागतो, अनेक तऱ्हांचे गरम, गार, इलेक्ट्रिक, अल्ट्रासोनिक, चुम्बकीय उपचार करूनही आराम मिळाला नाही तर खांद्याच्या पोकळीत कॉर्टिकोस्टेरॉइडची इंजेक्शनं, दुर्बिणीतून आत प्रवेश करून हाडांचा पृष्ठभाग खरवडून गुळगुळीत करणे (आथ्रेस्कोपिक डेब्रीडमेंट )अशा पायऱ्या क्रमाने चढून गेल्यावर एकेकदा वेळ अशी येते की रुग्ण पूर्ण जेरीला येतो आता काहीही करा पण या वेदनेतून मुक्त करा एवढंच त्याचं म्हणणं असतं. आणि माग सांधा बदलणे एवढा एकच पर्याय दिसू लागतो.
खांद्याच्या रचनेची ही माहिती काहीशी क्लिष्ट वाटली तरी पुढचा भाग समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ज्या व्यक्तीचा खांदा संधिवातानं पीडित आहे आणि आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही उपायाने बरा होत नाही, अशा व्यक्तींना पारपंरिक सांधा बदल शस्त्रक्रिया सुचविली जाते. ही शस्त्रक्रिया म्हणजे नैसर्गिक रचनेची हुबेहूब नक्कल असते. सांध्यातला खराब झालेला हाडांचा भाग कापून टाकतात. दंडाच्या हाडात धातूचा कृत्रिम बॉल त्याच्या देठासकट बसवला जातो. बाजूने सिमेंट भरून त्याला पक्का करून घेतात. खांद्याच्या त्रिकोणी हाडाच्या टोकाला प्लास्टिक कप बसवला जातो. त्यानंतर बॉल आणि सॉकेट (प्लास्टिक कप) एकत्र जोडले जातात. शस्त्रक्रियेनंतर सहा आठवडे विश्रांती आणि मग टप्प्या टप्प्याने व्यायाम दिले जातात. बऱ्याच महिन्यांनंतर रुग्णाला खांद्याची हालचाल पूर्वीच्या ८० ते ९० टक्के इतकी करता येते. वेदनेपासून आराम नक्कीच मिळतो.
अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया १९७० पासून सुरू झाल्या. परंतु त्यानंतरच्या काही वर्षांत अस्थिरोगतज्ज्ञांना लक्षात आलं की अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करून, कोणताही जंतुसंसर्ग वगैरे नसतानाही काही रुग्णांना या शस्त्रक्रियेचा अजिबात फायदा होत नाही. नंतरचे व्यायाम सुरू होताच ताबडतोब वेदनाही सुरू होतात आणि हात उचलता येत नाही, असं का? याचा शोध घेता लक्षात आलं की ज्या रुग्णांचा रोटेटर कफचा स्नायू समूह अशक्त आहे, दुर्बल आहे किंवा फाटलेला आहे, त्यांना ही शस्त्रक्रिया उपयोगी पडत नाही. नव्या सांध्याला अशक्त रोटेटर कफमुळे स्थिरता नसते. दंडाच्या हाडाचा बॉल पुढे सटकतो आणि असह्य़ वेदना चालू होतात. खांदा हलेनासा होतो. ६५ वयाच्या पुढे सुमारे २२ टक्के रुग्णांचा रोटेटर कफ दुर्बल असतो. अपघातात बसलेल्या मारामुळे, बॅडमिंग्टन, टेनिससारखे खेळ खेळताना रोटेटर कफला दुखापत होते, रंगारी, शिक्षक अशा लोकांना वारंवार हात उचलावा लागतो, त्यामुळेही रोटेटर कफला इजा होते. स्नायू तंतू कमी-जास्त प्रमाणात तुटल्यास हात उचलताना सुरुवातीलाच अडचण येते. डेल्टोइड स्नायू बलवान असूनही उपयोग नसतो. स्नायू तुटले की सांधा झिजू लागतो. खांद्यात सतत वेदना, हात न उचलणे आणि रात्री बिछान्यात पडल्यावर खांद्याला काळ लागणे ही रोटेटर कफ खराब झाल्याची लक्षणं असतात.
