‘मुलं आणि कुटुंब याविषयीचे अनुभव कथेच्या स्वरूपात सारांश रूपानं वर्षभर लिहिणं हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. वैद्याकीय मदतीसाठी येणाऱ्या पालकांना जे शिकवलं ते वाचकांपर्यंत कथेच्या रूपात पोहोचवलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षभराच्या लेखन प्रक्रियेत स्वत:साठी केलेले नियम, त्यातील त्रुटी आणि सारांश मांडणारा हा समारोपाचा लेख.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षभरापूर्वी ‘लोकसत्ता-चतुरंग’साठी तीन पिढ्यांमधील नातेसंबंधांवर, विशेषत: लहान मुलांच्या मानसिक वर्तनाबद्दल नियमितपणे लेखन कराल का? अशी चौकशी करणारा फोन आला तेव्हा मला हे काम खूप सोपं वाटलं आणि मी ताबडतोब ‘हो’ म्हटलं. आधीच्याच वर्षात दुसऱ्या एका वृत्तपत्रासाठी मी दर आठवड्याला एक असे माहितीपर सदर वर्षभर लिहिले होते आणि ते लिखाण सहज झालं होतं त्यामुळे नवीन काहीतरी लिहायचं या आनंदात मी ‘हो’ म्हटलं. त्यांनी मला खूप मोठा आणि सविस्तर असा पैस दिला. दर १५ दिवसांनी १५०० शब्दांचा लेख असं त्याचं स्वरूप त्यांना अपेक्षित होतं.

हेही वाचा…पडसाद : गृहिणीकडे स्वमर्जीने खर्च करण्यासाठी निधी हवाच

साधारणत: डॉक्टर या भूमिकेतून लेखन करताना आरोग्य, आजार, त्याची कारणं, त्यावरचे उपाय आणि ते होऊ नयेत याबद्दल घ्यायची खबरदारी याबद्दल लिखाण केलं जातं. मी आजपर्यंत अशाच प्रकारे लिहिलेलं आहे. ‘लोकसत्ता-चतुरंग’ची लेखमाला अशी साचेबद्ध नसावी म्हणून मी स्वत:वर काही मर्यादा घातल्या. मर्यादांमुळे सृजनशीलता जास्त खुलते आणि मला हा प्रकार जमतो आहे का, याबद्दल मलाही स्वत:ची परीक्षा घ्यायची होती. त्यामुळे मी स्वत:साठी खालील नियम बनवले –

