प्रत्येकाला प्रश्न पडत असतात, आणि जोपर्यंत त्याची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत माणूस अस्वस्थ राहतो. प्रश्नांचे मोल कशात आहे? जो प्रश्न ऐकल्यावर तुमचं मन स्तब्धावतं, एकचित्त होतं आणि त्या प्रश्नालाच समजून घेतं तेव्हा. या प्रश्न-उत्तरांच्या गुंतागुंतीत मग मदतीला येतात ते प्लेटो, सॉक्रेटिस, अल्बर्ट एलिस, गौतम बुद्ध आणि तुकारामसुद्धा… शेवटी योग्य प्रश्नच घेऊन जातात तुम्हाला योग्य उत्तरांकडे…
ज्यांची उत्तरं सापडत नाहीत अशा प्रश्नांसोबत राहाणं तुलनेनं सह्य आहे. ज्या उत्तरांना पुन्हा प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य तुम्हाला नसतं त्यांच्यासोबत राहाणं जास्त जिकिरीचं… चुकीची उत्तरं मिळवण्यापेक्षा, अज्ञानाच्या बरोबर राहणं चांगलं’, प्रसिद्ध शास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन् यांच्या एका मुलाखतीतील दोन संवाद एकत्र करून लिहिले आहेत. मानवाला जेव्हा ‘स्व’त्वाची जाणीव झाली त्याच वेळी ‘मी’ कोण? या प्रश्नांची उत्पत्ती झाली. एका पातळीवरच्या ज्ञानाचा बोध झाला की पुढच्या पायरीवर नेणारा प्रश्न निर्माण होतो.
प्रश्न पडला की, उत्तर मिळायलाच हवं, असा अट्टहास निर्माण झाला तर मात्र भावनिक स्वास्थ्याला तडे जाऊ लागतात. असं म्हटलं जातं की, ‘गूगल’ या सर्च इंजिनवर रोज साडेतेराशे कोटी प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे दिली जातात. ‘चॅट जीपीटी’वर रोज १अब्ज प्रश्न विचारले जातात. उत्तर मिळालं की, अनिश्चितता संपते. मनाला अनिश्चितता खुपत राहते. त्यातून असुरक्षितता वाढते. मला उत्तर हवंच, तेसुद्धा सुनिश्चित आणि जलद. ही मनाची मागणी बनते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं हा मानवी हक्कच बनून जातो. आणि असं उत्तर न मिळाल्याने आपल्यातले अनेक जण वर्षानुवर्षं अस्वस्थ राहतात.
‘मी त्यांच्यासाठी इतकं करूनही ते/ती/तो माझ्याशी असे का वागले?’ मनआरोग्य व्यावसायिकांसमोर हा प्रश्न रोज एकदा तरी मांडला जात असेल. आणि हे वागणे काल-आजचे असेल किंवा २० वर्षांपूर्वीचे. अशा वेळी ‘वागणारे’ जेवढ्या सुखदु:खात नसतील, तेवढी वेदना या अंगाला असते. पोखरणाऱ्या प्रश्नाचे हे एक उदाहरण. अशा वेळी मी म्हणतो, ‘‘तुम्हाला जे उत्तर हवं ते मी तुम्हाला समीकरणात बांधून देतो. अगदी गणिताच्या फॉर्म्युलासारखं…’’
समोरची व्यक्ती आता चित्त एकाग्र करून ऐकायला लागते.
व = (ज x स x प) स्व x अश असं हे सूत्र आहे. कोणत्याही उत्तेजनेमुळे होणारं व्यक्तीचं वर्तन कशातून तयार होतं ते पाहू.
