‘अर्धसत्य’मधल्या रामाशेट्टीला साक्षात समोर पाहून तो पानवाला धन्य धन्य झाला. आणि इकडे वाट पाहात उभी राहिलेल्या माझा वैतागाचा पारा चढत चालला होता. माझे असे लहानसहान आनंद करपले ते कायमचे. कारण पुढे असे प्रसंग नेहमी घडत गेले. काही विचित्र, काही वेगळे, काही खूपच चांगलेसुद्धा. पण हे सगळं हळूहळू मला कळायला लागलं. आज आम्ही या नात्यात असे मुरलो आहोत की आपण स्वत: हे नातं जोडलंय हेच विसरलोत. जन्माला येतानाच काही नाती मिळतात ना आपल्याला, तितकंच ते सहज नैसर्गिक वाटतंय. आणि म्हणूनच बहिणाबाईंच्या ओवीचा खरा अर्थ उमगू लागला आहे. ‘येडय़ा गळय़ातला हार, म्हणू नको रे लोढणं’.’’ जेष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबरच्या चाळीस वर्षांच्या आपल्या सहजीवनाचा लागलेला अर्थ सांगताहेत लेखिका, अनुवादक सुनंदा अमरापूरकर.
मीत्याला पहिल्यांदा पाहिलं ते एका क्रिकेट सामन्याच्या वेळी. १९५९ नाहीतर ६० साल असावं. अहमदनगरच्या वाडिया पार्क मैदानावर रणजी करंडक सामना होता. पण मी माझ्या पत्रकार वडील विष्णुपंत करमरकरांबरोबर मॅच पाहायला गेले होते. त्यामुळे अर्थातच आम्ही पत्रकार कक्षात बसलो होतो. मला क्रिकेटमधलं काही कळत नव्हतं. पण तेव्हा मला वडिलांबरोबर सगळीकडे ऐटीत फिरायला फार आवडायचं. त्यामुळे पांढरा फ्रॉक, उन्हाची टोपी, बूट वगैरे घालून त्यांची दुर्बीण गळय़ात अडकवून मी बसले होते. लंचटाइममध्ये माझ्याच वयाची दोन मुलं तिथे फिरत फिरत आली. वडिलांनी त्यांना शेजारी रिकाम्या खुच्र्यावर बसवून घेतलं. त्यांच्यातल्या एकाजवळ खूप छोटी दुर्बीण होती, पण तिच्यातून लांबचे खेळाडू खूप जवळ असल्यासारखे दिसत. त्याने मलाही दिली ती दुर्बीण थोडा वेळ बघायला. मला दुर्बीण आवडली. पण मोठय़ा डोळय़ांच्या त्या गप्पिष्ट, चुणचुणीत मुलाचा अस्सा राग आला! मी शेजारी असताना वडील आपले त्याचीच क्रिकेटची बडबड ऐकत बसले. आणि कौतुकाने हसतही होते. तो मुलगा म्हणजे बंडू. वडिलांचे स्नेही दत्तोपंत अमरापूरकर यांचा मुलगा. ते नंतर कळलं. पण फणकारा आल्यामुळे तो नीटच लक्षात राहिला माझ्या!
तर ही आमच्या दोघांची पहिली भेट. वय वर्षे दहा. दोघांचेही. म्हणजे मुलाखतकार नेहमी विचारतात त्या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘आम्ही गेली ५३ वर्षे एकमेकांना ओळखतो.’ बाप रे! ५३ वर्षे? आणि लग्नाला झाली ४० वर्षे! हे असं आकडय़ांतलं मोजमाप पार घाबरवून सोडतं हो! पण खरोखरच, नात्याचं मोजमाप असं तपशिलाच्या आकडय़ांनी करता येतं? जे नातं कळी उमलल्यासारखं नकळत जुळलं आणि जगता जगता आपोआप कायम राहण्यासाठी पक्कं होऊन गेलं, त्याच्यासाठी हे आकडे-बिकडे गैरलागू वाटतात. तरीसुद्धा वयाची साठी उलटली आहे.. आता या वळणावर जरा थांबून, सावकाश मागे वळून आपल्याच आयुष्यात घडलेल्या घटनांकडे बघणं म्हणजे तारुण्यात आवडलेला ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चित्रपट, त्यातली गाणी आठवत पुन्हा शांततेने बघितल्यासारखा आनंद देतं, हे मात्र खरं!