  • मुलं कुटुंब आणि समाजामध्ये मोठी होत असतात. त्यामुळे फक्त मुलांचा वेगळा असा विचार होऊ शकत नाही. त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा विचार केलाच पाहिजे. हे वातावरण म्हणजे घरामध्ये असलेली आणि आजूबाजूची माणसं. यांच्यावर मी लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. आपल्या देशात तीन पिढ्या एकत्र राहतात. आजी-आजोबा घरात जरी नसले तरीसुद्धा त्यांचा संपर्क आणि त्यांचा प्रभाव हा कुटुंबावर असतोच. तीन वेगळ्या कालखंडामध्ये वाढलेल्या या तीन पिढ्यांना एकत्र जगताना ज्या काही चमत्कारिक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि त्याची उत्तरं शोधावी लागतात, त्याबद्दल लिहावं असं मी ठरवलं. कोणत्याही प्रकारच्या मानसिक आजाराचा नावाने उल्लेख करायचा नाही, तांत्रिक शब्द वापरायचे नाहीत आणि उपदेशपर डॉक्टरी लिखाण करायचं नाही हा पहिला नियम.
  • माझं व्यावसायिक काम लहान मुलांबरोबर आहे. गेली २५ वर्षं मी भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये लहान मुलांबरोबर काम केलंय. मी जगाकडे त्यांच्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करतो. मुलांच्या गरजा, विचार आणि भावना या केंद्रस्थानी ठेवून माझं काम चालतं. पण संपूर्ण जग असं चालत नाही. मुलांसाठी अनेक लोकांना झटावं लागतं. त्यांच्याही स्वत:च्या इच्छा-आकांक्षा असतात. आपल्या मुलांसाठीची स्वप्नं असतात. त्यासाठी ते कष्टतात. त्यांच्या इच्छा-आकांक्षा या बहुतेक वेळा मुलांच्या आकांक्षांशी जुळत नाहीत. त्यातून अनेक प्रकारचे संघर्ष निर्माण होतात, स्वातंत्र्य की कर्तव्य? आई-वडील हे मालक आहेत की पालक? आजी-आजोबांनी पूर्ण निवृत्तीच घ्यावी की संसारामध्ये राहावं? असे काही प्रश्न समोर येतात. सर्व भूमिकांची सापेक्षतेनं काळजी घेऊन, सर्व पात्रांच्या बाजूनं विचार करून लेखन करायचं, ते एकांगी व्हायला नको. ‘चूक की बरोबर’ असा विचार न करता नात्यात निर्माण होणारे ‘ताण’ या दृष्टीनं विचार झाला पाहिजे हा स्वत:साठी घातलेला दुसरा नियम.
  • आयुष्यात उभे ठाकणारे प्रश्न क्लिष्ट आणि जटिल असतात. ते एका साध्या उपायानं पूर्णपणे सुटतात असे सहसा होत नाही. समोर आलेल्या प्रश्नाचा विविध अंगांनी विचार करून आपलं कमीत कमी नुकसान कसं होईल. मुलांचा विचार करताना त्यांच्या नैसर्गिक वाढीमध्ये अडथळे येणार नाहीत अशा प्रकारे उत्तरं शोधावी लागतात. बरेचदा फक्त उत्तरं शोधण्यापेक्षा त्रास कमी करण्यावर भर द्यावा लागतो. अनेक प्रश्न हे योग्य वयात वातावरण नीट राहिलं तर आपोआप सुटतात. ते बळजबरीनं सोडवायचा प्रयत्न केला तरत्याचा विचका होण्याची शक्यता जास्त असते. हे विचार ‘बाल मानसोपचारा’च्या केंद्रस्थानी आहेत. अशा प्रकारचे सारासार विचार बुद्धीला आदरानं वागावणारं लेखन करावं हा तिसरा नियम.
  • मराठी शब्द वापरायचे. तांत्रिक शब्दांसाठी मराठी पर्याय शोधायचे. तेसुद्धा सहज, अर्थवाही, रोजच्या वापरात रुळण्यासारखे शब्द शोधायचे हा माझा चौथा नियम. या शोधामध्ये मला ‘चतुरंग’च्या संपादन विभागाचं भरपूर सहकार्य मिळालं. मी लिहून पाठवलेल्या लेखांमध्ये असे अनेक इंग्रजी शब्द असत जे त्यांनी स्वत:हून प्रेमाने बदलले आणि उत्तम मराठी शब्दांचा वापर केला. दुहेरी क्रियापदे वापरण्याची माझी सवय ही जेवताना दाताखाली येणाऱ्या खड्यासारखी आहे. ती त्यांनी सुधारून दिली. त्यामुळे लेख प्रवाही झाले. माझ्या एकट्याने होणारी ही गोष्ट नाही.
  • ओढून ताणून नाट्य घडवायचं नाही. चारचौघांचं आयुष्य हे पुरेसं नाट्यपूर्ण असतंच. त्यामध्ये कोणीतरी खलनायक होण्याची गरज नाही. परिस्थिती आणि तणाव हे पुरेसे खलनायकी असतात. माणसांनी एकत्र येऊन त्याला तोंड द्यावं लागतं. प्रत्येकानं स्वत:च्या पद्धतीनं वेगळा विचार करण्यापेक्षा, कुटुंबानं मुलाला केंद्रस्थानी ठेवून विचार केला तर प्रश्न सुटण्याची किंवा निदान त्याची धार कमी होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक लेखांमध्ये हा भाग प्रकर्षाने दिसला पाहिजे. कुटुंबाचा समजूतदारपणा हा प्रश्न सोडवण्याचा गाभा असला पाहिजे हा पाचवा नियम.हे सर्व नियम पाळून मी लिखाण केलं. सगळं पाळून चांगलं लिहिणं किती अवघड असतं याचा वर्षभर अनुभव घेतला. या सर्व लेखांमध्ये मी ज्यांच्याबद्दल लिहिलं ती माणसं मला खूपदा भेटलेली आहेत. तुम्हालाही कदाचित ती ओळखीची वाटली असतील. आजूबाजूला दिसली असतील. त्यांच्याच या कथा आहेत. बऱ्याचदा एक प्रसंग डोक्यात अडकून राहायचा आणि पुढचा लेख निश्चित यावर लिहायचा अशी मनामध्ये पक्की गाठ बसायची. वरचे नियम पाळून तो लेख लिहिताना डोक्याची पार कल्हई होत असे. ते प्रसंग व त्याबद्दलचा विचार डोक्यामध्ये अडकून राहायचा. त्यातली पात्रं मला वेगवेगळ्या प्रकारे स्वत:ची बाजू सांगायची. कधी कधी तर असं वाटायचं की ते माझ्या स्वप्नामध्येसुद्धा येत आहेत. हा अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. मोठे लेखक जेव्हा कादंबऱ्या किंवा नाटक लिहितात तेव्हा त्यांना अनेक महिने आणि वर्षं का लागतात? लेखन प्रक्रिया ही जीवाला जाळणारी असते असे अनेक लेखक का म्हणतात? याचा मी एका छोट्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेतला. डोक्यातली कथा योग्य प्रकारे कागदावर उतरली आणि संपादकांचंसुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की अक्षरश: एखादं मूल जन्माला येण्याचं समाधान मिळतं. मन आणि डोकं हे काही दिवसांसाठी तरी पूर्णपणे रिकामं होतं. तो हलकेपणासुद्धा मला या लेखमालेमुळे अनुभवायला मिळाला.

