‘लोकसत्ता’च्या ६६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘काळाच्या पुढे असणाऱ्या स्त्रिया’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी होत्या दिग्दर्शिका सई परांजपे, ‘वाइन लेडी’ अचला जोशी आणि डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या डॉ. शुभा टोळे याही या परिसंवादात सहभागी झाल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या मातोश्री प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या असामान्य कर्तृत्वाला उजाळा दिला. आणि उलगडत गेलं काळाच्या पुढे असलेल्या या स्त्रियाचं आदर्शवत कर्तृत्व.
सा वित्रीबाई फुले यांनी लोकांचा विरोध पत्करून मुलींच्या शाळा काढण्यासाठी पुढाकार घेतला नसता, १८७० च्या दशकात पंडिता रमाबाईंनी बालविधवांची समस्या इतक्या प्रखरतेने लोकांसमोर आणली नसती किंवा रमाबाई रानडेंनी मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला नसता तर.. भारताचं सामाजिक चित्र काही वेगळंच असतं. या आणि अशा काही मूठभर व्यक्तींच्या भविष्यवेधी विचारांमुळेच समाजाच्या प्रगतिशील वाटचालीचा आलेख वर चढत गेला. प्रस्थापित व्यवस्थेपलीकडे विचार करण्याची धमक बाळगणाऱ्या या व्यक्ती प्रसंगी बंडखोरी करून आपल्या पुरोगामी विचारांचा पाठपुरावा करत होत्या. म्हणूनच या व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांची कृती पुढील अनेक पिढय़ांसाठीही मार्गदर्शक राहिल्या आहेत.
‘लोकसत्ता’च्या ६६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘काळाच्या पुढे असणाऱ्या स्त्रिया’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षस्थानी होत्या दिग्दर्शिका सई परांजपे, ‘वाइन लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचला जोशी तसेच डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या डॉ. शुभा टोळे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या मातोश्री प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या असामान्य कर्तृत्वाला उजाळा दिला.
देशातच नाही तर परदेशातही ‘वाइन लेडी’ अशी ओळख असणाऱ्या, सामान्य गृहिणी ते यशस्वी महिला उद्योजक असा असंख्य अडचणींवर मात करीत प्रवास करणाऱ्या
आपल्या परदेशवारीत चाखलेल्या वाइनच्या अप्रतिम चवीमुळे व नवं काही करण्याच्या आवडीमुळे अचला जोशी यांनी वाइनच बनवायची, असा निश्चय केला. मात्र नुसतं ठरवलं आणि केली कामाला सुरुवात इतकं ते सोपं नव्हतं. वाइन बनवण्यासाठीचा परवाना घेणं त्यासाठी क्रमप्राप्त होतं. मुख्य अडचण म्हणजे वाइननिर्मितीचा परवाना एक असतो, पण त्यासाठी अनेक विभागांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ मिळवावी लागतात आणि इथेच खरी मेख होती. ‘वाइन म्हणजे दारू’ हे समीकरण जनमानसात इतकं घट्ट रुजलेलं होतं की उत्पादन शुल्क विभागातील लोकांकडूनही ‘बाई तुम्ही दारू बनवता?’ अशा कुतूहलमिश्रित आश्चर्यकारक प्रश्नाला अचलाताईंना सामोरं जावं लागलं. वास्तविक ज्या विभागाकडून वाइननिर्मितीचा परवाना वितरित केला जातो त्या विभागाचीच ही अवस्था होती तर बाकीच्यांना बोल काय लावणार? त्याच खात्यातील अनेकांनी ‘औषधनिर्मितीचा परवाना घ्या, त्याने कर कमी भरावा लागेल’, असं सुचवलं. अनेकांनी घरबसल्या परवाने मिळवणाऱ्यांची उदाहरणंसुद्धा त्यांना दिली. मात्र कोणताही शॉर्टकट अचलाताईंना नकोच होता.
