मी महानगरी आयुष्य जगले असले, तरी तिथं मी महानगरातल्या एखाद्या दुर्लक्षिलेल्या कोपऱ्यासारखी होते. माझ्यासारख्या असंख्य मुली ज्यांचा आपल्यातल्या ज्ञान-कौशल्यांवर विश्वास असतो पण भवतालानं, परंपरांच्या काचामुळे आलेल्या न्यूनगंडाशी स्पर्धा करण्यात बराच वेळ आणि शक्ती खर्ची पडते त्या सगळ्याजणी मला माझ्याच नावेतल्या प्रवासी वाटतात. मी शोषित स्त्रियांच्या लढाईतली एक लढवय्या आहे आणि कायमच या प्रवासाचा भाग असेन.
अगदी कालचाच प्रसंग. माझी एक साधारण चाळिशीची मैत्रीण माझ्याकडे आली होती. ती नोकरी करते. तिची वरिष्ठ सहकारी तिला वाईट वागवत असल्याचं तिचं म्हणणं होतं. काल तर ऑफिसमधल्या जमिनीवर आइसक्रीमचा डाग पडला म्हणून हिला जबाबदार धरत सगळ्यांसमोर आणि नंतरही व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर काहीबाही बोलून आणि लिहून तिने हिचा अपमान केला होता.
ही मैत्रीण कायम तिच्या बॉसच्या या अशा वागण्याबद्दलची खदखद व्यक्त करायची. ‘तू तुझ्या बॉसला नेमकं उत्तर दे. सहन करू नकोस,’ असं तिला कितीतरी वेळा सांगितलं होतं, पण तिची हिंमत होत नव्हती. काल शेवटी तिला समोर बसवलं. तिला जे वाटत होतं ते बोलू दिलं आणि मग हेच सगळं तिनं तिच्या बॉसलाही सांगितलं पाहिजे, स्वत:च्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, असं समोर बसून अगदी कान धरून समजावलं. तिलाही ते पटलं म्हणा किंवा अति झालं म्हणून असेल शेवटी तिनं मोबाइल घेतला, मोठासा मेसेज टाइप केला, ‘यापुढे हे सगळं मी सहन करणार नाही, सन्मानाची वागणूक मिळाली तरच नोकरी करेन.’ असा मेसेज तिथल्या तिथेच त्या बॉसला पाठवला नि तिला कोण बरं वाटलं. तिचा मानसिक ताणच निघून गेला. खळखळून हसत, तिनंच आणलेल्या किलगडावर ताव मारत, आम्ही ते ‘सेलिब्रेट’ केलं.
या मैत्रिणीसारख्या अनेकजणी आहेत, ज्यांना माझ्याकडून कळत-नकळत थोडंफार बळ मिळाल्याचं त्या सांगतात. मला वाटतं, हा माझ्या अस्तित्वाचा महत्त्वाचा भाग आहे. आज मी जी आहे, त्यात माझ्या रूढार्थानं स्त्रीवाद माहीत नसलेल्या पण खऱ्या अर्थानं स्त्रीवादी असणाऱ्या वडिलांचा मोठा वाटा आहे. ते एका प्रिटिंग प्रेसमध्ये मशीन ऑपरेटर होते. मला कळायला लागलं तेव्हापासून त्यांनी नोकरी सोडून अनेक व्यवसाय करून पाहिले. कशातही जम बसला नाही. शिवाय आम्ही पाच बहिणी आणि एक लहान भाऊ अशी सहा भावंडं. वडिलांची कमाई तुटपुंजी, त्यामुळे आई कुणा-कुणाकडे घरकामं करून हातभार लावायची. परिस्थिती गरिबीची होती तरी बाबांनी त्यांच्या हयातीत शाळेसाठी काही कमी पडू दिलं नाही. कुठल्याच गोष्टीला वडिलांनी आडकाठी केल्याचं मला आठवत नाही. विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, आंतरशालेय स्पर्धाना ते माझ्यासोबत यायचे. शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी, मग तो नाच असो की नाटक की भाषण, मला प्रोत्साहन देणार, मदत करणार आणि कौतुक तर हमखास करायचे. अगदी बालवर्गापासून त्यांनी पेपर, अवांतर पुस्तकं वाचायची गोडी लावली. मी लहानपणी मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त खेळत असे. दहावी-अकरावीला जाईपर्यंत मी कुठेही टी-शर्ट बर्मुडय़ावरच हुंदडायचे. या आणि अशा कितीतरी गोष्टींवर बाबांनी कधीच आक्षेप घेतला नाही. ‘तू मुलगी आहेस म्हणून अमुक एक गोष्ट करू नकोस, मुलगी आहेस म्हणून इतक्या वाजताच घरी यायचं’, असा कुठलाही जाचक नियम आमच्या घरात कधीच नव्हता. आजही घरी मिक्सर, विजेचा दिवा बिघडला तर माझ्या धाकटय़ा बहिणी तो दुरुस्तही करतात आणि आमचा भाऊ अगदी भांडी घासणे, भाज्या निवडणे यासारखी कामेही करतो.