शाळेत असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखत असलो तरी आमची खऱ्या अर्थाने ‘भेट झाली’ आणि ‘गाठ पडली’ ती नाटकात. कॉलेजाची, यूथ फेस्टिव्हलची आणि नंतर उगाचच काही ना काही निमित्त शोधून केलेली नाटकं (पूरग्रस्तांना मदत, माजी विद्यार्थी संघटनेसाठी वगैरे, वगैरे.) गावोगावी होणाऱ्या करंडक, चषक यांच्याकरता केलेल्या एकांकिका, त्यांच्या महिनोन्महिने केलेल्या तालमी या सगळय़ा दरम्यान आम्ही एकमेकांना जवळून पाहिलं आणि तेव्हा एकमेकांना नीट पारखलंही असावं. अठरा-एकोणीस म्हणजे त्या काळातलं वेडं वयच होतं. तेव्हाचे ते भावूक चित्रपट, कथा-कादंबऱ्या अगदी मनापासून वाचलेल्या.. त्याचा प्रभाव मनावर असायचा. त्यामुळे रोमँटिसिझमच फार. (हे मी स्वत:बद्दल सांगतेय. अकरावीपर्यंत माझे संपूर्ण फडके-खांडेकर वाचून झालेले होते.) हिंदी-मराठी सिनेमे, मराठी नाटकं आणि तद्दन सगळी भावगीतं, चित्रपट गीतं यात रमल्यामुळे स्वत:ला नकळत त्यातलीच एखादी नायिका समजण्याचं ते वय होतं. ‘आपण प्रेमात पडलो आहोत’ ही भावनाच खूप सुखावत असे. प्रेमाची परिणती लग्नात व्हायला पाहिजे. हाही अलिखित नियम होता. ‘प्रेमविवाह’ या घटनेला तेव्हा वलय असायचं. तशा त्या वलयासह आमचंही प्रेमलग्न झालं. मोठय़ा कौतुकाने लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर पुढे काय? हे काही आम्ही ठरवलेलं नव्हतं. ग्रॅज्युएट झाल्यावर सहज चांगली मिळालेली नोकरी मी धरली होती. पण याचं अजून शिक्षणच चालू होतं. लग्नानंतर पंधराच दिवसांनी तो पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेला. युनिव्हर्सिटीच्या होस्टेलवर. मी इकडे नगरलाच होते. सासरी. सर्व निर्णय अजून त्याचे वडीलच घेत असत. मुलगा शिकतो आहे, ते पूर्ण झालं की करीलच काहीतरी. असा सगळय़ांचा विचार. आणि माझं तर काय? ‘मी त्याला मनाने वरलं आहे. आता मंगलाक्षता पडल्या, की जीवनाचं सार्थक!’ याच विचारात पूर्ण बुडालेली होते. व्यवहार वगैरे रूक्ष गोष्टींचा विचार करण्याइतकं भान कुठे होतं? मात्र शिक्षणाच्या निमित्ताने सुरू झालेला हा विरहाचा काळ पुढे नऊ वर्षे लांबला. कारण शिकता शिकताच हे महाशय नाटकाकडे वळले. त्याला त्यातच करिअर करायचं होतं. या क्षेत्रातले अपार कष्ट, मेहनत, अनिश्चितता काही काही दिसत नव्हतं त्याला. एकदा काही करायचं ठरवलं, की त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या किमतीचा विचार येत नाही त्याच्या मनात. स्वभावच तसा आहे त्याचा!