नव्याने उद्योगक्षेत्रात येणाऱ्या स्त्रियांना अचलाताई एक कानमंत्र देतात,‘ एक गोष्ट स्त्रियांनी कायम ध्यानात ठेवली पाहिजे, उद्योजक हा उद्योजक असतो, तो पुरुष आहे की स्त्री आहे याचा कामाशी काहीही संबंध नाही. प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा. आपलं उत्पादन, त्याविषयीही चोख माहिती तिच्याकडे असलीच पाहिजे. स्त्री
अचलाताईंचा ‘प्रिन्सेस’ हा ब्रँड सुस्थापित होण्यासाठी बराच कालावधी लागला. मात्र उत्पादनाच्या दर्जाविषयी त्या पहिल्या दिवसापासून आग्रही होत्या. वाइनमध्ये ‘ऑनेस्ट वाइन’ हा एक प्रकार असतो. त्यात एक थेबं पाणी किंवा इतर कोणतंही रासायन मिसळलं जात नाही. ही वाइन बनवण्याचं ठरवल्यावर अचलाताईंनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलांच्या मनावर ही गोष्ट कटाक्षाने ठसवली, ‘आपल्याला इथं कुणाचीही मदत होणार नाही. आपलं उत्पादन हेच आपल्याला तारणार आहे. त्यामुळे जितक्या प्रामाणिकपणे आपलं उत्पादन तयार करू ते महत्त्वाचं. आणि आपलं उत्पादन जर आपल्याला आवडलं तरच ते दुसऱ्यांना आवडेल. त्यामुळे कुठेही हयगय नकोच.’
अर्थातच अचलाताईंना कमी लेखणाऱ्यांचीही कमी नव्हती. मात्र ज्या पद्धतीने त्यांना परवाना मिळाला, ती बाब त्यांच्यासाठी फारच उत्साहवर्धक ठरली. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. ‘मी अगदी छोटय़ा प्रमाणात वाइन करू इच्छिते. तुम्ही मला परवाना द्याल का,’ या त्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी ठाम नकार दर्शवला. कारण मुंबई शहरात वाइननिर्मितीला बंदीच होती व हा तत्कालीन सरकारचा धोरणात्मक निर्णय होता. शिवाय आता लहान असणारा हा उद्योग भविष्यात मोठा होणार नाही का, हा प्रश्न आडूनआडून वसंतदादा विचारत होते. परवाना वितरित केल्यावर तो मागे घेणं सरकारला नाचक्कीचं झालं असतं. मात्र, अचलाताईंच्या जिद्दीमुळे व मेहनतीमुळे अखेर वसंतदादांनी त्यांना परवाना दिला. सरकारी खात्यांमधील अनागोंदी लपवण्यासाठी का होईना, वाइन परवाना वितरित झाला तोही पाच हजार लिटरसाठी आणि ५ वर्षांसाठी. त्यामुळे अचलाताईंचा आत्मविश्वास दुणावला. त्या म्हणतात, ‘आपल्या सगळ्यांकडेच ताकद असते, फक्त आपण तिचा योग्य वापर करत नाही. स्त्री उद्योजिकाच नाही तर प्रत्येक स्त्रीने आपला आत्मविश्वास बरोबर घेऊन सगळीकडे गेलं पाहिजे. ‘करेज ऑफ कनव्हिक्शन’ जर असेल तर कधीही अडचण येऊ शकत नाही.’
वाइन ही विशिष्ट काळातच बनवावी लागते. बाकीच्या काळात ते काम नसते. मग आपल्याकडे कामाला असणाऱ्या बायकांच्या हाताला काही दुसरं काम द्यावं, म्हणून अचलाताईंनी क्विल्ट बनवण्याचं काम सुरू केलं. क्विल्ट म्हणजे गोधडीचं
स्त्री की पुरुष हा लिंगभेद गौण असल्याच्या मुद्दय़ाला डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या, महिला शास्त्रज्ञ डॉ. शुभा टोळे यांनीही जोरदार पाठिंबा दिला. विज्ञानाचं क्षेत्र सुखावह आहे. या क्षेत्रात काम करणं म्हणजे तुमच्या हाती जादुई दिवा असल्यासारखं आहे. त्यातही त्यांनी सर्वाधिक मोहिनी पाडणाऱ्या मेंदूशी निगडित संशोधन हे त्यांचं कार्यक्षेत्र असल्याने त्यांनी विज्ञान व संशोधन या क्षेत्रात महिलांसाठी मोलाच्या संधी असल्याची बाब अधोरेखित केली.