मी दहावी उतीर्ण झाले आणि आजारपणामुळे वडील वारले. पंधराव्या वर्षी पाठीवर पाच भावंडं आणि आई अशी जबाबदारी येऊन पडली. मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर नाही. अशा परिस्थितीत वडिलांचं ‘तेरावं’ झालं नि आई पदर खोचून, लोकांच्या टोमण्यांचा विचार न करता कामासाठी घराबाहेर पडली. नातेवाईकांकडे हात न पसरता येतील तसे दिवस काढायचे, पडतील ते कष्ट करायचे, हा पहिला धडा आईच्या या कृतीनं दिला. त्यानंतर आई जी घरकामं करायची, त्यात तिला मदत करणं, भाजी विकणं, नाश्त्याचा स्टॉल लावून विक्री करणं, सणांच्या दिवशी फुलांच्या माळा करून विकणं असं करता-करता मीही माझं ‘मास्टर्स’पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शिकत असताना अनेक लहान-सहान नोकऱ्या केल्या. बी. ए. पास झाल्या झाल्या मला लगेच एका वृत्तवाहिनीत नोकरी मिळाली. तोपर्यंत मला पत्रकारितेतलं ‘अबकड’ माहीत नव्हतं. तिथे मी अनेक गोष्टी शिकले. अनेक ठिकाणी नोकऱ्या करत असताना परिस्थिती, दिसणं, कपडे यावरूनच पारख केली जायची. भेदभावाचा सामना करावा लागला. या भेदभावाचा सामना अगदी लहान असल्यापासून, शाळेतल्या मैत्रिणींपासूनच सुरू झाला, त्यामुळे न्यूनगंड निर्माण झाला. या न्यूनगंडावर मात करता येण्यासारख्या सकारात्मक गोष्टीही नंतर घडत गेल्याच. ज्या वृत्तवाहिनीत मी काम करत होते, तिथल्या संपादकांनी माझ्या बाह्य़रूपाकडे न पाहता माझी बातमीची समज आणि निवेदन कौशल्य पाहून वृत्तनिवेदन करण्याची संधी दिली. त्यानंतर एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करत असताना तिथं न्यायालयाचं वार्ताकन करण्याची संधी तिथल्या संपादकांनी दिली. त्या वृत्तपत्राच्या इतिहासात न्यायालयासारखं आव्हानात्मक बीट सांभाळणारी मी पहिली स्त्री होते, शिवाय रात्रपाळी स्वत:हून मागून घेऊन काम करणारीही मी पहिली स्त्री होते, असं मला तिथल्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी सांगितलं. पत्रकारितेच्या क्षेत्रात आजही कोणी तरुणी आली की तिला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशी कार्यक्षेत्रं तिथल्या बातम्यांसाठी दिली जातात. तिथं असा वेगळा विचार करणाऱ्या संख्येनं मूठभरच पण सुजाण व्यक्तींचा, संपादक, वार्ताहरांचा माझ्या घडण्यात सहभाग आहे.