ज = जनुकीय सहभाग
स = आजवरचे संस्कार
प = परिस्थिती
स्व = स्वभाव आणि त्यातील दृष्टिकोन
अश = अगणित शक्यतांमधली एक
‘‘अगदी मुद्देसूद उत्तर मिळालं – तेही शास्त्रीय. पण तुमचं समाधान झालं का?’’ मी गंभीरपणे विचारतो. बहुतेक वेळा मान नकार दर्शवत हालचाल करते. डोळ्यातली व्यथा वाढते, कारण तुम्हाला हवं तेच उत्तर मन मागत आहे. उत्तराची निव्वळ इच्छा नव्हे, तर हट्ट आणि अट्टहास आहे हा. शब्दांबद्दल मी क्षमा मागतो तुमची पण मला सांगा, ‘‘प्रश्नाचं उत्तर मिळवणं ही गरज की खाज?…’’ कंड सुटला की माणूस खाजवत राहातो. त्यामुळे कंड वाढतोच… हा मनाचा ‘ itch – scratch – syndrome’ झाला आहे तुमच्या. या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर त्यासोबत ‘शांततेने राहण्याचा पर्याय तुम्ही उपलब्ध असूनही का घेतला नाही?’ कारण ‘उत्तर मिळणे हा माझा हक्क!’ मी बोलत जातो. उत्तर शोधण्यातलं दु:ख आणि अनुत्तरित प्रश्नासोबत राहाण्यातलं समाधान यातील वेदनादायी पर्याय अनेकांच्या मनाने तोवर भरपूर गिरवलेला असतो.
‘चांगलं वागणाऱ्यांच्या वाट्याला इतक्या अडचणीच येत असतील तर भल्याने वागायचंच कशाला?’असा एक कळवळून आलेला प्रश्न होता. ‘‘अत्यंत खुनशी, क्रूर आणि लबाडीने वागण्याचा पर्याय तुमची कधीपासून वाट पहातो आहे ‘अश’ अर्थात् अगणित शक्यतांमध्ये. पण तुमचा आजवरचा वारसा, संस्कार, स्वभाव हे अशा वर्तनाच्या पक्षाने जाणारे नाहीत ना. आता त्यांच्याशीच लढायचं की आपल्या वृत्तीसोबत सख्य जोडायचं हा पर्याय तुमचा!’’ मी म्हटलं.
या तऱ्हेच्या प्रश्नांचा एक विशेष हा की त्यांची ‘संपूर्ण समाधानकारक’ उत्तरं मिळाली तरी सांप्रत काळातल्या जगण्यावर काहीही परिणाम होत नाही. ‘त्यांनी मला त्या वेळी स्पष्टपणे का सांगितलं नाही?’ हा असाच एक प्रश्न. या प्रश्नातच एक दोषारोप लपलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ‘त्या’चा गुन्हा सिद्ध होणं. कोणत्या न्यायालयात? भावनिक निवाड्याचं सर्वोच्च न्यायालय ज्याच्या-त्याच्या मनातच असतं.
आणखी एक मजेदार, पण त्या व्यक्तीला विचारात टाकणारा प्रश्न आहे, ‘हरवलेली वस्तू कशी हरवली त्याचे उत्तर.’ समजा, ती वस्तू कालांतराने मिळाली, तरीही हा प्रश्न निकालात निघेलच याची काय हमी? मी जर ‘तो’ निर्णय घेतलाच नसता तर पुढचं सारं (दु:खद) टळलं असतं का? हा एक असाच प्रश्न. ‘त्या’ निर्णयाचे परिणाम जर अपेक्षित आणि हितवर्धक झाले तर तो पडत नाही. ‘अश’पैकी दु:खदायक शक्यता प्रत्यक्षात आल्या तरच हा प्रश्न कुरतडत राहतो.
‘माझं पुढे काय होणार? माझ्या जवळच्यांचं काय होणार? आणि (आम्ही सारे जगात असल्यामुळे) जगाचं काय होणार?’ अशी विश्वचिंता काही जण डोक्यावर वाहतात. त्यांच्या बुद्धीला कळत असतं की ‘जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे’ वगैरे वगैरे. पण मन स्वत:च्या ‘मी’पणातच रमलेलं. जवळच्यांची चिंता, कारण ते माझे एक्सटेन्शन. अनेक अनुत्तरित प्रश्नांच्या मागे असतं ‘मी’ला दिलेलं अवास्तव महत्त्व. या शरीर-मन-संवेदनायुक्त अस्तित्वाला दिलेला अत्युच्च बहुमान. वास्तवामध्ये आरोग्यापासून दूर नेणाऱ्या प्रश्नांना मन चिकटून राहातं आणि प्रत्येक प्रश्न बनतो घट्ट दुराग्रह. ज्यावेळी माझ्यासाठी हितकारक शक्यता प्रत्यक्षात येत नाहीत तेव्हा भेडसावणारा प्रश्न असतो, ‘माझ्याच बाबतीत असं का घडलं?’ ज्यावेळी अगणित संभाव्य परिणामांपैकी सुखकारक पर्याय प्रत्यक्षात येतो तेव्हा मन हा प्रश्न विचारत नाही. आणि ‘माझ्याच बाबतीत’मधला मी असा कोण दैवी विशेषाधिकार लाभलेला वंदनीय मानव की ज्यासाठी वैश्विक समीकरणाने अपवाद करावा?