हा सर्व लेखन प्रपंच ज्यांच्यासाठी करायचं ते वाचक, म्हणजे तुम्ही सर्वजण. माझ्यासाठीच्या काही प्रतिक्रिया ‘लोकसत्ता ई-मेल’च्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचल्या. काही लोकांनी प्रत्यक्ष भेटून लेखाबद्दल प्रतिक्रिया दिल्या. समाजमाध्यमे म्हणजे एक्स(ट्विटर), फेसबुक आणि व्हॉट्सअॅप यावर सुद्धा प्रतिक्रिया मिळाल्या. अमुक एका विषयावर का लिहित नाही? असा जाब विचारणारे अनेक जण भेटले. तुमच्या या प्रतिक्रियांमधून आणि तुम्ही सुचवलेल्या विषयांवर लिहिण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियांबद्दल, शाबासकीबद्दल तुमचे आभार. माझ्यासारख्या नवख्या लेखकाच्या प्रयत्नाचे तुम्ही स्वागत केलं, हे माझ्यासाठी खूप मोठे संचित आहे. पुढे परत लिहिण्याची हिंमत त्यामुळेच जिवंत आहे.

हेही वाचा…‘भय’भूती : भीतिध्वनी

त्रुटी – या लेखमालेमध्ये मलाच एक मोठी त्रुटी जाणवली. हे सर्व लेख शहरी कुटुंबांचे आहेत. आई-वडील सुशिक्षित आहेत. नोकरी-व्यवसाय करत आहेत. आजी-आजोबासुद्धा सुशिक्षित आहेत. मुले फ्लॅटमध्ये राहातात आणि शहरी शाळेमध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीच्या या सर्व कथा आहेत. शहरी मध्यमवर्गच सर्व कथांमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये ५० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. २० ते २५ टक्के लोक अर्धशहरी भागामध्ये राहतात. शिवाय आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. या जवळजवळ ७० ते ८० टक्के समाजाचे कोणतेही प्रतिबिंब माझ्या लेखमालेमध्ये उतरले नाही. ही मोठी कमतरता राहिली आहे याची मला जाणीव आहे. त्याबद्दल पूर्ण वेगळ्या संपूर्ण लेखमालेची गरज आहे. ती योग्य व्यक्तींच्या सहकार्याने पूर्ण करावी, अशी माझी इच्छा आहे.
सारांश – मुलं आणि कुटुंबं याबद्दलचा माझा अनुभव सारांश रूपानं मांडतो आहे – कमालीच्या वेगानं बदलत असलेल्या समाजात जगताना आणि अनिश्चित भविष्याचा सामना करण्यासाठी तयार होताना मुलांच्या पालकांना अवजड ओझे घेऊन जगावं लागतं. मुलांची सतत काळजी घ्यावी लागते. अनेक जणांना आई-वडिलांची, म्हणजे थोरल्या पिढीचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. हे काम सोपं नाही. दोन मुलींचा बाप म्हणून ही तारेवरची कसरत मी केलेली आहे आणि ती सुखरूप पार पडली असे मी छातीठोकपणे आजही म्हणू शकत नाही.थोरल्या पिढीनं पोक्तपणानं वागावं. आयुष्यात खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या असतात आणि कुठल्या तात्कालिक असतात? कितीही भयंकर वाटल्या, तरी शांतपणे त्यातून बाहेर पडणं यातच खरं शहाणपण कसं आहे, हे त्यांना समजणं अपेक्षित आहे. ‘नीर-क्षीरविवेक’ हे आजी-आजोबांचं सर्वांत महत्त्वाचं काम आहे. त्यांच्या या मदतीशिवाय आणि अनुभवाशिवाय आई-वडिलांची धास्ती आणि चिंता कमी होऊ शकत नाही. हे सध्याच्या काळात प्रकर्षानं जाणवणारं सत्य आहे.