नुकताच मी ‘इंडियन अॅनिमल फार्म’ या प्रवीण बांदेकरांच्या कादंबरीचा ब्लर्ब लिहिला, प्रकाशक येशू पाटील यांनीही रूढार्थानं मुख्य प्रवाहातील साहित्यिक, समीक्षक नसताना माझ्यावर विश्वास टाकून ही संधी देणं, या गोष्टी आत्मविश्वास वाढवतात. या लहान-मोठय़ा संधी स्वत:तल्या दिसण्यापासून अनेक गोष्टींच्या न्यूनगंडावर मात करायला मदत करतात.
मी महानगरी आयुष्य जगले असले, तरी मी महानगरातल्या एखाद्या दुर्लक्षिलेल्या कोपऱ्यासारखी होते. माझ्यासारख्या असंख्य मुली मला दिसतात, ज्यांचा आपल्यातल्या ज्ञान-कौशल्यांवर विश्वास असतो पण भवतालानं, परंपरांच्या काचामुळे आलेल्या न्यूनगंडाशी स्पर्धा करण्यात बराच वेळ आणि शक्ती खर्ची पडते. एका बाजूला या सगळ्याजणी मला माझ्याच नावेतल्या प्रवासी वाटतात, तर दुसऱ्या बाजूला कुठलंही सांस्कृतिक संचित, जात-वर्गीय विशेषाधिकार नसताना ज्यांनी समग्र समाजाच्या हितासाठी आयुष्य खर्ची घातलं त्या सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख, इरोम शर्मिला, सोनी सोरी, भवरीदेवी या सगळ्याच जणी मला प्रेरित करतात. बिल्कीस बानो ज्या पद्धतीनं गुजरात दंगलीतल्या सामूहिक बलात्कारानंतर उभी राहिली, आणि इतक्या वर्षांनी का होईना न्याय मिळवला, ते मला प्रेरित करतं. माझ्यात जी संघर्षरत राहण्याची वृत्ती विकसित झाली, तिचं उगमस्थान या स्त्रिया आहेत. चहूबाजूनं पिचलेल्या, उन्हातान्हात दगड फोडून, धुणी-भांडी करूनही हसतमुख जगणाऱ्या श्रमिक बाया, अगदी पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या देहविक्री करणाऱ्या पण ‘आपल्या मुला-मुलींना बाबासाहेबासारखं शिकून मोठं करायचं,’ असं स्वप्न पाहणाऱ्या कष्टकरी स्त्रिया मला ऊर्जा देतात. याशिवाय माझ्या आयुष्यातल्या स्त्रीवादी पुरुषांचा, आपले उच्चजातवर्गीय विशेष हक्क वा अधिकारांमध्ये शोषितांना सहभागी करू पाहणाऱ्या मित्र-मैत्रिणींचाही माझ्या घडण्यात वाटा आहे. श्रीरूपा बागवान, रेश्मा रामचंद्र, प्रज्ञा माने, अंजली दमानिया, डॉ. लतिका भानुशाली अशा अनेक मैत्रिणींनी मला संघर्षांच्या काळात अगदी आर्थिक मदतीपासून, पुस्तकं, मानसोपचारासाठी मदत अशा अनेक गोष्टी केल्या, जेव्हा जेव्हा मी खचले, तेव्हा त्या उभं राहण्यासाठी विश्वास देत राहिल्या. भूषण गायकर, प्रथमेश पाटील, मोहन शेलार यांच्यासारखे पुरुष मित्रही लिंगभेदापल्याडच्या निखळ मैत्रीचा प्रत्यय देत राहतात.