आता आपण ‘प्रश्न’ ही संकल्पना व्याख्येपासून समजून घेऊ. ‘माहिती मिळवण्यासाठीची इच्छा’ व्यक्त करणारी वाणी आणि वर्तन म्हणजे प्रश्न. ‘माहिती’ म्हणजे उत्तर नव्हे. जास्तीत जास्त असं म्हणता येईल की, ती उत्तराकडे नेणारी एक वाट आहे. काही तत्त्वज्ञ असं म्हणतात की, मानवी बुद्धीने ‘प्रश्ननिर्मिती’ केली ती शोध, अभ्यास, स्वाध्याय, निरीक्षण, परीक्षण, चिंतन, मनन या साऱ्या प्रक्रियांची सुरुवात म्हणून. ज्ञानार्जन व्हावं म्हणून प्रश्न आले. परंतु माणसातली ‘स्वखु’वृत्ती (स्वत:वरच खूश) जशी वाढली तसे माणसाने गुंता करणारे प्रश्न निर्माण केले. प्रश्नांमागच्या गंभीर वाटांपासून सुटका शोधण्यासाठी तर मनाने हे नसेल केलं? पण त्याची किंमत मोजली ती भावनिक वादळांमध्ये आणि अशांत जगण्यामध्ये.
प्रश्नांचे मोल कशात आहे? जो प्रश्न ऐकल्यावर तुमचं मन स्तब्धावतं, एकचित्त होतं आणि त्या प्रश्नालाच समजून घेतं तेव्हा. वियोगाच्या काळातून जाताना स्वत:ला स्वत:शी जोडण्यासाठी कोणते विचार, व्यक्ती, प्रसंगाची मदत झाली? तुमच्या स्वभावातला सर्वात ‘पवित्र’ गुण कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रामाणिकपणाची शक्ती आणि मर्यादा कोणत्या? तुमच्या मुलाला/नातीला एक ‘सिद्धी’ द्यायची तर कोणती द्याल? हे प्रश्न खुले म्हणजे ‘ओपन एन्डेड’ आहेत. त्यामध्ये समोरच्या व्यक्तीची मतं समजून घेण्याचा सूर आहे. आणि उत्तरामध्ये ‘अपेक्षित’ आणि ‘अनपेक्षित’ अशी वर्गवारी करण्याचा अट्टहास नाही. हे प्रश्न स्पेसिफिक म्हणजे ‘विशिष्ट’ आहेत. संदिग्ध नाहीत. कान देऊन ऐकण्याची क्षमता वाढते तसे बुद्धिमान प्रश्न सुचणं सहज होत जातं. ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ला आवाहन करणारे प्रश्न म्हणजे ‘प्रॉम्प्टस’ निर्मितीचं एक नवं शास्त्रच जगात विकसित होत आहे.
आयुष्य हा एक खुला सवाल आहे आणि त्याचे धागे वैश्विक असू शकतात हे भान प्लेटोसारख्या तत्त्वज्ञांना होते. ‘न तपासलेलं आयुष्य म्हणजे व्यर्थ जीवन’ असं त्याचं विधान आहे. प्रश्न असे विचारायचे ज्यामुळे बुद्धी आत्मज्ञानाच्या प्रदेशात जाण्यास प्रवृत्त होईल. या प्रश्नांना म्हटलं गेलं ‘सॉक्रेटिक डायलॉग्ज.’ आयुष्य सतत ‘निश्चित’ असायलाच हवं या भ्रमातून बाहेर पडून अनिश्चिततेचा सुलभ स्वीकार करणं हा त्या प्रश्नोपनिषदाचा हेतू.
