Irawati karve gourai Rickshaw men of goodness learn driving ysh 95 | Loksatta

‘गौराई’

‘ती’सुद्धा इरावतीबाईंची गौराईच वाटली मला! फक्त काळ बदलला तशी या गौराईनं घर चालवण्यासाठी रिक्षा हाती घेतली होती.

‘गौराई’
‘गौराई’

राणी दुर्वे

‘इरावती कर्वे’ हे नाव ‘ती’ला माहीत असण्याचं कारण नव्हतं. पुरुषांच्या चांगुलपणाला दाद देणारी आणि नाठाळपणाला वेळीच लाथ मारणारी, ‘ती’सुद्धा इरावतीबाईंची गौराईच वाटली मला! फक्त काळ बदलला तशी या गौराईनं घर चालवण्यासाठी रिक्षा हाती घेतली होती. म्हणजे इरावतीबाईंच्या गौराईची ही पुढची पिढीच!

दिवस होता यंदाच्या भाऊबिजेचा. पार संध्याकाळची वेळ. मी माझ्या चुलत बहिणीकडून घरी निघाले होते. भरगच्च रस्ता. घरी जायला रिक्षा मिळेल न मिळेल या शंकेनं रस्ता ओलांडला तर समोरच एक रिकामी रिक्षा दिसली. त्या दिशेनं आशेनं पावलं वळली, तर नेहमीप्रमाणे कुठूनसं हवेतून एक जोडपं आलं आणि रिक्षात बसलंही! एकुलती एक रिक्षा निघून जाण्याचं क्षणभर दु:ख होतंय न होतंय तर समोर एक रिक्षावाली आली. आशा पल्लवित झाली. रिक्षावाल्यानं दिलेला नकार पचवण्याची आपल्याला इतकी सवय असते, की हीसुद्धा नाहीच म्हणणार असं वाटत असतानाच ती चक्क माझ्या इच्छित स्थळी यायला तयार होती आणि तेही भाऊबिजेच्या भाऊगर्दीच्या दिवशी! अहो आश्चर्यम्! आत बसले. पहिल्यांदाच मी ‘रिक्षावाली’च्या रिक्षात बसत होते.

काही क्षण गेले आणि मी तिला विचारलं, ‘‘मराठी येतं का?’’ ती हसून म्हणाली, ‘‘बोला, बोला ना.. येतं मला मराठी. मी ख्रिश्चन आहे, पण मराठी येतं मला.’’ मी म्हणाले, ‘‘अगं, मी पहिल्यांदाच बसते आहे एखाद्या बाईच्या रिक्षात. मला प्रचंड कौतुक वाटतं रिक्षा चालवणाऱ्या तुम्हा बायकांचं.’’ माझी अगदी मनापासून प्रतिक्रिया होती. माझा शाबासकीचा हात पाठीवर पडताच तीही खुलली, हसली, म्हणाली ‘‘ओहो, थँक्यू!’’ एव्हाना रिक्षानं वेग पकडला होता. रस्त्यावरच्या तुफान वाहनांच्या गर्दीतून ती लीलया रिक्षा बाहेर काढत होती. तिच्या कौशल्याचं कौतुक माझ्या मनात. दोघी बोलू लागलो. ‘‘किती वर्ष चालवतेस?’’ विचारलं, तर म्हणाली, ‘‘पाच वर्ष तर होऊन गेली बघा.’’  ‘‘रिक्षा कशी काय चालवायला लागलीस?’’ या प्रश्नांवर ती म्हणाली, ‘‘मला ड्रायव्हिंग लई आवडायचं, अगदी पूर्वीपासून. पण आई-बापाला तर मला ड्रायव्हिंग शिकवायला घालणं शक्य नव्हतं. त्यांनी माझं लग्नच लावून दिलं. नवऱ्याकडेही पैसा नव्हता. तो फार कमावत नाही, पण बरा आहे तसा! मग मी स्वत:च पैसे साठवून ड्रायव्हिंग शिकले. गाडी घेतली कर्ज काढून २०१८ ला. नंतर दोन वर्षांत करोना सुरू झाला, पण तेव्हाही मी चालवत होते रिक्षा. काय करणार? पैसा तर लागतो ना संसाराला!  माझं शिक्षण नाही झालेलं. आता मला माझ्या मुलांना शिकवायचं आहे. त्यांना जे हवं ते शिक्षण मिळालं पाहिजे. आमचं घर पार दूर डोंगरावर आहे. यंदाच्या पावसात ते कोसळलं. आता घर पुन्हा उभं करण्याचंही काम करावं लागेल मला..’’