दोन वर्षांपूर्वी एका परिचित नातलग मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. बाललैंगिक शोषणाचा गुन्हा त्या आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला. ती मुलगी आणि तिच्या कुटुंबांची परिस्थिती बेतास बात असल्यानं आणि आरोपीची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानं पोलिसांकडून त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांनाच, जणू त्याच गुन्हेगार आहेत, अशी वागणूक मिळत होती. त्यांनी माझ्याशी संपर्क केल्यावर त्या मुलीच्या कुटुंबाला धोका आहे, त्यांना संरक्षण देण्यात यावं, असं सांगण्याकरता मी त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना, मी पाच मिनिटं वेळ बोलण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती केली. त्यावर त्यांनी अपमानास्पद वागणूक द्यायला सुरुवात केली. मी पुन्हा दोनदा नम्रपणे विनंती केली, पण त्यांनी अपमान करणं चालूच ठेवलं तेव्हा मात्र मी आवाजाची पट्टी वाढवत म्हणाले, ‘‘सर, तुमच्या जागी गृहमंत्री जरी इथं असतील, तरी ते माझ्याशी असं बोलू शकत नाहीत. मी तुमच्याकडे या कुटुंबासाठी संरक्षण मागायला आले, तुम्हाला याची दखल घ्यावीच लागेल, अन्यथा या कुटुंबासह मी पोलीस स्टेशनबाहेर आमरण उपोषणाला बसेन. तसं मी लिहून देते.’’ हे ऐकल्यावर ते पोलीस अधिकारी वरमले. त्यानंतर त्यांनी सहकार्य केलं.
आयुष्यात जिथं कुणी आपलं किंवा दुर्बल घटकांचं शोषण करू पाहात असेल तर तिथं आवाज उठवला पाहिजे. निकरानं ‘नाही’ म्हणून प्रतिकार केला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा धडा स्त्रीवादानं मला दिला. स्त्रीवादी मैत्रिणी, सामाजिक, राजकीय चळवळीतल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या चर्चा, वाद मला नेहमी समृद्ध करतात. मार्क्स, जोतीबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यानं माझ्यातली एक मूलभूत समज विकसित केली. राज्यव्यवस्था, माणूस, शोषण, कल्याणकारी राज्य, संघर्ष याबाबतची एक व्यापक समज माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित करू शकते. माझ्या घडण्यात, मला आलेली ही थोडीशी समज ही माझ्या चांगलं माणूस बनण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे याला मी मोठी उपलब्धी समजते.
माझ्या क्षेत्रातच काय पण कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक आव्हानं आज स्त्रीसमोर उभी आहेत. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ असो की इतर आव्हानं. मला सुदैवानं कामाच्या ठिकाणी अशा समस्यांना सामोरं जावं लागलं नाही मात्र इतर ठिकाणी लैंगिक अत्याचार होण्याच्या अनेक शक्यता होत्या, तिथं अतिशय मजबूतपणे त्या शक्यता हाणून पाडू शकले मी. स्पष्टवक्तेपणामुळं आपलं एकवेळ ऐहिक नुकसान झालं तरी चालेल पण शोषणाला बळी पडायचं नाही, हे बाळकडू मी माझ्या आई-वडिलांकडून घेतलं. उपाशी रहावं लागण्याची परिस्थिती अनेकदा आली, पण तत्त्वांशी तडजोड न करता माझ्या आईनं कष्टानं परिस्थितीसमोर दोन हात केले. कधीही तिनं कुणाचं पाच पशाचं नुकसान केलं नाही, मेहनतीशिवाय अधिकचे लाभ घेतले नाहीत, त्यामुळे ती सवय माझ्यातही रुजली. हिशेबाला प्रामाणिक राहण्याची तिची सवय, इतरांबद्दल कणव वाटण्याची सवय आपोआप रुजली. वडिलांच्या वागण्यात मी कधीच कळत्या वयापासून आईला शिवीगाळ-मारहाण करताना पाहिलं नाही, याऊलट ते स्वयंपाक करायचे, आम्हा बहिणींना आंघोळ घालायचे, भांडी घासण्यापासून सर्व कामं करायचे, त्यामुळे लिंगभेदाच्या सीमारेषा लहानपासूनच पुसल्या गेल्या.
आज मी कष्टानं माझी परिस्थिती बदलू शकले. या संघर्षांत अनेकांची साथ-सोबत होती. अशा अनेकजणी संघर्षरत आहेत. त्यांना मदतीचा हात देणं, त्यांच्या लढाईत बळ देणं हे मी महत्त्वाचं कर्तव्य समजते. हा भगिनीभाव जाणीवपूर्वक जोपासणं, भवतालात त्याचे घट्ट ताणेबाणे विणत राहणं हेच तर स्त्रीवाद सांगतो. मी या शोषित स्त्रियांच्या लढाईतली एक लढवय्या आहे आणि कायमच या प्रवासाचा भाग असेन.