पण तो नऊ वर्षांचा काळ, दोघांच्या सहजीवनातला फार खडतर काळ ठरला. त्याने पसंत केलेली काटय़ाकुटय़ांची वाट तर एकटय़ाचीच होती. पण मी सगळय़ा माणसात, प्रेमळ कुटुंबात राहात असूनही आतून एकटी होते. ‘आहे मनोहर तरी गमते उदास..’ अशी भावना सतत मनाला व्यापून राहिलेली. तो फारशी नियमित पत्रेही लिहायचा नाही. फोन हीसुद्धा फार ‘रेअर कमॉडिटी’ होती. पोस्ट खात्याचाच काय तो आधार होता. आणि सोबतीला होती रेडिओवरची दर्दभरी विरहगीतं. ‘आता काय करतो तुझा नवरा? एकटा जीव सदाशिव!’ असे गावातल्या लोकांचे टोमणे होतेच. तरीसुद्धा ‘कुठून या माणसाच्या प्रेमात पडलो आणि लग्नही करून घेतलं?’ असं काही माझ्या मनात कधी आलं नाही. । मुझे गम भी उनका अजीज है, के उन्ही की दी हुई चीज है। हीच भावना कायम राहिली.
तेही दिवस गेले आणि ध्यानीमनी नव्हतं इतकं नाव, यश, मान-सन्मान पैसा सगळं मिळायला लागलं. नगरचं साधं जीवन सोडून मुंबईत राहायला आलो. इथे कुणाचाही आधार नसताना संसाराचं बस्तान बसवायचं, पूर्ण वेगळय़ा जीवनशैलीची सवय करून घ्यायची. त्यात रुळून नोकरी, तीन मुली सगळं सांभाळायचं होतं. आव्हानं मोठी होती. पण पेलली. परस्परांवर गाढ विश्वास, जिव्हाळा, प्रेम होतं. मित्र आणि हितचिंतकांचा पाठिंबा होता. मुख्य म्हणजे आता आम्ही दोघं एकत्र राहणार होतो. ते मोठंच टॉनिक मिळालेलं होतं.
आमच्याकडे पाहताना खूप जणांना वाटतं, की यांच्याकडे नवरा-बायकोमध्ये परफेक्ट विचारविनिमय करून निर्णय घेतले जात असावेत, म्हणूनच अशा सुविहितपणे गोष्टी पार पडतात. पण ते तसं अजिबात नाही. काय झालंय की नकळतच संसारातली आमची डिपार्टमेंट्स वाढली गेली आहेत. गाडी, घरखरेदी, पुस्तकांची खरेदी हे त्याचे प्रांत. ‘हीच गाडी का घेतली, ती दुसरी स्वस्त होती.’ असं मी त्याला कधी विचारलं नाही. मुलींच्या शाळा-कॉलेजच्या अ‍ॅडमिशन्सपासून अगदी त्यांना स्थळं शोधण्यापर्यंत घरातल्या बारीकसारीक गोष्टी माझ्याकडं. ज्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट नाही, फारसं समजतही नाही, त्या दुसऱ्याला करू द्याव्यात. उगीच चबढब कशाला! असं दोघांनाही वाटतं. असं आपोआप ठरलं. आणि पूर्णपणे सोपवल्यामुळे त्यावरून कटकटी किंवा गोंधळ होत नाहीत.
पण म्हणजे आमच्यात मतभेद किंवा वादावादी होत नाही असा याचा अर्थ नाही. भांडले नाहीत ते नवरा-बायको कसले? ‘थोडे शिकवे भी हो, कुछ शिकायत भी हो तो मजा जीनेका और भी आता है’ खरं की नाही? यातली गंमत बाजूला ठेवली तरी एक मात्र खरं की प्रत्येक भांडण हे मिटण्याकरताच झालं होतं आणि ते मिटावं अशी मनातून इच्छा आणि खात्रीसुद्धा असायची. असं एक होण्यासाठी भांडण्यातली मजा काही न्यारीच असते. संसारातही ती वंगणासारखं काम करते.