   हिला एवढे रस्ते कसे माहीत.. बाई म्हणून काही वाईट अनुभव?  बाकीच्या रिक्षावाल्यांची काय प्रतिक्रिया? पोलीस त्रास देतात का?.. माझे चुटपुटत्या आवाजातले प्रश्न आणि तिची ठाशीव उत्तरं. ‘‘मी कुणालाच रिक्षासाठी नाही म्हणत नाही. कुठेही जायला तयार असते. आता मला ठाण्यातलेच काय, सेंट्रल, वेस्टर्न बाजूचे सगळे रस्ते माहिती झाले आहेत. रिक्षा चालवायची तर नाही कशाला म्हणायचं?’ मी घडय़ाळात पाहिलं. आताही तसा उशीरच झालेला होता, पण ती स्वस्थ होती, तितकीच तिच्याबरोबर मीही.

 ‘‘भेटतात लई माणसं या रिक्षाच्या धंद्यात. चांगली असतात, तशीच वाईटपण असतात. बेवडे असतात, टगी पोरं असतात. एकदा एक बेवडा बशिवला त्याच्या भावानं, म्हणाला, पैसे आधीच मी देतो, त्याला पोचव एका जागी. बेवडा आहे म्हणल्यावर मी नाहीच म्हणणार होते, पण मग म्हटलं बसू दे. आधी बराच वेळ ‘ताई-ताई’च म्हणत होता, पण मग माझ्या कमरेला हात लावला. एकदा वाटलं चुकून लागला असेल, पण मग परत हात आला तसा आवाज चढवला. ‘काय रे ७७७ , काय करतो?’ म्हणत गाडी घेतली बाजूला. अगदी काळोखाचा रस्ता होता. त्याला काढला रिक्षातून बाहेर, घातली लाथ पेकाटात आणि सोडलं तिथंच रस्त्यावर. सकाळधवर, दारू उतरेस्तो मिळालीपण नसेल त्याला दुसरी रिक्षा. पडू दे म्हटलं  ७७७ ला!’’ ती जितक्या लीलया रिक्षा वळवत होती तितक्याच सहज शिव्यांचा वापर!   ती हकिगत ऐकून मी मनातल्या मनातच तिच्यावर खूश! भली खोड मोडली दुष्टाची म्हणत लहान मुलाप्रमाणे आपणही टाळय़ा वाजवाव्यात, असं उगीच वाटून गेलं. घरी भांडीधुणी करणाऱ्या बहुतेक बायांची एकच रड असते. ‘दारू पिऊन नवरा मारतो, काम करत नाही. आमच्या पैशांवर जगतो.’ पोटतिडिकीनं मी त्यांना विचारते, ‘‘अगं, तो प्यायलेलाच असतो ना? मग का नाही त्याच्या पेकाटात लाथ मारत? का नाही त्याला हाकलून देत? मार खाताच कशा तुम्ही?’’ अशा वेळी मला वाटतं, त्या एकेकीच्या नवऱ्याला जाऊन आपणच हाणून यावं. त्यांच्यातलं कुणीही कधीही ‘नवऱ्याचं टाळकं फोडलं’ म्हणून सांगत नाही. आणि इथे ही सांगते आहे, की दारुडय़ा प्रवाशाला रस्त्यावर ढकलून दिला आणि तेही अशा जागी की पुन्हा रिक्षा मिळाली नसेल. खुद्दार आहे बया!

  ती पुन्हा सांगायला लांगली, ‘‘दुसरा एक भेटला, तो एकदम जंटलमन दिसायला. उंच, गोरा, चांगले कपडे. प्यायलेला पण नव्हता. रिक्षा सुरू केल्यावर ‘बेटी बेटी’ करून बोलू लागला. थोडय़ा वेळानं रडायलाच लागला. विचारलं, ‘‘काय झालं? तुमच्या मुलीला काही झालं का?’’ तर म्हणाला, ‘‘मला बायको नाही.’’ मग म्हणायला लागला, ‘‘अजून थोडा वेळ फिरव, मी पैसे देतो.’’ माझ्या लक्षात आलं, मी म्हणाले, ‘‘लगेच उतरा.’’ हा उतरायलाच तयार नाही. ‘‘पैसे देतो, माझ्याबरोबर चल,’’ म्हणाला, मग मीपण दिल्या शिव्या आणि हाताला धरुन बाहेर काढलं. असे लोक! पण चांगले लोकसुद्धा खूप भेटतात. मी बाई म्हणून काही जण भाडय़ाचे पैसे देतानाही असे वरून देतात. हाताला स्पर्श करत नाहीत.’’