हेही वाचा…समजून घ्यायला हवं

मुलांच्या भवितव्याबद्दल सतत काळजी करणं आणि त्यांच्या यशाची खात्री होण्यासाठी काहीतरी उद्याोग करत राहाणं यामध्ये सुजाण पालकत्वाची नासाडी होते. बाकी सर्व बाजूला राहतं आणि शाळेच्या परीक्षांमध्ये पडलेले मार्क एवढी एकुलती एक गोष्ट धरून संपूर्ण ‘पालकत्व’ त्याभोवती फिरत राहतं. मार्कांना काही अंशी महत्त्व आहे, यात अजिबात शंका नाही. पण वय वर्षं दोन-तीनपासून तोच ध्यास धरून पूर्ण आयुष्य काढल्यानं खरंच यश मिळतं का? यशाची थोडी-फार शक्यता असते तीसुद्धा अशा वागण्यानं हातातून निसटत तर नाही ना? याचा पालकांनी विचार करावा.
आनंदाचा आणि यशाचा कोणताही ‘फॉर्म्युला’ नसतो. हे उमजणं हेच प्रौढपणाचं लक्षण आहे. हा प्रौढपणा पालकांनी लग्नाच्या वेळीच बाळगावा ही अपेक्षा रास्त नाही. पण त्या दिशेनं वाटचाल करत राहणं महत्त्वाचं आहे. विधायक शिस्त, पुरेसं मोकळेपण, शारीरिक आरोग्य आणि सुदृढ नातेसंबंध या पालकत्वाच्या पायाभूत जबाबदाऱ्या आहेत. या पार पाडल्या नाहीत, तर बाकी कशालाही अर्थ राहात नाही. फक्त एवढ्या पार पडल्या तरी जवळजवळ सर्व प्रसंगांमध्ये ते पुरेसं असतं कारण बाकी सगळं मुलं स्वत:चं स्वत: बघून घेतात, असा माझा २५ वर्षांचा वैद्याकीय अनुभव मला पुन्हा पुन्हा सांगत राहतो.

शेवटी – हा सर्व समजूतदारपणा, अनुभवसिद्ध शहाणपण, आयुष्य हे खाचखळग्यातून गेलं तरीही ते व्यवस्थित टप्प्यावर पोहोचतं आणि आहे त्या संसाधनांमध्ये सुखानं आनंदी आयुष्य जगता येतं, हा धीर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी या वैचारिक रस्त्यावर चालतो आहे. माझं धाकटं मूल नुकतंच १८ वर्षं पूर्ण होऊन कायद्यानं सज्ञान झालं. त्यामुळे मी स्वत: जे आजपर्यंत केलं, माझ्याकडे वैद्याकीय मदतीसाठी येणाऱ्या पालकांना शिकवलं, तेच तुमच्यापर्यंत या कथांच्या माध्यमातून पोहोचवायचा माझा प्रयत्न आज पूर्णत्वाला पोहोचला. संपूर्ण वर्षभर आपण सर्वांनी वाचन-साथ दिली. त्याबद्दल मी आपला आणि ‘लोकसत्ता’चा ऋणी आहे. भवतु सब्ब मंगलम् chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturang concluding article summarizes the writing process about children and family sud 02