   पण संसाराव्यतिरिक्त करण्याच्या कामाचे निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेत आलो. त्याने व्यवसायात काय करायचं, काय नाही हे त्याने स्वत: ठरवलं. मी केव्हा, काय लिहायला घ्यायचं, ते मी ठरवते. तू तिकडे व्याख्यानाला जाऊ नको, असं मी सांगत नाही. तो माझं लिखान वाचतो पण आग्रही मतप्रतिपादन नसतं. दोघांचा परस्परांना अलिप्त पाठिंबा आहे. प्रत्यक्ष सहकार्य फार आवश्यक असेल तितकं आणि तेव्हाच. एकमेकांच्या क्षमता आणि मर्यादा दोन्हींची योग्य जाणीव असल्याने होत असेल तसं. त्या त्या वेळी जे करावं असं उत्कटपणे वाटलं ते मनापासून केलं. दोघांचंही नेहमी असं होत आलं.
आम्हा दोघांना माणसांची आवड. त्याला जरा जास्तच होती. जीवनातल्या सुखाच्या, दु:खाच्या, आनंदाच्या, अडचणीच्या, फजितीच्या सगळय़ाच प्रसंगांत त्याने मित्रांना सहभागी केलं. मुंबईला आल्यावर किती तरी मित्र येऊन राहून जायचे. परगावचे स्नेही तर नेहमीच. त्याच्या बरोबर देशात-परदेशात शूटिंगलासुद्धा मित्र जाऊन आलेले आहेत. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी नाटकाचा दौरा असला किंवा लोकशाही प्रबोधन व्यासपीठासाठी गावोगाव फिरायचं असलं की मित्रांनी साद घातल्याबरोबर हा निघत असे. अशा वेळेला व्यवसायदेखील बाजूला ठेवत असे तो. खरं म्हणजे पत्नी म्हणून हरकत घेता आली असती मला, पण या गोष्टीत त्याला अडवावंसं नाही वाटलं. उलट आवडायचं मला. व्यवसाय बाजूला ठेवून लोकांसाठी काही करू पाहतो म्हणून अभिमान वाटायचा. आणि सगळय़ांच्यात मिळून मिसळून राहिलो म्हणून स्नेहाची कितीतरी निर्मळ नाती मिळाली. आमच्या तीनही मुली पण आमच्या खऱ्या अर्थाने सोशल झाल्या.
पण तरुणपणी घडलेले काही प्रसंग सांगण्यासारखे आहेत. माझा पिंड कादंबऱ्या आणि मराठी भावगीतांवर पोसला गेल्यामुळे पहिल्यांदा माझ्या फार रोमँटिक कल्पना होत्या. आनंदाच्या कल्पनाही बाळबोध, टिपिकल चारचौघींसारख्या. मला आपलं वाटायचं. दोघांनी संध्याकाळी फिरायला जावं, त्याने माझ्यासाठी गजरा विकत घ्यावा इत्यादी, इत्यादी. याने नुकतीच व्यावसायिक नाटकात कामं करायला सुरुवात केली होती, तेव्हाची गोष्ट. मोठय़ा प्रयासाने मी जुळवाजुळव केली आणि आम्ही एका नाटकाला गेलो. नाटक संपल्यावर भरपूर भटकायचं, छान कुठेतरी मोकळय़ा हवेत बाहेरच खाऊन मग घरी यायचं, असा माझा बेत होता. झालं. नाटक संपलं. आम्ही थिएटरबाहेर आलो. समोरच एक माळीण फूटपाथवर गजरे विकत होती. गेलो तिथे आणि भाव विचारेपर्यंत, लांबूनच आम्हाला पाहून, मध्यमवयीन महिलांचा एक घोळका अत्यंत उत्साहाने आमच्यापर्यंत येऊन पोचला. ‘‘तुम्ही ते अमरापूरकरच ना हो, त्या अमुक नाटकातले? बघा. तरी मी सगळय़ांना सांगतच होते..’’ अशी सुरुवात होऊन पुढची पाच मिनिटं प्रत्येकीने स्वत:च्या रसिकतेचं कौतुक करण्याची संधी घेतली. अत्यंत खुशीत फुललेल्या चेहऱ्यांनी त्या पुढे निघून गेल्या. मी आपली पसंत केलेला गजरा हातात घेऊन वाट बघत उभी. त्या रसिक महिलांच्या उच्च स्वरातल्या किलबिलाटामुळे आजूबाजूचे अनेक जण आमच्याकडे पाहू लागले होते. मग घाईघाईने गजरेवालीच्या हातात दहा रुपयांची नोट देऊन उरलेले पैसेही परत न घेता आम्ही रिक्षात बसून तिथून सटकलो. कसलं भटकताय नि मोकळय़ा हवेत जाऊन खाताय? सगळय़ा बेतावर पाणी पडलं!