विज्ञान, त्यातही संशोधन हे स्त्रियांनी करिअर म्हणून निवडण्याचं प्रमाण कमीच. मात्र त्यात उल्लेखनीय प्रगती केलेल्या डॉ. शुभा टोळे यांनी स्त्रियांना उद्देशून केलेलं वक्तव्य उत्साहपूर्ण होतं. त्यांच्या मते करिअर म्हणून विज्ञान निवडणाऱ्या स्त्रियांचा प्रवास मुख्यत्वे दोन स्तरांवरून होतो. पहिली पायरी ही अत्यंत पराकोटीची बिकट, कष्टप्रद आहे. मात्र एकदा का हे ग्लास सिलिंग त्यांनी पार केलं की पुढील प्रवास सोपा आहे. दुर्दैेवाने येथूनच अनेक स्त्रिया संशोधन-विज्ञानातून बाहेर पडतात. यासाठी ‘लिकी पाइपलाइन’ अशी संकल्पना त्यांनी मांडली. मात्र एकदा का ही पातळी ओलांडली की विज्ञान हे स्त्रियांसाठी अत्यंत उत्तम करिअर ठरू शकतं. यातील वेळेची उपलब्धता स्त्रियांसाठी उपयुक्त आहेच, मात्र महिला शास्त्रज्ञ म्हणून आदर, मानसन्मान तुम्हाला प्राप्त होतो, तो शब्दातीत आहे, असं त्या म्हणाल्या.
‘‘संशोधनाच्या क्षेत्रात लिंगभेद नाही. तुम्ही स्त्री आहात की पुरुष याच्याशी कुणालाही काही देणं नाही. तुमचं संशोधन, त्यातील सत्य हेच अंतिम ठरतं. मात्र हे संक्रमण घडतं जेव्हा तुम्ही त्या विषयाचे अध्यापक होता. ती अधिकारवाणी येण्यासाठी आधी पीएच.डी. मग पुढील उच्चशिक्षण असा अनुभव गाठीशी घ्यावा लागतो. नेमकं तेच सोपं नसतं. ही अर्हता प्राप्त होईपर्यंत वेळ लागतो व वयाच्या ३२- ३३ नंतर हा योग जुळून येतो. यावेळी तुम्ही मुलांना मार्गदर्शन करता, त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करत असता. अशा वेळी तुम्ही कुठूनही मुलांशी संपर्कात राहू शकता. मी तर अगदी ई-मेलसह सध्या माझ्या विद्यार्थ्यांशी व्हॉट्स-अपच्या मदतीनेही संपर्कात असते.’’
डॉ. शुभा या प्रथितयश शास्त्रज्ञ आहेत, त्यासह दोन मुलांच्या आईसुद्धा आहेत. या दुहेरी जबाबदारीतून जात असतानाचे त्यांचे अनुभव प्रसंगी आश्चर्यकारक वाटावेत, असे होते. ‘‘मला आठवतंय पहिल्या प्रसूतीनंतर दोन आठवडय़ांनंतर मी घरीच लॅब मीटिंग घेतली होती. याहून धक्का बसेल अशी गोष्ट म्हणजे मीटिंग्जच्या वेळी मधोमध पडदा होता, पलीकडे मी माझ्या बाळाला पाजत होते. मी एका विकासोन्मुख संस्थेत काम करते, ते प्रसूतीची मोठी रजा मंजूर करतात. पण प्रश्न असा होता की, मी रजेवर होते पण माझे इतर सहकारी, त्यांचं संशोधन थांबलेलं नव्हतं. त्यांनी रजा घेतलेली नव्हती. अशा वेळी मला बाळ झालं आहे..वगैरे तुणतुणं वाजवणं मला अयोग्य वाटत होतं. अशीच एकदा शास्त्रज्ञ म्हणून दिल्लीला माझं जाणं अत्यंत महत्त्वाचं होतं. बाळ फक्त २६ दिवसांचं होतं. स्तनपान करणाऱ्या मातेची दर तीन तासांनी छाती भरून येते. अशा वेळी संपूर्ण दिवस दिल्लीत कसं काम करायचं, याचा विचार सुरू असताना मी महिला शास्त्रज्ञ म्हणून माझी बाजू मांडली. आमच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांना मी ई-मेलने विचारणा केली, ‘मला एखादी खोली वैयक्तिक वापराकरता मिळेल का, जेथे इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंपची सुविधा असू शकेल.’ कल्पना करा मी एका शास्त्रज्ञाकडे ब्रेस्ट पंपची मागणी केली. विश्वास ठेवा ह्य़ा गोष्टी सामान्य आणि नैसर्गिक आहेत. आपण याबद्दल वाच्यता केली पाहिजे. या गोष्टी अनेकदा महिलांच्या मर्यादा ठरतात. जवळपास प्रत्येक व्यवसायात महिला इथेच येऊन युटर्न घेतात. मात्र जोपर्यंत तुम्ही लाजेखातर या गोष्टी बोलणं टाळाल, तोपर्यंत त्यातून सुटका होणं अशक्यच.’’