याचं निश्चित निदान खांद्याच्या स्नायूंची सोनोग्राफी आणि एमआरआय तपासणी करून केलं जातं. पारंपरिक शस्त्रक्रियेचं नियोजन करण्यापूर्वी या तपासण्या करून रोटेटर कफची स्थिती काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. तर मग अशा रुग्णांसाठी काय करता येईल ? विशेषत: वाढत्या आयुर्मानामुळे सत्तर-ऐंशीच्या पुढेही असे असंख्य रुग्ण आहेत ज्यांना खांदेदुखीतून आराम हवा आहे. डॉक्टर पॉल ग्रामोंट या फ्रेंच सर्जनला अगदी अफलातून कल्पना सुचली. नैसर्गिक सांध्याची हुबेहूब नक्कल कुचकामी ठरतेय, त्याच्या बरोबर उलटं केलं तर? बॉल आणि सॉकेटची अदलाबदल? खांद्याच्या वरच्या त्रिकोणी हाडाला बॉल बसवायचा आणि दंडाच्या हाडाला सॉकेट बसवायचं. हे सॉकेट पुरेसं खोलगट असेल. सांध्याचं मॅकेनिक्स बदलेल. हात उचलायला रोटेटर कफ लागणार नाही. डेल्टोइड स्नायू जास्त परिणामकारक पद्धतीने काम करेल बॉल सॉकेटमधून निखळण्याचं प्रमाण एकदम कमी होईल.
डॉक्टर ग्रामोंटनी लढवलेली ही अभिनव शक्कल प्रत्यक्ष रुग्णांमध्ये १९८० साली प्रथम वापरली. त्यानंतर अनेक वर्षे निरीक्षण करून २००४ साली अमेरिकन एफ.डी.ए.ने (फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) या शस्त्रक्रियेला परवानगी दिली. भारतात २०१० पासून काही मोजक्या सांधेबदल केंद्रांमध्ये ही शस्त्रक्रिया केली जात आहे. आता तिला रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट म्हणू लागले आहेत.
ही शस्त्रक्रिया अर्थातच सरसकट सगळ्या खांदेदुखीसाठी नाही. तांत्रिकदृष्टय़ा ती अवघड आहे आणि ती यशस्वीपणे करायला कुशल अनुभवी सर्जन पाहिजे. अशा रिव्हर्स कृत्रिम खांद्याचा खर्चही बराच आहे. म्हणून या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड काळजीपूर्वक केली जाते. ज्यांचं वय ६५च्या पुढे आहे, ज्यांचा रोटेटर कफ अशक्त किंवा फाटलेला असल्याचं सिद्ध झालं आहे, ज्यांची एक पारंपरिक शस्त्रक्रिया फसलेली आहे, किंवा ज्यांच्या सांध्याच्या आत अस्थिभंग झालेला आहे अशा लोकांना रिव्हर्स शोल्डर शस्त्रक्रिया एक चांगली संधी देऊ शकते. ८० ते ९० टक्के रुग्णांना वेदनेपासून आराम मिळतो. आणि खांद्याची हालचालही पूर्वीइतकी नसली तरी बऱ्याच अंशी सुरू होते. हात उचलता येतो, पण आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला वळवता येत नाही.
मात्र या शस्त्रक्रियेला काही बंधनंही आहेत. हाडं खूप ठिसूळ असतील, सांध्यामध्ये जंतुसंसर्ग झाला असेल, किंवा डेल्टोइड स्नायुसुद्धा दुर्बल झाला असेल तर ही शस्त्रक्रिया करू नये, तिचा फायदा होत नाही.
रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट हे चाकोरीबाहेर जाऊन केलेल्या स्वतंत्र कल्पक विचाराचं उदाहरण आहे. अद्याप ही शस्त्रक्रिया मोठय़ा संख्येने केली गेली नाहीये. या तंत्रावर प्रभुत्व असणारे सर्जनही कमी आहेत. शस्त्रक्रियेनंतरची सुधारणा किती होईल हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. पण सुरुवात झालेली आहे. आज नाही पण येत्या काही वर्षांत या प्रयत्नांना अधिकाधिक फळ मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.
डॉ. लीली जोशी – drlilyjoshi@gmail.com
लेखासाठी साहाय्य : डॉ आशीष बाभूळकर, खांद्यावरील शस्त्रक्रियेचे सर्जन
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2015 रोजी प्रकाशित
खांद्याचा सांधा
ज्यांचं वय ६५ च्या पुढे आहे, ज्यांचा रोटेटर कफ अशक्त किंवा फाटलेला असल्याचं सिद्ध झालं आहे, ज्यांची एक पारंपरिक शस्त्रक्रिया फसलेली आहे,
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 04-04-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व उद्याचे आज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humeral coupling