माझी दुसरी एक अशीच आवडती गोष्ट होती. दिवसभराचं सगळं काम आटोपलं, रात्रीची जेवणं होऊन सासूबाई, मुली झोपल्या की मला वाटायचं- चला, आज हा वेळेत घरी आला आहे, तर जाऊ जरा चालत चक्कर मारायला. तिही वेळ क्वचितच यायची. असेच एकदा आम्ही दोघं चालायला बाहेर पडलो. रात्री दहाची वेळ होती. कोपऱ्यापर्यंत गेलो आणि त्याला काय वाटलं कुणास ठाऊक? म्हणाला, ‘पान खाणारेस का? थांब घेऊन येतो’ (बहुतेक स्वत:ला सिगरेटची हुक्की आली असावी.) म्हणून मी तिथेच बाजूला थांबले आणि तो पानाच्या ठेल्यापाशी गेला. त्या भगभगीत उजेडात याचा चेहरा दिसला मात्र. पानपट्टीवाल्याचा नूरच बदलला. ‘शेट्टी साब, आइए आइए! क्या खिलाऊँ आप को!’ असं म्हणून त्याने उत्तेजित स्वरात सुरुवात केली आणि पानासारखे रंगून रंगून पिक्चरचे डायलॉग सुनवायला लागला. ‘अर्धसत्य’मधल्या रामाशेट्टीला साक्षात समोर पाहून तो धन्य धन्य झाला होता. आणि इकडे वाट पाहात उभी राहिलेल्या माझा वैतागाचा पारा चढत चालला होता. माझ्या नवऱ्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पण माझे असे लहानसहान आनंद करपले ते कायमचे. कारण पुढे असे प्रसंग नेहमी घडत गेले. काही विचित्र काही वेगळे, काही खूपच चांगलेसुद्धा. लोकांना कलाकाराच्या प्रेमाचा उमाळा येतो. त्या भरात ते सुचेल तसं वागून जातात. त्यांनाही तेव्हा कळत नसतं ते काय करताहेत. हे सगळं हळूहळू मला कळायला लागलं. पण तेव्हा कळलं तरी वळत नव्हतं. त्याची सवय मुद्दाम करून घ्यावी लागली. आजकाल आम्हाला विचारलं जातं, ‘तुमच्या नात्याकडे तुम्ही कसं पाहता?’ कसं पाहता म्हणजे काय? नात्याकडे पाहायचं? त्यातून जरा अलिप्त होऊन? अवघड आहे. ते नातं जडलं तेव्हा, रुळलं तेव्हा आणि इतकी वर्षे निभावलं तेव्हाही त्यातून क्षणभरासाठी बाहेर येऊन पहावंसं वाटलं नाही कधी. त्यात असे मुरलो आहोत की आपण स्वत: हे नातं जोडलंय हेच विसरलोत आम्ही. जन्माला येतानाच काही नाती मिळतात ना आपल्याला, तितकंच ते सहज नैसर्गिक वाटतंय. आणि आता तर, पूर्वी आवडीने गायची त्या गाण्यातल्या बहिणाबाईंच्या ओवीचा खरा अर्थही उमगू लागला आहे. ‘ येडय़ा गळय़ातला हार, म्हणू नको रे लोढणं’
 लोकांचं, चाहत्यांचं प्रेम, ‘त्याला’ पाहून सगळय़ांना होणारा आनंद हे सगळे मानसन्मान आहेत. कुणाला सहजी प्राप्त न होणारे. तेव्हा त्यांना लोढणं समजू नकोस. गळय़ात पडलेले हार आहेत ते. खरंच आहे. म्हणूनच आता सगळय़ांच्या प्रेमाचे, मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे हार सांभाळत शांतपणे ‘संध्या छाया सुखविती हृदया’ असं म्हणून सहजीवनाची कालक्रमणा सुरू आहे.