डॉ. शुभा यांचे हे विचार पुरोगामीच नव्हे तर क्रांतिकारी होते. आजच्या स्त्रियांनी स्पष्टवक्ता असणे गरजेचं आहे. कारण त्यामुळे पुढील पिढीचा मार्ग मोकळा होणार आहे, मात्र अनेक मुली वरच्या स्तरावर पोहोचण्यापूर्वीच आपल्या महत्त्वाकांक्षा, आपली ध्येयं यांच्याशी समझोता करतात, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. डॉ. शुभा यांच्या या कामासाठी त्यांच्या शास्त्रज्ञ पतींचाही खंबीर पाठिंबा होता. त्यांच्यातील सुरेख देवघेव यशस्वी करिअरचं गमक असावं. ‘‘माझा नवरा ५ वर्षे आधी फॅकल्टी मेंबर म्हणून नोकरीला लागला. तेव्हा माझं शिक्षण सुरू होतं. त्यामुळे त्याने माझ्यासाठी तडजोड केली व तो अमेरिकेतच नोकरी करत राहिला. मी घेत असलेलं उच्चशिक्षण मला अनेक ठिकाणी मिळू शकलं असतं. मात्र मी तेच ठिकाण निवडलं जेथे त्याची नोकरी सुरू होती. अशा पद्धतीने आम्ही उपाय शोधत गेलो व आपापल्या करिअरमध्ये पुढे जात राहिलो.’’
डॉ. शुभा यांच्या आईने त्यांना वाढवताना स्वत:चा आदर करण्याची भावना ठासून जागवली. म्हणूनच त्या म्हणतात, तुमचा जेव्हा स्वत:वर विश्वास असतो, तेव्हा तुम्ही स्वत:चा आदर करता आणि ज्यावेळी तुम्ही स्वत:चा आदर करता त्यावेळी तुम्ही तुमच्या स्वप्नांची, तुमच्या ध्येयांशी तडजोड करूच शकत नाही. स्वत:वरचा विश्वास तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या संकटांना, समस्यांशी दोन हात करताना मदत करत असतो. अनेक सामाजिक, कौटुंबिक दबाव असूनही तुम्हाला काय हवं आहे, याची ग्वाही देत राहतो. स्वत:वरचा हा विश्वास महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही तुम्हाला हवं ते मिळवता, त्यावेळी अनेकांसाठी हा मार्ग खुला झालेला असतो..