   सतत रस्त्यावर राहून एवढय़ा वाईटातही चांगलंच जास्त असतं म्हणणारी रिक्षावाली मला आता भलतीच आवडू लागली. म्हटलं, ‘‘बाकीच्या रिक्षावाल्यांचा काय अनुभव?’’ ‘‘त्यांचं विचारू नका. काही काही रिक्षास्टँडवर इतका त्रास देतात.. उभं राहू देत नाहीत. मी रिक्षा लावलीच, तर गाडी मागे घ्यायला लावतात. आपल्या रिक्षा पुढे आणून ठेवतात. गिऱ्हाईकाला बसू देत नाहीत. रिक्षावाले पुरुष लई त्रास देतात. रिक्षावाली बाई दिसली की त्यांना काय होतं कोण जाणे!’’

 मी मनात म्हटलं, बाई गं, रिक्षावालीच काय, कोणत्याही स्पर्धेत बाई दिसली, जरा बाई वरचढ होतेय असं वाटलं, की पुरुष जमातीला काय होतं हे मला काय, कुणालाच माहीत नाही! इतकी क्षेत्रं बायकांना खुली झाली, बायकांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, तरीही अनेक पुरुषाचा अंगभूत अहंकार काही जात नाही. आपल्यापेक्षा बाईला कमीच कळतं हा ठाम गैरसमज! एव्हाना आम्ही माझ्या घराच्या दिशेला लागलो होतो. तिच्या अधूनमधून गप्पा सुरूच होत्या. ‘रिक्षाचं कर्ज, मुलींची शिक्षणं, किती पैसा लागतो जगण्याला..’ वगैरे.

 हल्ली कुणीही माझ्याशी बोलायला आलं, की मी आर्थिक साक्षरतेची माझी टेप सुरू करते. तिलाही म्हटलं, ‘‘महागाई खूप असली तरी आधी कर्ज फेडून टाक. थोडे तरी पैसे साठव. पण त्यापेक्षा जास्त गरजेचं म्हणजे तुमच्या म्हातारपणासाठी पैसा ठेव. मुलं वाईट नसतात, पण ती करतीलच असं नाही. ’’ ती ऐकत होती.  परस्परांतला बंध विणला जात होता. आता मी उतरून जाणार होते आणि तिची रिक्षा आणि तिचा प्रवास चालू राहणार होता.

   मनात आलं.. या घरोघरच्या गौराया! ‘इरावती कर्वे’ हे नाव हिला माहीत असण्याचं काहीच कारण नाही. रिक्षाच्या प्रवासात मला तिचा चेहरा धड दिसलेलाही नव्हता. पाठमोरी ती, अंगात शर्टसदृश कपडे. कष्ट तर घरोघरी, गावोगावच्या बायका करतात. प्रत्येकीच्या कष्टांचं रूप वेगळं, तसंच हिच्याही. मुलांच्या शिक्षणाची, आईपणाची आस तीच, घर उभारण्याची असोशी त्याच गौराईंची. मरहट्टपणाचा घट्टपणा तोच. पुरुषांच्या चांगुलपणाला दाद देणारी आणि नाठाळपणाला वेळीच लाथ मारणारी तीच ती इरावतीबाईंची गौराई! हिच्याही बोलण्या-वागण्यात नाजूक नजाकत नाही, पण जगण्याला आवश्यक अशी खुद्दारी ओतप्रोत भरलेली. वाटलं, ही तर बाईंच्या गौराईचीच पुढली पिढी. ‘गौराई पार्ट टू!’

मधल्या पन्नास-साठ वर्षांत जग अधिकच गुंतागुंतीचं झालेलं आहे. तरीही हीच ती त्यांची गयाबाई, बजाबाई, माळीणबाई. फक्त आता घर चालवण्यासाठी हिनं रिक्षा हातात घेतली आहे. झोकदार वळण घेऊन तिनं माझ्या घरासमोर रिक्षा थांबवली. शे-सव्वाशे अधिकच हातात देऊन मी उतरले. ती ‘कशाला, कशाला’ करत होतीच, तर मी माझ्या बॅगेतून दिवाळीच्या मिठाईचा बॉक्स काढून तिच्या हातात ठेवला. म्हटलं, ‘‘हे घे, हॅपी दिवाळी’’ ती संकोचली. ‘‘नाही, नाही. नको. दिले की तुम्ही पैसे जास्तीचे.’’ ‘मी म्हटलं, ‘घे गं, दिवाळी आहे. जपून राहा.’ मनापासून आनंदून ती म्हणाली, ‘‘गॉड ब्लेस यू!’’ ती वळली तेव्हा तिच्या त्या वाक्यानं मला आठवलं, ‘अरे, ही तर ख्रिश्चन होती आणि तिला मी दिवाळीच्या शुभेच्छा देत होते! पण तसा आम्हाला फरक पडत नव्हता. जात-धर्मापलीकडची दिवाळी आम्ही साजरी करत होतो. खुद्दारीची दिवाळी! 

ranidurve@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:01 IST
Next Story
स्वच्छतागृहांकडून वस्तीविकासाकडे..