हीच पद्धत पुढे डॉ. अल्बर्ट एलिस यांनी विवेकनिष्ठ मानसशास्त्रात आणली. निश्चितता म्हणजेच निश्चिंत राहाणं, हा विचार वास्तवाला धरून नाही. क्षणोक्षणी बदलणाऱ्या जगण्यामध्ये निश्चित म्हणजे ‘एकमेव शक्यता’ असं कसं होईल? प्रत्येक क्षणामध्ये ‘अश’ लपलेल्या असणार. याआधी आपण फक्त व्यक्तीच्या परिघातील ‘अश’ पाहिल्या. एकमेकांशी सतत जोडल्या जाणाऱ्या व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-सृष्टी यांच्या ‘अश’चा आकडा खरोखरच अगणित नसेल का? हजार स्क्वेअर फुटांच्या घरावरची मालकी मला निश्चिंत बनवणार की हजार कोटी रुपयांचा बँक बॅलन्स? पक्की आणि कायमची गॅरंटी कोणी कशाची द्यायची?
व्यक्तीने स्वत:च्या बुद्धीचा अहंकार बाळगू नये असा दुसरा हेतू सॉक्रेटिसच्या प्रश्नमालिकेत होता. ‘ज्ञानाच्या झाडाला अनंत पाने आहेत पण मला लक्ष केंद्रित करायचं ते माझ्या ओंजळीतल्या पानांवर’; असे बुद्धवचन आहे. गौतम बुद्ध सांगतात की, ‘तुमचे प्रश्न उपयुक्त आणि आवश्यक आहेत का ते वारंवार पारखून घ्या. स्वत:ला सर्व समजलंच पाहिजे यामागचा छुपा अहंकार समजून घ्या. शोध-स्वाध्याय म्हणजे प्रवास. उत्तर म्हणजे मुक्काम.’
बुद्ध आपल्या शिष्यांना सांगतात, ‘तुमच्या जीवनाचा हेतू म्हणजे तुमच्या जीवनाचा हेतू शोधणे आणि त्या (शोधा) मागे (सातत्याने) जाणे होय’ त्यांना एका शिष्याने विचारले, ‘‘ज्याला सर्वज्ञान झाले तो स्वर्गात जातो का?’’
बुद्ध म्हणतात, ‘‘मला ठाऊक नाही.’’ शिष्य : ‘‘तुम्ही एवढे ज्ञानी, तुम्हाला कसे ठाऊक नाही’’ बुद्ध : ‘‘कारण मी अजून मेलेलो नाही.’’ याला म्हणायचं बुद्धांची ओंजळीतल्या पानांवरची ज्ञानदृष्टी.
‘‘तो लटिक्यांमाजी भला।
म्हणे देव म्यां पाहिला।।’’
या तुकोबांच्या ओळीसुद्धा सर्वज्ञानीपणाचा फुगा फोडण्यास समर्थ आहेत. तात्पर्य, प्रज्ञाप्रदर्शनासाठी प्रश्न विचारणं योग्य नव्हे. जे. कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञ म्हणतात की, ‘स्वत:लाच प्रश्न विचारा आणि आपल्या प्रतिक्रिया न्याहाळा. तुमच्या अस्तित्वाच्या आरशात तुमचे मन नाना रंगढंग दाखवेल. कधी प्रश्नच नाकारेल, कधी प्रश्नापासून घाबरून दूर पळेल !…आपल्या पूर्वसमजाला अनुकूल उत्तरच शोधून काढेल आणि मोठा उत्सव करेल. सहज येणारे आणि वरवरचे निष्कर्ष पकडून ठेवायला धडपडेल…कधी खंतावेल कधी बढाईखोर बनेल…निरीक्षण करत राहा.’
उत्तर म्हणजे ‘ Resolution’, आणि ही पद्धत म्हणजे ‘Transformation’. तुमच्या अस्तित्वामध्ये परिवर्तन घडवायचं तर प्रश्नांमध्येच दडलेलं उत्तर शोधा. झेन तत्त्वज्ञानही प्रश्नांबद्दल अशीच भूमिका घेतं. बुद्धीला न सोडवता येणारे प्रश्न असतात आणि असणार आहेत. शब्द आणि व्याकरणामध्ये अडकलेल्या उत्तराचा नाद सोडा. आपल्या ‘चित्ता’कडे पहा. तुमच्या संवेदना तुम्हाला तुमच्या चित्ताकडे ( Consciousness) कडे घेऊन जातील. या प्रक्रियेचं ‘दर्शन’ तुम्हाला देणारे प्रश्न शोधा…
झेनगुरु एक प्रश्न विचारतात, ‘एका हाताने वाजवलेल्या टाळीचा आवाज कसा असेल?’ ‘ऐकायला’ आला किंवा ‘दिसला’ तर नक्की कळवा.
anandiph@gmail.com