डॉ. शुभा यांच्या आईप्रमाणेच दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या आई शकुंतलाबाई परांजपे यांनीही त्यांच्यात तर्कशुद्ध विचारसरणीची रुजवण केली. शकुंतलाबाई परांजपे यांचं स्मरण महाराष्ट्राला असेल तर ते आहे, त्यांनी संततिनियमनासाठी र.धो.कर्वे यांच्या बरोबरीने केलेल्या कार्यामुळे. शकुंतलाबाई परांजपे म्हणजे रॅग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या कन्या. ज्या काळी मुली बाहेरच्या बसायला लागल्या की त्यांची लग्ने करून दिली जात, त्या काळात शकुंतलाबाई केंब्रिजला एम.ए.चं शिक्षण घेत होत्या. रशियन चित्रकाराबरोबर झालेलं लग्न फसल्यावर त्या कायमच्या भारतात परतल्या. त्यांचं फ्रेंच भाषेवरही कमालीचं प्रभुत्त्व होतं. मात्र हे सारं बाजूला ठेवून त्या उतरल्या संततिनियमनाच्या त्यावेळी त्याज्य ठरवल्या गेलेल्या विषयाच्या जगजागृतीच्या लढय़ात. परांजपेंचे आप्त-स्वकीयही शकुंताबाईंना ‘समाजकार्यासाठी हेच कारण सापडलं काय’ म्हणून थट्टा करत. पण सई परांजपे सांगतात, ‘ती आपल्या निर्णयावर ठाम होती. ह्य़ाची समाजाला जास्त गरज आहे,’ असं उत्तर ऐकवून आई कामाला लागत असे. आई काळाच्या पुढेच पहाणारी होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे, शहरांबरोबरच ग्रामीण भागाकडेही तिला लवकरच मोर्चा वळवावा लागला. मात्र त्या लोकांना माझं म्हणणं पटवून द्यायचं असेल, तर त्यांना त्यांच्यातल्याच काहींनी समजावून सांगितलं तर काम होईल, याची आईला जाणीव होती. मग आईने एक हॉस्पिटलमधली आया, एक झाडूवाली, एक कंडक्टर अशा तीसेक माणसांचा चमू तयार केला. तो चमू घेऊन ती ग्रामीण भागात संततिनियमनच्या विषयावरील प्रचारास जात असे. या चमूतले स्वत: ही शस्त्रक्रिया केलेले सोनावणे नावाचे गृहस्थ फार छान बोलत. ‘सहा मुली झाल्या. या बाई मागे लागल्या आता संततिनियमनाची शस्त्रक्रिया करा. मी घाबरलो, ऑपरेशन म्हणजे काय कापून टाकणार कोण जाणे.पण विश्वास ठेवा शस्त्रक्रियेनंतर फक्त एक दिवस घरी राहिलो, मग दुसऱ्या दिवशीपासून कामाला जाऊ लागलो. माझ्या बायकोबरोबर सगळ्या गोष्टी अगदी होत्या तशाच सुरू आहेत.’ समोर असणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या मनात हीच भीती असायची. त्यामुळे ही मात्रा चपखल लागू पडायची. आई म्हणजे खरंच तर्कशुद्ध विचारांची व त्याप्रमाणे निडर कृती करणारी स्त्री होती.
‘आज मी जी कुणी आहे, ती आईमुळेच.’ सई परांजपे आपल्या यशाचं श्रेय असं त्यांना देतात. वलयांकित आयुष्य असूनही शकुंतलाबाईंनी आई म्हणून सईच्या जडणघडणीसाठी स्वत:ला झोकून दिलं. त्या शकुंतलाबाई नक्कीच काळाच्या पुढे जाऊन काम करणाऱ्या होत्या हे नक्की.
शकुंतलाबाईंप्रमाणे महाराष्ट्रात राजकारण हे क्षेत्र महिलांसाठी खुलं करणाऱ्या प्रेमलाकाकी चव्हाण यांचीही पावलं काळाच्या पुढे पडणारी होती. उभ्या महाराष्ट्राला त्यांची ओळख प्रेमलाकाकी अशी आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची रुजवण करण्याकामी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या समर्थ खांद्यावर जबाबदारी टाकली होती. त्यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आईच्या व्यक्तिमत्त्वाचे, तिच्या राजकीय जीवनाचे अनेक पैलू उलगडले. ‘‘आईचा जन्म बडोद्याचा. सरदार मराठय़ांचं त्यांचं घराणं. मात्र इंदूरला पुढील आयुष्य व्यतीत झालं. आईला डॉक्टर व्हायचं होतं. इंटपर्यंत शिक्षण झालं. मात्र पुढे शिकवण्यासाठी आजोबांनी चक्क नकार दिला. मात्र आईला शिक्षणाची फार ओढ होती. वाचनाची, लेखनाची फार आवड होती. प्रचंड आत्मविश्वास तिच्यात होता. ‘इंदूर विमेन्स कोर’ अशी एक एनसीसीच्या धर्तीवरील युनिटची स्थापनाही आईने केली होती.’’
प्रेमलाकाकींच्या धडाडी वृत्तीचं उदाहरण म्हणजे विवाह ठरवताना त्यांची थेट अटच वडिलांना घातली. मुलगा श्रीमंत नसला तरी चालेल, मात्र उत्तम शिकलेला असला पाहिजे. त्यावेळच्या मराठा समाजात शिकलेली मुलं थोडीच होती. त्यामुळे आनंदराव चव्हाण यांचं स्थळ प्रेमलाकाकीच्या वडिलांना आवडलं. आनंदराव चव्हाण एल.एल.एम करत होते. त्यावेळी मुंबई विद्यापीठातून ते एकटेच उत्तीर्ण झाले होते. अशा कर्तबगार मुलाशी प्रेमलाकाकी विवाहबद्ध झाल्या. शिक्षणाकडे त्यांचा प्रचंड ओढा होता. म्हणूनच लग्नानंतर दोन मुलांना घेऊन त्यांनी मुंबई गाठली व दादरमध्ये येऊन माँटेसरीचा डिप्लोमा प्रशिक्षण पूर्ण केलं. कराडमध्ये माँटेसरीची पहिली शाळा सुरू करण्याचं धाडस त्यांनी केलं. शिक्षणाविषयीच्या त्यांच्या प्रेमामुळेच त्यांनी उभारलेल्या अनेक शिक्षणसंस्थांचा फायदा समाजाला झाला.
लग्नापूर्वी आनंदरावांचा राजकारणाशी संबंध आला होता. सातारा जिल्हा स्थानिक महामंडलाची निवडणूक त्यांनी लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यांच्या प्रत्येक कामात प्रेमलाकाकींचा पाठिंबा असायचा. आनंदराव १९५२ ची विधानसभेची निवडणूक लढले शेकापतर्फे, मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला. त्याकाळी पडदा वापरला जाई. तरीही प्रेमलाकाकी गावोगावी जाऊन सभा घेत. १९५७ साली आनंदराव लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या प्रचारासाठी हिरिरीने काकी सहभागी झाल्या होत्या. महिलांपर्यंत पोहोचणं एरवी शक्य झालं नसतं. सातारा-सांगली भागात ही पहिलीच स्त्री राजकारणात पुढे आली होती. मात्र रात्री १२-१ वाजता येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही भाकऱ्या करून वाढणाऱ्या प्रेमलाकाकी उत्तम संघटक व कुशल नेतृत्वशालिनी होत्या.
असाच एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला तो मुलांना दिल्लीत शिक्षणासाठी पाठवण्याचा. त्यामुळेच पुढे परदेशात शिक्षणासाठी जाण्याची बीजे रोवली गेली, असे पृथ्वीराज चव्हाण नम्रपणे सांगतात. आनंदरावांचा १९७३ साली आकस्मिक मृत्यू झाला. त्यावेळी कराडमधून प्रेमलाकाकींना उभं करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या इतिहासात बिनविरोध विजयी होण्याची घटना घडली. खासदार म्हणून प्रेमलाकाकींनी यशस्वी कारकीर्द गाजवली. मात्र १९९१ साली राजसन्यास घेतला. पृथ्वीराज चव्हाणांचा तोपर्यंतचा राजकारणातील सहभाग अप्रत्यक्ष होता. मात्र निवडणुका लढवतानाचा प्रचार, जनमानसापर्यंत पोहोचणं अशा प्रकारे त्यांची राजकीय कवायत झाली होती. प्रेमलाकाकींचा गांधी परिवाराशी जवळचा स्नेह होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय)कमिटीची स्थापना त्यांनीच केली व त्याच त्याच्या अध्यक्षा झाल्या.
माजी खासदार प्रेमलाकाकी चव्हाण असोत वा पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे आणि त्यांच्या कन्या सई परांजपे. वाइनचा उद्योग सुरू करणाऱ्या पहिल्या महिला उद्योजिका अचला जोशी असोत वा शास्रज्ञ शुभा टोळे असोत. या सगळ्यांनीच काळाच्या थोडं पुढे राहूनच काम केलं आणि इतरांसाठी आदर्श ठरल्या. आज त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून असंख्य स्त्रिया काम करत आहेत. हा आशावाद आहेच. कारण त्यातूनच आपला प्रगतिशील समाज घडत आहे, यापुढेही घडणार आहे
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
काळाच्या पुढे जाताना..
‘लोकसत्ता’च्या ६६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘काळाच्या पुढे असणाऱ्या स्त्रिया’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
First published on: 25-01-2014 at 06:29 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta 66 anniversary while going beyond the time